HW News Marathi
Uncategorized

ठाणे शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई | ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा व्हावा यासाठी भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी 50 दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेच्या कोट्यातील 20 दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी कोपरी आणि वागळे इस्टेट परिसर तसेच दिवा परिसरासाठी साडेसहा दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

सह्याद्री अतिथीगृहात ठाणे जिल्ह्यातील पाणीप्रश्नाबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, ठाणेचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबल्गन, खा. डॉ श्रीकांत शिंदे, आ. रवींद्र फाटक यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 485 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणीपुरवठा कमी पडतो. हे लक्षात घेऊन बारवी आणि भातसा धरणांतून प्रत्येकी 50 दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. बारवी धरणाची उंची वाढविल्यानंतर या धरणातून शहराला 100 दशलक्ष लिटर पाणी मिळावे असा आग्रह महापालिका प्रशासनाने धरला होता. जलसंपदा विभागाने अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध करून देण्यासाठी पुढील कार्यवाही तात्काळ करावी असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिले. ठाणे मनपाबरोबर कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर मनपा क्षेत्रात आणि जिल्ह्याच्या उर्वरित भागाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही जलसंपदा विभाग, एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी करावी असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिले.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सूर्या धरणातून 218 दशलक्ष लिटर पाणी साठा करण्याबाबत एमएमआरडीएने तात्काळ कार्यवाही करावी. तसेच उल्हासनगर मनपाचाही पाणी प्रश्न सोडविण्याठी एमआयडीसीने योग्य ते नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात यावी असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या पाणी पुरवठा योजनांचा आणि काळू आणि शाई या धरणांच्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्यासोबतच या धरणांच्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टरांनी मांत्रिका बोलावले, रूग्ण महिलेचा मृत्यू

News Desk

लोकसभेतील मोदींच्या भाषणात फक्त ‘नेहरुं’च्या नावाचा उल्लेख

swarit

महाविकासआघाडीच्या खातेवाटपाबाबत शरद पवार म्हणतात…!

News Desk