मुंबई | ‘शिवसेनेने राजकारण करताना देशाचा विचार आधी केला. तुमचे ते राजकारण, चाणक्य नीती. मग इतरांचे काय? आम्हाला ‘पीडीपी’ आणि ‘टीडीपी’मधला फरक कळतो”, असे म्हणत आजच्या (१३ फेब्रुवारी) ‘सामना’तून पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. “शिवसेना ‘पीडीपी’च्या मंचावर सदिच्छा म्हणून दोन मिनिटांसाठी जाताच सगळे जणू आभाळ कोसळल्यासारखे कोकलू आणि बोंबलू लागले आहेत”, असे म्हणत सामनातून भाजपवर टीका केली आहे.
आजचे सामनाचे संपादकीय ?
गेल्या काही दिवसांत देशाचे राजकारण एककल्ली आणि एकतर्फी होत चालले आहे. राजकारणातील मतभेद वैचारिक असावेत, व्यक्तिगत नसावेत. जोपर्यंत आपण सगळेच लोकशाही प्रक्रियेने देश चालविण्याची कसरत करीत आहोत तोपर्यंत पंतप्रधान मोदी यांचा जो काही नारा आहे की, ‘सब का साथ सब का विकास’ तो महत्त्वाचा वाटतो. शिवसेनेची स्वतःची अशी एक प्रखर राष्ट्रवादी भूमिका आहे व त्यास हिंदुत्ववादाची धार आहे. ती धार आम्ही कधीच बोथट होऊ दिली नाही. मात्र याचा अर्थ आमच्या विचारसरणीस, भूमिकांना विरोध करणाऱ्यांना आम्ही त्या अर्थाने देशाचे दुश्मन मानतो असे नाही. ‘एमआयएम’चे ओवेसी यांचा फूत्कार आम्ही देशविरोधी मानतो. तसेच कश्मीर खोऱ्यातील मेहबूबा मुफ्ती यांच्या ‘पीडीपी’ पक्षाच्या कारवाया सरळ सरळ पाकधार्जिण्या असल्याने त्या देशविरोधीच मानायला हव्यात. आता ‘पीडीपी’चा एक खासदार फैयाझ अहमद मीर यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून दोन संतापजनक मागण्या केल्या आहेत. 35 वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांनी फासावर लटकवलेल्या मकबूल भट याच्या शरीराचे अवशेष परत मिळावेत़ तसेच संसद हल्लाप्रकरणी फाशी दिलेल्या आणि तिहार तुरुंग परिसरात दफन केलेल्या अफझल गुरूच्या शरीराचेही अवशेष ‘पीडीपी’स मिळावेत, म्हणजे त्या दोन फुटीरतावादी अतिरेक्यांचे यथोचित स्मारक वगैरे उभारता येईल! मीर यांची
मागणी संतापजनक
आहे, पण त्यातही संतापजनक म्हणजे याच पीडीपीशी भाजपने कश्मीरात सत्तेचा संसार साडेतीन-चार वर्षे थाटला होता. याच काळात कश्मीरात सर्वाधिक रक्तपात झाला. पाकडय़ांचे हल्ले झाले. अतिरेक्यांना गौरव प्राप्त झाला व आज दोन अतिरेक्यांचे ‘सांगाडे’ परत करा अशी मागणी करण्यापर्यंत मजल गेली. आमचा प्रश्न इतकाच की, या ‘पीडीपी’च्या मंचावर कालपर्यंत पंतप्रधान मोदींपासून भाजपचे बडे नेते हारतुरे स्वीकारत होते. तेव्हा त्याची वेदना कुणास झाली नाही. पण काल शिवसेना ‘पीडीपी’च्या मंचावर सदिच्छा म्हणून दोन मिनिटांसाठी जाताच जणू आभाळ कोसळल्यासारखे सगळे कोकलू आणि बोंबलू लागले आहेत. तुमच्या सबका साथ सबका विकासमध्ये कालपर्यंत ‘पीडीपी’ होती आणि चंद्राबाबूंची ‘टीडीपी’देखील होतीच. तुमच्याबरोबर होते तोपर्यंत ते ‘महान’ होते व त्यांच्या मजबुरीने साथ सोडताच ते अस्पृश्य झाले. चंद्राबाबूंना खेचून पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आणून त्यांच्यावर गुणगौरवाचा सडा टाकणारे कोण होते? चंद्राबाबूंसारख्यांचे राजकारण व भूमिका याबाबत मतभेद असतील, पण ते हिंदुस्थानातील एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आंध्रची तेलगू जनता त्यांच्या प्रश्नांसाठी लढत आहे. आज तुम्हाला ही जनता अचानक दुश्मन कशी वाटू लागली? एका राज्याची फाळणी झाली आहे. राज्य तोडण्याच्या विरोधात आम्ही आहोत.
राज्य तोडताना
केंद्र सरकारने जी वचने दिली तो शब्द पाळला नाही, असा चंद्राबाबूंचा आरोप आहे व त्या मुद्दय़ावर ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले. शिवसेनेप्रमाणे किंवा अकाली दलाप्रमाणे चंद्राबाबू हे रालोआचे आजीवन सदस्य नाहीत. राजकारणात राजकीय सोयीप्रमाणे खेळ सुरू असतात. उद्याच्या लोकसभा निवडणुकीनंतर जी ‘त्रिशंकू’ स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत त्या वेळी भाजपचे चाणक्य मंडळ पुन्हा चंद्राबाबूंच्या दारात पाठिंब्यासाठी उभे राहणारच नाहीत, याची गॅरंटी काय? तुम्ही तुमच्या सोयीने नाती जोडायची किंवा तोडायची, पण इतरांना ती मुभा नाही. शिवसेनेने राजकारण करताना देशाचा विचार आधी केला. पाठीत वार करून या बोटावरची थुंकी त्या बोटावर करून स्वार्थाचे इमले बांधले नाहीत. चांगल्यास चांगले आणि वाईटास वाईट असे एका हिमतीने तोंडावर बोलण्याची धमक शिवसेनेत आहे. तो स्वाभिमान कुणाच्या पायाशी गहाण ठेवून निर्णय घ्यावा इतकी बिकट परिस्थिती आमच्यावर येणार नाही हे आमच्या प्रिय विरोधकांनी लक्षात घ्यावे. ज्यांच्याशी आमचे मतभेद आहेत अशांच्या ‘मंचा’वर किंवा खाटल्यांवर जाणाऱ्यांनाही आम्ही शुभेच्छा दिल्या. तुमचे ते राजकारण, चाणक्य नीती. मग इतरांचे काय? आम्हाला ‘पीडीपी’ आणि ‘टीडीपी’मधला फरक कळतो. तेवढय़ा प्रखर राष्ट्रभावनेची मशाल आमच्या अंतरात जळत आहे. आमच्यावर जळणाऱ्यांना हे कळावे, बाकी लोभ असावा.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.