HW News Marathi
राजकारण

मनमोहन सिंग यांचे सरकार माओवाद्यांनी नाही, तर जनतेने उलथवले | ठाकरे

मुंबई | माओवादी भाजपप्रणीत सरकारे उलथवतील म्हणून त्यांना अटक केली, असे सांगणे सरकारने थांबवावे. हे विधान मूर्खपणाचे आहे. तुमची सरकारे कोण उलथवणार ? मनमोहन सिंग यांचेही सरकार माओवादी किंवा नक्षलवाद्यांनी नाही, तर जनतेनेच उलथवले होते. सरकारे आज तरी लोकशाही मार्गानेच उलथवली जातात. असे म्हणत माओवादी भाजपाची सत्ता उलथविण्याचा कट रचत असल्याच्या विधानांवरु शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या दैनिक सामनाच्या संपादकीय मधून सरकारचा समाचार घेतला आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

पोलिसांनी माओवाद्यांवर मोठा हल्ला केला आहे. देशभरात छापे घालून मोठ्या प्रमाणात धरपकडी केल्या. ज्यांना अटक केली त्या सगळ्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध होता व त्यांनी (भाजपची) सरकारे उलथवून टाकण्याचा कट रचल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी समोर आणली आहे. देशातील तसेच राज्याराज्यांतील भाजपप्रणीत सरकारे उलथवून टाकण्याचा या मंडळींचा कट होता, असे पोलिसांतर्फे वारंवार सांगितले जात आहे. या मंडळींचा नरेंद्र मोदींच्या हत्येचाही कट होता. छत्तीसगढ, तेलंगणा, आंध्र प्रदेश व प. बंगाल, ओडिशा, महाराष्ट्रातील किनवट, चंद्रपूर, गडचिरोली भागात नक्षलवाद्यांचा जोर आहे. त्या कारवाईत आतापर्यंत असंख्य पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले. छत्तीसगढच्या दंतेवाडात विद्याचरण शुक्लसह अनेक काँग्रेस नेते व अधिकारी नक्षली हल्ल्यात ठार झाले आहेत. त्यांच्याकडे शस्त्र आहेत, सैतानी डोकी आहेत व मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आहे. दुर्गम भागात त्यांनी स्वतःची समांतर सरकारे चालवली आहेत, पण या सगळ्यांना वैचारिक बैठक देण्याचे काम शहरी भागातील ‘माओवादी’ करीत आहेत. त्यांचे विचार हिंसक आणि विध्वंसक आहेत. त्यांना लोकशाही राज्यव्यवस्थेशी काही देणेघेणे नाही. राज्याराज्यांत अस्थिरता व अराजक निर्माण करणे हाच त्यांचा उद्योग आहे. भीमा-कोरेगावप्रकरणी दंगली घडवून महाराष्ट्र पेटविण्यामागे हेच

माओवादी उद्योगपती

होते व आग विझल्यावर आता त्यांना अटका झाल्या आहेत. कवी वरावरा राव, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, व्हरनॉन गोन्साल्वीस असे हे लोक विचारवंत आणि बुद्धिजीवी म्हणून गणले जातात व उच्चभ्रू वर्तुळात त्यांचा वावर आहे. थोडक्यात ही सर्व प्रतिष्ठित आणि वजनदार मंडळी आहेत. तिकडे चीनमध्ये माओवाद वेगळ्या स्वरूपाचा आहे. माओ त्यांचा, पण तिथे सरकार स्थिर आहे व राज्य वगैरे उलथवून टाकण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांना तेथील कम्युनिस्ट सरकार विनाचौकशी तुरुंगात डांबते व त्या व्यक्तीस गायब केले जाते. आपल्या देशात राजकारणी आणि विचारवंतांची एक फळी या उद्योगी मंडळींच्या समर्थनासाठी उभी राहते. राहुल गांधींपासून शरद पवारांपर्यंत, प्रकाश आंबेडकरांपासून अखिलेश यादवपर्यंत प्रत्येक जण पकडलेल्या माओवाद्यांच्या समर्थनासाठी छाती पिटत आहे. खरे-खोटे श्रीराम जाणे, पण पंतप्रधान मोदी यांना राजीव गांधींप्रमाणे उडवायचा कट या मंडळींनी रचला होता अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. तरीही या मंडळींचे समर्थन कसे काय होऊ शकते? दुसर्‍या बाजूला काही हिंदुत्ववादी पोरे पकडली व त्यांच्यावर पानसरे, दाभोलकर, गौरी लंकेश वगैरेंच्या खुनाचा आरोप ठेवल्याने हेच माओप्रेमी वेगळी नौटंकी करतात. हिंदुत्ववाद्यांचा बीमोड केला पाहिजे, असे सांगतात. श्याम मानव, जितेंद्र आव्हाड, मुक्ता दाभोलकर वगैरे मंडळींना हिंदुत्ववादी ठार मारतील अशी आवई देखील उठवतात, पण पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीसांना

ठार मारण्याचा कट

रचत असल्याचे मान्य करायला मात्र माओवादी तयार नाहीत. म्हणजे ‘हिंदुत्ववादी’ पोरे दहशतवादी व ‘माओवादी’ म्हणजे विचारवंत, विद्रोही कवी! अशी दुटप्पी मांडणी करणे हाच खरे तर देशद्रोह आहे. चिदंबरम महाशयांनी आता तारे तोडले आहेत की शहरी नक्षलवाद संकल्पना त्यांना मान्य नाही. राफेल विमान खरेदी, फसलेली नोटबंदी आणि देशासमोरील इतर ज्वलंत प्रश्नांपासून लोकांचे लक्ष इतरत्र वळवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. चिदंबरम यांना शहरी नक्षलवाद अमान्य आहे, पण याच महाशयांनी ‘भगवा दहशतवाद’ ही संकल्पना आणली व हिंदूना बदनाम केले. माओचा विचार घातक नाही, पण त्यातून निर्माण झालेला नक्षलवाद कश्मीरातील दहशतवादापेक्षा भयंकर आहे व तो देश पोखरत आहे. कथित माओवाद्यांना अटक करू नये, त्यांना नजरकैदेत ठेवावे असे निर्देश महात्मा सुप्रीम कोर्टाने दिले, पण हिंदू पोरांसाठी कुणी धर्मात्मा बनायला तयार नाही. सध्याच्या कारवायांत पाणी मुरते आहे अशी शंका सगळ्यांनाच आहे. राजकारणासाठी पोलीस व प्रशासन वापरले जाणे नवीन नाही. पण त्यात मुखवटे गळून पडतील. माओवादी भाजपप्रणीत सरकारे उलथवतील म्हणून त्यांना अटक केली असे सांगणे सरकारने थांबवावे. हे विधान मूर्खपणाचे आहे. तुमची सरकारे कोण उलथवणार? मनमोहन सिंग यांचेही सरकार माओवादी किंवा नक्षलवाद्यांनी नाही, तर जनतेनेच उलथवले होते. सरकारे आज तरी लोकशाही मार्गानेच उलथवली जातात. दुसरा विषय मोदी यांच्या सुरक्षेचा. मोदी यांची सुरक्षा जगात ‘लई भारी’ आहे व त्यांच्या डोक्यावरून चिमणीही उडू शकत नाही. इंदिरा गांधी व राजीव गांधींमध्ये एक बेडरपणा किंवा साहस होते. त्या साहसाने त्यांचा घात केला. मोदी तसे साहस करणार नाहीत. सरकारे उलथवून टाकण्याइतपत क्षमता या माओवाद्यांत असती तर प. बंगाल, त्रिपुरा, मणिपूरमधील सरकारे त्यांनी गमावली नसती. त्यामुळे पोलिसांनी जिभेवर लगाम ठेवून कामे करावीत, नाहीतर मोदी व त्यांच्या भाजपचे नव्याने हसे होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांचा राजीनामा

News Desk

स्मारकांसाठी खर्च केलेले जनतेचे पैसे परत करा, मायावतींना न्यायालयाचा धक्का

News Desk

गडचिरोलीत मतदान करून परतणाऱ्या मतदारांचा भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू

News Desk