HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

शिंदेंच्या बंडात मदत करणाऱ्या ‘या’ नेत्यांच्या पदरी ‘मंत्रिपद’ पडणार?

मुंबई | शिवसेनेत बंड पुकारून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपमुख्यमंत्री बनले खरे पण आता महाराष्ट्रातील या मोठ्या राजकीय नाट्यानंतर या सरकारसाठी आता पुढील आव्हान असणार आहे ते म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार! पण या मंत्रिमंडळात ५ चेहऱ्यांना स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेआहे. कारण या सरकार स्थापनेमध्ये या नेत्यांचं योगदान मोलाचं मानलं जातंय. पण हे पाच चेहरे नक्की कोण? ते जाणून घेऊयात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांची यशस्वीपणे निवड केली आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात 99 विरुद्ध 164 मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकून शिंदे आणि भाजपचं सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी 30 जूनला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण त्यांनी शपथ घेऊनही आता 20 दिवस उलटलेत तरीही अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. पण तरी मंत्रिमंडळात नक्की कोण असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप आणि शिंदे गटामध्ये एकमत झाले आहे, असं सूत्रांचं म्हणणं आहे, ज्यामध्ये भाजपला 28 मंत्रीपद मिळतील, तर शिंदे गटाला 15 मंत्रीपद मिळतील. भाजपच्या 28 मंत्र्यांपैकी उपमुख्यमंत्री पदासह 20 कॅबिनेट मंत्री आणि 8 राज्यमंत्री असतील. तर दुसरीकडे, शिंदे गटाच्या 15 मंत्रिपदांपैकी मुख्यमंत्र्यांसह 11 कॅबिनेट मंत्री आणि चार राज्यमंत्री असतील.

लहान पक्ष आणि अपक्षांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार?

दरम्यान, शिंदे आणि फडणवीस सरकारच्या या मंत्रिमंडळात छोट्या पक्षांच्या आमदारांना आणि अपक्षांना देखील संधी मिळणार असल्याचं बोललं जातंय. विशेष बाब म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एका कार्यक्रमात म्हटलं की नक्कीच सर्वांना सरप्राईज मिळेल. त्यामुळे ही उत्सुकता आणखी वाढली आहे. भाजपला आता स्वतःच्या पक्षातील आमदारांसोबतच इतर मित्र पक्षांनाही नाराज करायचं नाही आहे. कारण या सत्तासंघर्षाच्या काळात या लहान पक्षांची आणि अपक्षांची शिंदे फडणवीस सरकारला मोठी मदत झाली आहे. त्यामुळे आता खाते वाटपात सरकारला त्यांना दुखवायचं नाही आहे. शिंदे-फडणवीस सरकारला ज्यांनी ज्यांनी सरकार स्थापनेत मदत केली त्या सर्व छोट्या पक्षांतील आमदारांना मंत्रिमंडळाचा भाग करून घेणार असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे लहान पक्षांच्या आमदारांना लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात वाटा मिळू शकतो.

1. हितेंद्र ठाकूर

मंत्रिमंडळात ज्यांना नक्कीच स्थान मिळू शकेल अशा काही नेत्यांची नावंही चर्चेत आहेत. त्यापैकी पाच नावं महत्त्वाची असून या नावांना या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर.  जे पालघर जिल्ह्यातील वसई मतदारसंघातील आमदार आहेत, जिथे हितेंद्र ठाकूर यांचा दबदबा आहे. तर हितेंद्र ठाकूर यांच्यासह बहुजन विकास आघाडीकडे वसई, नालासोपारा आणि बोईसरमधून तीन आमदार आहेत. हितेंद्र ठाकूर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. बहुजन विकास आघाडीने 2019 च्या विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं वचन दिलं होतं. अगदी नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमध्येही बहुजन विकास आघाडीचे महत्त्व दिसून आलं. याशिवाय, वसई-विरार महानगरपालिका निवडणुकाही आता जवळ आल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून हितेंद्र ठाकूर किंवा त्यांचा मुलगा क्षितीज यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकतं.

2. रवी राणा

दुसरं नाव आहे ते म्हणजे थेट ठाकरेंना टक्कर देऊ पाहणारे रवी राणा यांचं. राणा दाम्पत्य आणि मातोश्री वाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. गेल्या काही काळात राणा दाम्पत्य हे महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं चर्चेत राहिले आहेत. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा या मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी व खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचा केलेला हट्ट ज्यामुळे राणांना राष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. पण रवी राणा हे शिवसेना आणि ठाकरेंवर विशेषत: गेल्या अडीच वर्षांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने आरोप करत आले. सध्या त्यांनी भाजपाच्या जवळ जाणारी आणि हिंदुत्ववादी भूमिका घेतलेली पहायला मिळते आहे. तर रवी राणा हे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात.  दरम्यान, नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे आता भाजप पुन्हा सत्तेत आल्याने राणा आता मंत्र्यांच्या यादीत स्थान मिळवू पाहणार आहेत.

3. बच्चू कडू

तिसरं नाव आहे प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चू कडू यांचं. महाविकास आघाडी सरकारमधील अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे राज्यातील 2019 च्या राजकीय गोंधळात महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे पहिले होते. दोन आमदारांसह बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती हा पक्ष शेतकर्‍यांचे समर्थन करण्यासाठी ओळखला जातो. चार वेळा आमदार राहिलेले कडू हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक परिचित चेहरा आहेत. यापूर्वी राज्यमंत्री असल्याने ते आता अपक्षांच्या मंत्रिमंडळाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. महत्त्वाचं म्हणजे बच्चू कडू यांनी शिंदे गटाच्या बंडामध्ये मोठी भूमिका बजावली आहे. सेनेच्या या बंडखोर आमदरांसोबत स्वतः कडू सुद्धा प्रत्यक्ष सहभागी होते. त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे याची परतफेड म्हणून त्यांना मंत्रीपद दिलं जाणार असल्याचंही बोललं जातंय.

4. चंद्रकांत पाटील 

पुढचं नाव आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं. 2014 च्या फडणवीस सरकारमधील माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हेही फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मूळचे कोल्हापुरचे आणि सध्या पुण्याचे आमदार असलेले चंद्रकांत पाटील हे एक ओबीसी चेहरा असल्याने त्या दृष्टीने पाटलांना मंत्रिमंडळात स्थान देण्यावर भाजपचं लक्ष असेल आणि मंत्रिमंडळात जाण्यासाठी पाटील यांची उत्सुकता देखील या कारणाला मदत करेल. मात्र, पाटील यांना खरोखरच मंत्रिमंडळात स्थान मिळालं, तर भाजपला ‘एक व्यक्ती, एक पद’ या धोरणानुसार महाराष्ट्र भाजपच्या नव्या अध्यक्षाची निवड करावी लागेल.

5. संजय कुटे

पाचवं जे नाव आहे तेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी असलेले भाजप नेते संजय कुटे. कुटे हे जळगावचे आमदार असून तेही फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. तसेच प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुधीर मुनगंटीवार इत्यादी नेत्यांसह कुटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या बंडात मोलाची भूमिका बजावली होती. शिंदे आणि त्यांच्या आमदारांसोबत सुरतच्या हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला होता. त्यानंतर ते या आमदारांसोबत गुवाहाटीला देखील गेले होते. त्यामुळे तेही भाजपच्या कोट्यातील प्रमुख मंत्र्यांपैकी एक असण्याची शक्यता आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन वाझेला दुसरं समन्स जारी, अनिल देशमुखांविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची करणार चौकशी

News Desk

चंद्रकांतदादा ‘ही’भाजपची मराठा समाजाशी गद्दारी नाही का ?

News Desk

‘ब्रेक द चेन नाही तर चेक द ब्रेन’, नितेश राणेंचा पुन्हा एकदा प्रहार

News Desk