HW News Marathi
Uncategorized

राधाकृष्ण विखे-पाटील आणि अब्दुल सत्तार एकाच मंचावर, भाषणात जुन्या आठवणींना उजाळा!

अहमदनगर। राज्यात एकीकडे सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आज शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील एकाच मंचावर पाहायला मिळाले. राहता तालुक्यातील कोल्हार इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या भूमिपूजनानिमित्त हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर आले होते. बांधा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर कोल्हारमधील जिल्हा परिषद शाळेची उभारणी केली जात आहे. या कार्यक्रमावेळी दोन्ही नेत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमात एका लाभार्थी व्यक्तीनं गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता अब्दुल सत्तार यांनी मी घर बांधून देतो, विटा, माती आणतो असा हास्यविनोद केला.

लोकांना गुदगूल्या करणारे आमच्या जिल्हायातील मंत्री

भाषणावेळी विखे पाटील यांनी सत्तार हे माझे जूने मित्र असल्याचं सांगितलं. राजकारणाच्या पलिकडे आपण मैत्री जपतो. विकासाच्या कामात पक्षीय राजकारणाच्या पलिकडे विचार करावा लागतो. आजकाल कुणी कुणाला भेटलं तर यावर चर्चा होते. पूर्वी निवडणूका संपल्या की विकासात्मक राजकारण व्हायचं. पण आता राजकारणात अस्पृश्यता निर्माण झालीय, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सत्तार यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल त्यांनी सत्तारांचे आभारही मानले. आताच्या राजकारणात कोतेपणाचे लोक झालेत. काही फक्त हसत राहतात. हसून लोकांना गुदगूल्या करणारे आमच्या जिल्हायातील मंत्री आहेत, असंही विखे-पाटील यावेळी म्हणाले.

‘मुख्यमत्र्यांना सांगा आता मंदिरे उघडी करा’

मी राज्य सरकारवर काही बोलणार नाही. एकच विनंती आहे की, एकदा मुख्यमत्र्यांना सांगा आता मंदिरे उघडी करा. तुम्ही मॉल , परमिट रूम , लोकल सुरू केली. मालही सुरू केला, असा टोला यावेळी विखेंनी लगावला. त्यावेळी सत्तारही व्यासपीठावरून म्हणाले की, विखे-पाटील तिसरी लाट थोपवा. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.यावेळी अब्दुल सत्तार यांनीही जोरदार भाषण केलं. सरपंच पदापासून सुरू झालेला प्रवास मंत्रीपदापर्यंत गेला. माझ्या मतदार संघात शिवसेनेच्या मतांची संख्या वाढली. पुर्वी काँग्रेस नंबर एकचा पक्ष होता. मी आणि विखे पाटील यांनी ठरवले. काँग्रेसमधील 42 पैकी 17 आमदारांच्या आतल्या गाठीचे नेते म्हणजे विखे पाटील. त्यांनी आदेश द्यायचा आणि आम्ही ऐकायचं. विखे पाटलांनी कधीही जाती पातीचा विचार केला नाही. मी विखे पाटलांचा कार्यकर्ता, कुटूंबातील सदस्य आहे. आमच्या सध्या मोटारसायकल वेगळ्या आहेत. पन सर्व सामान्यांचे हित हे आमच्यातील साम्य असल्याचं सत्तार यावेळी म्हणाले.

विखे-पाटील यांचा संदेश नक्कीच उद्धवजींना सांगेन

विखे-पाटील म्हणाले दानवेंच्या नादी लागू नका, नाही तर तुमचे रिमोट भोकरदन जाईल. माझ्याकडे ठेवा लोणीचा प्रसाद मिळू शकतो. मी कोणत्याही संकटात विखे-पाटील यांचा सल्ला घेतो. राजकारणात मी मोठा झालो त्यासाठी विखे पाटील यांचे मोठे योगदान आहे, असं सत्तार यांनी आवर्जुन सांगितलं. मंदिर, मस्जिद उघडणे गरजेचं आहे. मात्र, विखे पाटलांनी तिसरी लाट येणार नाही याची खात्री द्यावी. केरळनंतर नागपूरमध्ये करोना वाढतोय. मोदींपेक्षा उद्धव ठाकरे यांना मंदिराबद्दल प्रेम असल्याचं सत्तार यावेळी म्हणाले. तिसरी लाट येणार हे WHO ने सांगितलं आहे. त्यामुळे तिसरी लाट संपल्यानंतर मंदिर उघडण्याचा निर्णय उद्धवजी घेतील. विखे-पाटील यांचा संदेश नक्कीच उद्धवजींना सांगेन. विखे-पाटील माझ्या‌ अगोदरचे शिवसैनिक. त्यांना मी माझ्यासोबत येण्याचे निमंत्रण देतो, अशी टिप्पणीही सत्तार यांनी भाषणाच्या शेवटी केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघरमधील निवडणुकीतील गोंधळा विरोधात जनहित याचिका दाखल

News Desk

आता सेल्फी विथ काऊ

News Desk

ST आंदोलनाचा ग्राउंड रिपोर्ट! थेट BEED मधून

News Desk