मुंबई । राज्यातील प्रत्येकाला चांगल्या आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देणे आवश्यक आहे. येत्या दोन वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात यावीत यादृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने तयारी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (२० ऑगस्ट) दिले.
राज्य शासनाने निवडलेल्या जिल्ह्यातील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम आणि कार्यान्वयन आणि संबंधित रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी आशियाई विकास बँकेची आर्थिक आणि तांत्रिक मदत घेण्यात येणार आहे. या संस्थांनी राज्य शासनाला पूर्ण सहकार्य करुन अर्थपुरवठा लवकर करावा, जेणेकरुन या महाविद्यालयांच्या उभारणीचे काम येत्या सहा ते सात महिन्यात सुरु होईल, याबाबतचे नियोजन करण्यात यावे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये तृतीयक वैद्यकीय सेवेची उपलब्धता सुधारणे, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय रुग्णालय उभारण्यावर भर देऊन वैद्यकीय सुविधा सर्वसामान्यांना उपलब्ध करणे आणि शिक्षण तसेच कौशल्य प्रशिक्षण यांच्या आधारे सक्षम मानवी संसाधनाची उपलब्धता सुधारणे यावर येत्या काळात भर देण्यात येईल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.
हवामान बदल आणि पूरस्थिती नियंत्रणासाठी राज्य शासनास मदत करण्याची आशियाई विकास बँकेची तयारी
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती वारंवार निर्माण होत आहे. ही परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ नये यासाठी पूराच्या पाण्याचे नियोजन तसेच गेल्या काही वर्षांपासून होत असलेले हवामान बदलावरील उपाययोजना याबाबत आशियाई विकास बँक महाराष्ट्र शासनाला मदत करणार आहे. आशियाई विकास बँक आता वैद्यकीय शिक्षण शिवाय जलसंपदा विभागाबरोबरही विविध विषयावर एकत्रितपणे तांत्रिक अभ्यास करणार आहे. यापूर्वी आशियाई विकास बँकेने आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ या राज्यांत काम केले असून त्यांच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्रालाही होणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
आशियाई विकास बँकेचे प्रतिनिधी आणि इंटरनॅशनल फायनान्सिंग कॉर्पोरेशनचे प्रतिनिधी यांनी काल सह्याद्री अतिथीगृह येथे संबंधित विषयाबाबतचे सादरीकरण केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.