HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारा नेता! – देवेंद्र फडणवीस

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारा, माणुसकी असलेला नेता आहे. ज्याचा कुणी नाही, त्याचा मी आहे, ही धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, तोच कित्ता शिंदे हे आज पुढे नेत आहेत. येत्या काळात ते एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम करतील असा विश्वास व्यक्त करुन त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द अधिक यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (4 जुलै) विधानसभेत सांगितले.

विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पारित झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त केला त्याबद्दल सभागृहातील सदस्यांचे आभार मानून उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारांचे ते एक पाईक असून कर्मावर अढळ विश्वास असलेले ते एक नेते आहेत. कुशल संघटक, जनतेचे सेवेकरी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे 1980 मध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेत सक्रिय झाले. कार्यकर्ता, शाखाप्रमुख, नगरसेवक, मंत्री अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन करुन जनसामान्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या शिंदे यांनी सीमाप्रश्नावर अतिशय आक्रमक आंदोलन केले. या आंदोलनातील सक्रिय सहभागामुळे ४० दिवस ते बेलारीच्या तुरुंगात होते, त्यातून त्यांच्या नेतृत्वाचा दबदबा तयार झाला, असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

आपण मांडलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या संकल्पनेला पूर्णत्व देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विभागाचे मंत्री असताना त्यांनी एक विशेष उद्देश वहन संस्था म्हणून शिंदे यांच्या विभागाने उत्तम काम केले. आता या महामार्गाचा एक टप्पा पूर्ण झाला असून या प्रकल्पात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी  शिंदे यांनी प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी देऊन  अडथळे दूर केले. मुंबई-पुण्यातील अंतर कमी करणारी मिसिंग लेन किंवा वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू असे अनेक प्रकल्प राबविताना विभागाचे मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले. आरोग्य हा त्यांचा आवडता विषय असून आरोग्यमंत्री असताना त्यांनी उत्तम काम केले, आरोग्य सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अतिशय चांगल्या व्यवस्था उभ्या केल्या. महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्यात अडकल्याचा प्रसंग असो किंवा कोल्हापुरातील पूरस्थिती असो या संकटांच्या वेळी शिंदे तातडीने मदतीला धावून गेले. कमी बोलायचे आणि अधिक काम करायचे हा स्वभाव आणि संयमामुळे त्यांची जडणघडण झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सामान्य जनता-कार्यकर्त्यांची काळजी घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांना गरीबीमुळे दहावीनंतरचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. अतिशय कष्टाने शिंदे यांनी आपले आयुष्य उभे केले. स्वतःच्या जीवनात अनेक कटू प्रसंग आले, पण न थकता त्यांनी आयुष्य उभे केले. निर्धार करुन वयाच्या ५६ व्या वर्षी ७७ टक्के गुण मिळवून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मुलाला डॉक्टर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने, क्षमतेने उभा असून त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द अधिक यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून हे सरकार कुठल्याही आकसाने, बदल्याच्या भावनेने काम करणार नाही . जे चांगले निर्णय आहेत,  ते कायम करु किंबहुना हे निर्णय पुढे नेण्याच्या दृष्टीनेही काम करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या
शिंदे सरकारने बहुमत चाचणीची अग्निपरीक्षा केली पास; तर महाविकास आघाडी फेल
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहांना स्वाईन फ्लू, उपचार सुरू

swarit

मोदी विरोधी एकजुटीचा ट्रेलर लॉन्च

News Desk

#RamMandir : काँग्रेसने पाठिंबा दिला तर २ मिनिटांमध्ये अयोध्येत राम मंदिर बनेल !

News Desk