HW News Marathi
राजकारण

आज ना उद्या ही सत्ता जनता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही! – शरद पवार

मुंबई | सत्ता केंद्रीत करणारा प्रयत्न ताकद देण्याचा असू शकतो परंतु जनता बोलत नाही ती बघत असते, निरीक्षण करत असते. आज देशातील अनेक राज्य बरखास्त करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे आज ना उद्या ही सत्ता जनता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपला दिला. आज राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडली. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना विरोधातील अडीच वर्ष लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचे आवाहन केले.

संसदीय लोकशाहीवर हल्ला करण्याचे काम सध्या भाजप करत आहे. मध्यप्रदेश असेल आणि आता महाराष्ट्रात काय झालं तुम्हाला माहीत आहे. लोकशाही मार्गाने आलेल्या लोकांना बाजुला करुन सत्ता आपल्या हातात कशी राहील असा प्रयत्न होत आहे. हा सत्तेचा दोष आहे. सत्ता केंद्रीत झाली तर ती एका हातात जाते ती सत्ता विकेंद्रित झाली पाहिजे तर ती अनेक लोकांच्या हातात जाते. मात्र हल्ली केंद्रातील सरकार केंद्रीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडी, सीबीआय या गोष्टी आपल्याला अगोदर कधी माहीत नव्हत्या त्या अलीकडे आल्या आहेत. ईडीचा कॉंग्रेसकडून कधी वापर झाला नाही. मात्र आता सत्तेचा वापर करून राजकीय दहशत निर्माण केली जात आहे. त्यामुळे सर्वांसाठी आज हा संघर्षाचा काळ आहे असेही शरद पवार म्हणाले.

यावेळी आणीबाणीची आठवण शरद पवार यांनी सांगितली आणि त्यात १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते असेही स्पष्ट केले. आज ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये शिवसैनिक कुठे हालला नाही. ज्यांनी सत्ता बदल करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याविरोधात हा शिवसैनिक एकत्र झाला आहे. एखाददुसरा सोडला तर एकही निवडून येणार नाही हे मला शिवसैनिक सांगत आहेत. सत्तापरिवर्तन झाले ते लोकांना आवडलेले नाही. शिवसैनिक नाराज आहेत त्यामुळे एक वेगळं चित्र राज्यात आगामी काळात पाहायला मिळेल असेही शरद पवार म्हणाले.

पाऊस कमी झाल्यावर आपल्याला जोमाने अडीच वर्षे काम करायचं आहे. लोकांशी संपर्क करायचा आहे, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल आणि ही आंदोलने सर्वसामान्य माणसाच्या माध्यमातून करावी आणि त्यामूळे आपल्या पक्षाला वेगळे भवितव्य पाहायला मिळेल असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

पक्ष संघटना म्हणून आपल्याला कष्ट करायचा हा कालखंड आहे. पक्षाची स्थापना १९९९ ला केली. आजपर्यंत पक्षाचा २३ वर्षाचा कालखंड झाला. यामध्ये साडेसतरा वर्षे सत्तेत आपण होतो. यामध्ये भाजपकडे किती वर्ष होती. त्यात देवेंद्र फडणवीस यांचा कालखंड सोडला तर जास्त काळ भाजप सत्तेत नव्हता. आपण सत्ता बघितली आणि सत्ता नसलेला काळही बघत आहोत त्यामध्ये मला समाधानाचा काळ हा विरोधात असताना वाटतो. सत्ता असताना अधिकार्‍यांची एक साखळी लक्षात येते मात्र विरोधात असताना एखादा निर्णय घेतला असेन तर तो आपल्याला जातायेताना पहाता येतो असेही शरद पवार यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाच्याबाबत आज कोर्टाने निकाल दिला आहे. निवडणूकीत ज्यांनी अर्ज भरले आहेत तिथे निवडणूका घ्या आणि भरले नाहीत तिथे घेऊ नका असा निर्णय दिल्याचे कळतेय. त्यामुळे आता निवडणूका पुढे जाण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाला घेऊन निवडणूका झाल्या पाहिजेत ही पक्षाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे ही एक संधी आपल्याला आली आहे. आणि त्यातून नगरपालिका, नगरपरिषद या सर्व पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद उभी राहिल असेही शरद पवार म्हणाले.

आगामी नगरपरिषद, नगरपालिका निवडणूकात नेतृत्वाची फळी तयार करण्याची व सर्व घटकांना न्याय कसा देता येईल याचा विचार झाला पाहिजे. यावेळी ५० टक्के नवीन तरुण पिढी घ्या त्यांच्यामागे खंबीरपणे उभे रहा हीच पिढी आपल्या पक्षाच्या पाठीशी उभी राहिल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

 

आगामी निवडणूका कशा लढणार आहोत याचा निर्णय पक्ष नक्की घेईल. पक्षाने निर्णय घेतला की तिकडे सगळं लक्ष केंद्रीत करावं लागेल. आपले ५४ आमदार आणि शिवसेनेचे ५६ तर कॉंग्रेसचे ४४ अशी परिस्थिती होती. आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरला कसा जाईल असा प्रयत्न करुया असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

पक्षाची लाईन घेऊन काम करा. हे सांगतानाच कामाची जबाबदारी विकेंद्रीकरणाप्रमाणे करुया. प्रत्येक जिल्ह्यात काय काम करायचं याची माहितीही यावेळी शरद पवार यांनी दिली. इतर पक्षांमध्ये फाटाफूट झाली परंतु राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही याबद्दल शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितेश राणेंनी महापालिकेवरील मोर्चा पुढे ढकलला

swarit

राजनाथ सिंग म्हणतात, ‘संयम राखा’ तर गडकरी सांगतात, ‘सहमतीने मंदिर बांधा’

News Desk

राज्य सरकार सीमा भागातील जनतेच्या पाठीशी ठाम! – मुख्यमंत्री

Aprna