HW Marathi
राजकारण

कसायाच्या दारात उभ्या केलेल्या भाकड, भेदरलेल्या बैलासारखे नेते देश काय सांभाळणार ?

मुंबई | शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी (२४ मार्च) कोल्हापुरात फुटला. कोल्हापुरातील तपोवन मैदानात भाजप-सेनेची ही सभा पार पडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे या सभेला लोकांनी प्रचंड मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शविली होती. यावेळी भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी विरोधकांची चांगलीच फिरकी घेतली. कोल्हापुरात झालेल्या शिवसेना-भाजपच्या याच विराट सभेबद्दल आज (२६ मार्च) शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये लिहिण्यात आले आहे. “देव, देश आणि धर्मासाठी म्हणूनच आम्ही ‘युती’ केली व तो आमचा निर्णय योग्यच होता, हे कोल्हापुरातील उसळलेल्या विराट सभेने दाखवून दिले”, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. कसायाच्या दारात उभ्या केलेल्या भाकड, भेदरलेल्या बैलासारखे नेते देश काय सांभाळणार ?, असा सवालही सामनामध्ये करण्यात आला आहे.

काय आहे सामनाचे आजचे संपादकीय ?

काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादीस घरघर लागली हे दिसत होतेच. शिवसेना–भाजपची युती होत नाही हे गृहीत धरून त्यांच्या डरकाळ्या व सत्तावाटप सुरू होते. मात्र ‘युती’ची घोषणा होताच या दोघांचेही अवसान गळाले. निवडणूक सोडून ते रणातून पळ काढू लागले आहेत. विरोधक कुणी आहेत काय? असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. देव, देश आणि धर्मासाठी म्हणूनच आम्ही ‘युती’ केली व तो आमचा निर्णय योग्यच होता, हे कोल्हापुरातील उसळलेल्या विराट सभेने दाखवून दिले. महाराष्ट्राच्या पाठिंब्यावर देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार येईल, याविषयी आमच्या मनात कोणतीही शंका नाही!

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जवळ येत आहेत व प्रचाराचे नारळ जागोजागी फुटत आहेत. कुणी ‘कॉलर’ उडवीत भाषण ठोकीत आहेत तर कुणी मतांसाठी भररस्त्यात ‘नाचू’ लागले आहेत. पुढला महिनाभर मतदार हा ‘राजा’ असेल आणि पंतप्रधान, मुख्यमंत्री, विरोधी पक्षांचे नेते, गावोगावचे जाणते राजे हे मतदारांसमोर असे काही वाकलेले आणि झुकलेले दिसतील की विनम्रता या शब्दाची व्याख्याच बदलावी लागेल. संपूर्ण एप्रिल आणि मे महिन्याच्या 19 तारखेपर्यंत देशभरात अशीच निवडणुकीची धामधूम सुरू राहील. या धामधुमीचा रंग चढण्यास आता कुठे सुरुवात झाली आहे. शिवसेना-भाजप युतीनेही रविवारी कोल्हापुरात प्रचाराचे रणशिंग फुंकले. तपोवन मैदानावर भगव्या वातावरणाचे एक भव्य विराट चित्र देशाने पाहिले. उत्साहाच्या लाटा उसळताना पाहून आमची खात्रीच पटली की, या वेळी राज्यात 48 पैकी किमान 45 जागा आम्ही नक्कीच जिंकू. विरोधक निदान औषधासाठी तरी शिल्लक ठेवायला हवेत, म्हणून आम्ही तीन जागा महाआघाडीवाल्यांना देत आहोत. आता या तीन जागा कोणत्या, ते निकालानंतरच कळेल. चंद्रकांतदादा पाटलांनी तपोवनातल्या व्यासपीठावरूनच गर्जना केली की, पश्चिम महाराष्ट्रातील

सर्वच्या सर्व जागा

जिंकू. म्हणजे पाटलांच्या म्हणण्यानुसार ‘बारामती’ही जिंकणारच! दानवे म्हणतात, मराठवाडय़ांतील सर्व जागा जिंकू. मुख्यमंत्री विदर्भातले असल्यामुळे तेथील सर्वच जागा जिंकाव्या लागतील. गिरीश महाजन हे उत्तर महाराष्ट्रातील ‘युती’च्या सर्व जागा जिंकण्याचे बोलत आहेत. मुंबई, कोकणातही वारे युतीचेच आहे व काँग्रेस-राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच ‘हाय’ खाल्ली आहे. काही ठिकाणी ते मैदानात उतरायला तयार नाहीत. आयाराम-गयाराम शब्दांना नवे तेज प्राप्त व्हावे अशी घाऊक पक्षांतरे सुरूच आहेत. महाराष्ट्रातील तालेवार घराणी, खानदाने सत्ताधारी पक्षांत सामील होत आहेत. अकलूजचे मोहितेपाटील घराणे, सांगलीचे वसंतदादा पाटलांचे घराणे, दिंडोरीचे पवार वगैरे खानदानी काँग्रेसवाले एका रात्रीत मनपरिवर्तन करून भाजपचे उमेदवार होत आहेत. साताऱयात अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र पाटील हे शिवसेनेचे उमेदवार झाले. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादीस घरघर लागली हे दिसत होतेच. शिवसेना-भाजपची युती होत नाही हे गृहीत धरून त्यांच्या डरकाळ्या व सत्तावाटप सुरू होते. मात्र ‘युती’ची घोषणा होताच या दोघांचेही अवसान गळाले. कमरेवरच्या

नाडय़ा ढिल्या पडल्या

व जवळजवळ निवडणूक सोडून द्यावी तसे ते रणातून पळ काढू लागले आहेत. विरोधक कुणी आहेत काय? असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात ‘युती’ होताच काँग्रेस-राष्ट्रवादीचे तकलादू घर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले आहे व त्यांचे नेते आता तोंडास येईल ते बकत आहेत. वंचितांची म्हणून जी काही आघाडी निर्माण झाली आहे त्याविषयी न बोललेलेच बरे. निवडणुकीपुरत्या उगवलेल्या त्यांच्या छत्र्या निकालानंतर अदृश्य झालेल्या दिसतील. इतक्या मोठय़ा देशात अनेक प्रश्न आहेत व भविष्यातही निर्माण होऊ शकतात. अशावेळी त्या प्रश्नांशी सामना करणारे सरकार मजबूत नसेल तर देश कोसळून पडेल. मोदी यांच्या बाबतीत विरोधकांचे आक्षेप असू शकतात, पण मोदी यांच्या तोडीचा एक तरी नेता ‘महागठबंधन’ नामक कोसळलेल्या डोलाऱयात आहे काय? कसायाच्या दारात उभ्या केलेल्या भाकड, भेदरलेल्या बैलासारखे नेते देश काय सांभाळणार? देव, देश आणि धर्मासाठी म्हणूनच आम्ही ‘युती’ केली व तो आमचा निर्णय योग्यच होता, हे कोल्हापुरातील उसळलेल्या विराट सभेने दाखवून दिले. महाराष्ट्राच्या पाठिंब्यावर देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार येईल, याविषयी आमच्या मनात कोणतीही शंका नाही!

Related posts

धवलसिंह मोहिते-पाटील यांची रणजितसिंह निंबाळकर यांना साथ

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण

News Desk

आम्ही भाजपच्या नव्हे तर रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढविणार, जानकरांची भूमिका

News Desk