HW News Marathi
राजकारण

पद्मश्री आचरेकरांना शासकीय इतमामात निरोप न दिल्याने सरकारचा कोतेपणा उघड !

रमाकांत आचरेकर ही उत्तम क्रिकेटपटू घडविणारी एक तालीम होती, एक ‘भट्टी’ होती. त्यात तावूनसुलाखून निघालेले अनेक तारे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आकाशात आज चमकत आहेत. ते खऱ्या अर्थाने क्रिकेटचे भीष्माचार्य आणि क्रिकेटपटूंचे द्रोणाचार्य होते. क्रिकेट हा ज्यांचा श्वास होता आणि उत्तमोत्तम क्रिकेटपटू घडविणे हा ज्यांचा ध्यास होता ते रमाकांत आचरेकर आपल्यातून गेले. हिंदुस्थानी क्रिकेटचे एक ‘ध्यास’पर्व संपले! एवढ्या महान आचार्याला शासकीय इतमामात अखेरचा निरोप द्यायला राज्य सरकार विसरले. मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली, पण त्यांच्या सरकारने पद्मश्री आचरेकरांवर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे कर्तव्य पार पाडले नाही. म्हणून आचरेकरांचे महान कार्य कमी झालेले नाही, पण सरकारचे कोतेपण मात्र उघडे पडले, असे म्हणत उद्धव यांनी सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

आजचे सामनाचे संपादकीय

आपल्या देशात क्रिकेट आणि क्रिकेटपटू यांच्याभोवती लोकप्रियता आणि प्रसिद्धीचे मोठे वलय असते, मात्र या क्रिकेटपटूंना घडविणाऱ्या त्यांच्या ‘गुरूं’ना हे वलय, मानसन्मान फारसा मिळत नाही. अपवाद ठरले ते रमाकांत आचरेकर. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासारखा विश्वविक्रमवीर क्रिकेटपटू त्यांनी हिंदुस्थानी आणि जागतिक क्रिकेटला दिला. त्याच्या रूपाने ‘क्रिकेटचा देव’च घडवला. अर्थात फक्त म्हणूनच आचरेकर सर महान गुरू ठरले असे नाही. ते स्वतः एक प्रतिभावान ‘रत्नपारखी’ आणि हाडाचे क्रिकेट प्रशिक्षक होते. त्यासाठी लागणारे उपजत गुण, खेळाडूंना उत्तम तऱहेने घडविण्याचे कसब त्यांच्यात होते. खेळाडूंमधील गुण आणि कौशल्य अचूक हेरून त्यानुसार त्याला विकसित करण्यासाठी, त्याला आकार देण्यासाठी स्वतः मेहनत घेण्याची आणि त्या खेळाडूलाही त्यापेक्षा जास्त परिश्रम करायला लावण्याची ताकद त्यांच्यात होती. त्यासाठी लागणारी कडक शिस्त, कर्तव्यकठोरता त्यांच्याकडे होती आणि या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या आपल्या शिष्याला प्रोत्साहन देण्याचा, त्याचे कौतुक करण्याचा प्रेमळपणाही होता. मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही आचरेकर सरांनी आपल्याला ‘सरळ’ खेळायला शिकवले असे जेव्हा त्यांचा पट्टशिष्य मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच सांगतो तेव्हा रमाकांत आचरेकर या एकूणच

साध्या-सरळ व्यक्तिमत्त्वाविषयी

कल्पना येऊ शकते. चंद्रकांत पंडीतसारख्या खेळाडूची क्रिकेटमधील ‘गती’ पाहून त्याच्या वडिलांना भेटणारे, त्यांनी त्याच्या नोकरीचा आग्रह सोडावा म्हणून त्यांना स्वतःच्या खिशातून एक हजार रुपये देणारे आचरेकरांसारखे प्रशिक्षक आजच्या व्यावसायिक जमान्यात ‘वेडे’च ठरविले जातील! पैसा आणि क्रिकेट प्रशिक्षण हा त्यांच्यासाठी विषयच नव्हता. त्यामुळेच अनेक गरीब युवा खेळाडूंसाठी ते ‘देव’च ठरले. ते स्वतः प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले खरे, पण त्यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली आणि गाजली ती क्रिकेट प्रशिक्षक म्हणून. गुणग्राहकता, पुस्तकी तंत्रापेक्षा खेळाडूच्या अंगभूत गुणांचा, कौशल्याचा विकास करणे हे सर्व कठोर शिस्तीच्या परिघात करून घेत उत्तम क्रिकेटपटू घडविणे हीच आचरेकरांच्या जीवनाची वहिवाट राहिली. या वाटेवरून चालतानाच त्यांनी सचिन तेंडुलकरसारखे क्रिकेटला पडलेले एक ‘स्वप्न’ सत्यात आणून दाखविले. विनोद कांबळीसारखा विक्रमवीर आणि बलविंदरसिंग संधू, चंद्रकांत पंडीत, प्रवीण आमरे, संजय बांगर, रमेश पोवार यांच्यासारखे अनेक नामवंत क्रिकेटपटू घडविले. हिंदुस्थानी क्रिकेट संघात प्रदीर्घ काळ उत्तमोत्तम मराठी खेळाडू दिसले त्यात आचरेकर यांचे योगदानही मोठे होते. आजच्या युगात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि लॅपटॉपचा वापर क्रिकेटपटूंच्या प्रशिक्षणात केला जातो. आचरेकर सरांनी मात्र

हाताशी असेल त्या

साधनसामग्रीचा वापर करीत खेळाडूंना आणि त्यांच्यातील क्रिकेटला आकार दिला. सरावाच्या वेळी स्टंपवर एक रुपयाचे नाणे ठेवून सचिनला ‘नाबाद’ फलंदाजी करण्याचे ‘आव्हान’ देणारे आणि ते यशस्वीपणे पेलायला लावणारे आचरेकरांसारखे प्रशिक्षक विरळच. रमाकांत आचरेकर ही उत्तम क्रिकेटपटू घडविणारी एक तालीम होती, एक ‘भट्टी’ होती. त्यात तावूनसुलाखून निघालेले अनेक तारे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आकाशात आज चमकत आहेत. ते खऱ्या अर्थाने क्रिकेटचे भीष्माचार्य आणि क्रिकेटपटूंचे द्रोणाचार्य होते. मात्र या महान आचार्याला शासकीय इतमामात अखेरचा निरोप द्यायला राज्य सरकार ‘विसरले’. मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली, पण त्यांच्या सरकारने ‘पद्मश्री’ आचरेकरांवर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे कर्तव्य पार पाडले नाही. पुन्हा ‘प्रोटोकॉल’ पाळण्यासंदर्भात ‘कम्युनिकेशन गॅप’ राहिला असावा अशी मखलाशी राज्य सरकारच्याच एका मंत्र्याने केली. हा सर्वच प्रकार जेवढा संतापजनक तेवढाच वेदनादायी आहे. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत म्हणून आचरेकर सरांचे योगदान, महान कार्य कमी झाले नाही, पण सरकारचे कोतेपण मात्र उघडे पडले. क्रिकेट हा ज्यांचा श्वास होता आणि उत्तमोत्तम क्रिकेटपटू घडविणे हा ज्यांचा ध्यास होता ते रमाकांत आचरेकर आपल्यातून गेले. हिंदुस्थानी क्रिकेटचे एक ‘ध्यास’पर्व संपले!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोन नेते, दोन मेळावे, कोण गाजवणार मैदान?

Manasi Devkar

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा DJ च्या तालावर ‘धांगडधिंगा’!; कोरोना नियमांना हरताळ

News Desk

मंत्रालय परीसरात असलेल्या भाजप कार्यालयासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त

News Desk