HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“…भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये”, सामनातून काँग्रेसला सल्ला

मुंबई | “पटोले-थोरात वाद चिघळू नये. टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये ही अपेक्षा”, असा सल्ला ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या (saamana) अग्रलेखातून काँग्रेसला दिला आहे. थोरातांच्या बंडामुळे काँग्रेस (Congress) पक्षाच्या उरलेल्या फांद्या हलू लागल्या आहेत. नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबत काम करणे कठीण आहे, असे सांगून बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thora) विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. पटोले विरुद्ध थोरात हा वाद बरेच दिवस खदखदत होता, असे सामनात म्हटले आहे.

दरम्यान, “बाळासाहेब थोरातांसारख्या नेत्याने बंडाचे दंड थोपटल्याने भाजपच्या मनी उकळय़ाच फुटल्या असतील. म्हणून थोरातप्रकरणी काँग्रेसने सावध राहायला हवे. थोरांताच्या धमन्यांत काँग्रेस विचारांचेच रक्त आहे, पण आज ते संतापले आहेत. सत्यजीत तांबे हे पदवीधर मतदारसंघात निवडून आले व म्हणाले, मी कोणत्याच पक्षात जाणार नाही. काँग्रेसकडे शहाणपण असते तर विधान परिषद निवडणुकीतील सत्यजीत तांबे यांच्या विजयानंतर त्यांनी थोरातांशी चर्चा करून या प्रकरणावर सन्माननीय पडदा टाकला असता. पण वाडा पडला तरी अहंकाराचा झेंडा फडकत ठेवायचा हे धोरण दिसते”, असे सामनात म्हटले आहे. “राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या यशानंतर काँग्रेसला अनेक राज्यांत संजीवनी मिळताना दिसत आहे. पण महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आज जे घडतेय ते याच्या अगदी विपरीत आहे आणि त्यामुळे त्या पक्षाचेच नुकसान होऊ शकते. संसदेत राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावर जोरदार भाषण करून पंतप्रधान मोदींसमोर आव्हान उभे केले आहे. अशा वेळी त्यांच्या पक्षातील नेत्यांनी मतभेद गाडून एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. पटोले-थोरात वाद चिघळू नये. टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये ही अपेक्षा. पटोले व थोरात हे शहाणे नेते आहेत. फार काय बोलावे?”, असेही सामनात म्हटले.

 

सामानात नेमके काय म्हणाले

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या यशानंतर काँग्रेसला अनेक राज्यांत संजीवनी मिळताना दिसत आहे. पण महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आज जे घडतेय ते याच्या अगदी विपरीत आहे आणि त्यामुळे त्या पक्षाचेच नुकसान होऊ शकते. संसदेत राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावर जोरदार भाषण करून पंतप्रधान मोदींसमोर आव्हान उभे केले आहे. अशा वेळी त्यांच्या पक्षातील नेत्यांनी मतभेद गाडून एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. पटोले – थोरात वाद चिघळू नये. टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये ही अपेक्षा. पटोले व थोरात हे शहाणे नेते आहेत. फार काय बोलावे ?

बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे जुनेजाणते व महत्त्वाचे नेते आहेत. थोरात हा महाराष्ट्र काँग्रेसचा एक निष्ठावंत चेहरा आहे. अनेक वाद-वादळांत श्री. थोरातांनी काँग्रेसला धरून ठेवले. अत्यंत संयमी व शांत असे त्यांचे नेतृत्व आहे, पण थोरातांनी सध्याचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. थोरातांच्या बंडामुळे काँग्रेस पक्षाच्या उरलेल्या फांद्या हलू लागल्या आहेत. नाना पटोले यांच्यासोबत काम करणे कठीण आहे, असे सांगून थोरातांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. पटोले विरुद्ध थोरात हा वाद बरेच दिवस खदखदत होता. त्यास आता उघड तोंड फुटले. थोरातांच्या संयमाचा बांध फुटल्यामुळे हे घडले काय? याचा विचार आता त्यांच्या हायकमांडने केला पाहिजे. थोरात हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांचा खांदा एका अपघातामुळे निखळला आहे व हात गळय़ात बांधला आहे. तरी ते एकहाती मैदानात उतरून लढण्याच्या मनःस्थितीत आहेत. याचा अर्थ ते खूप दुखावले आहेत व आरपारच्या लढाईस सिद्ध आहेत. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. विदर्भातील दोन जागा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसने जिंकल्या. नाशिक पदवीधर मतदारसंघात डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली असताना त्यांनी अर्ज न भरता पुत्र सत्यजीत तांबे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. त्यामुळे तांबे पिता-पुत्रांना काँग्रेस पक्षातून निलंबित केले गेले. सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे युवा नेते व थोरातांचे ‘भाचे’ आहेत. तांबे-थोरात कुटुंबाचे संगमनेरमध्ये वर्चस्व आहे. तांबे प्रकरणात आपल्याला विश्वासात घेतले नाही व

ज्येष्ठता असूनही अपमानित

केले, असा संताप बाळासाहेब थोरातांचा आहे व त्यात तथ्य असू शकते. थोरात यांच्यासारख्या नेत्यांचा सन्मान नाही राखायचा, तर कोणाचा राखायचा? थोरात हे पटोले यांच्या आधी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते व महाविकास आघाडीचे सरकार असताना थोरातांची भूमिका समन्वयाचीच होती हे मान्य करावेच लागेल. महाविकास आघाडीचे सरकार पडले किंवा पाडले गेले त्यामागे अनेक कारणे असली तरी मुख्य कारण म्हणजे, विधानसभा अध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी दिलेला तडकाफडकी राजीनामा. पटोले यांचा राजीनामा हा शहाणपणाचा निर्णय नव्हता व तेथूनच संकटाची मालिका सुरू झाली. ती नंतर थांबली नाही. विधानसभा अध्यक्षपद हे आघाडी सरकारात महत्त्वाचे ठरते. अध्यक्षपदी पटोले असते तर पुढचे अनेक पेच टाळता आले असते व पक्षांतर करणाऱ्यांना जागेवरच अपात्र ठरवणे सोपे झाले असते. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी होऊच दिली नाही व त्याचाच फायदा पुढे ‘खोके’बाज आमदार व त्यांच्या दिल्लीतील ‘महाशक्ती’स मिळाला. तेव्हा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय हा घिसाडघाईचा व अपरिपक्व होता. पुढे हेच पटोले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. पण महाराष्ट्राचे चांगले चाललेले सरकार त्यांच्या एका निर्णयामुळे कायमचे संकटात आले हे सत्य मान्य करावेच लागेल. पटोले हे मेहनती आहेत व भारतीय जनता पक्षात बंड करून ते काँग्रेस पक्षात आले. ते पक्षवाढीसाठी कष्ट घेतात, पण संकटकाळात ज्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले अशा ‘घराण्यां’शी नाहक पंगा घेऊन राज्यात त्यांचा पक्ष कसा वाढणार? पटोले यांनी

वाद न वाढवता पक्ष पुढे नेला

तर 2024 साली महाविकास आघाडीस नक्कीच फायदा होईल. नाहीतर 2024 आधी कमळाबाईवरील भुंगे काँग्रेसच्या उरलेल्या मधाच्या पोळय़ावर बसतील. सत्यजीत तांबे यांच्यावर आमचे लक्ष आहे, असे एक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलेच आहे. भारतीय जनता पक्षाने कार्यकर्ते घडविण्यासाठी रामभाऊ म्हाळगी संस्थेची स्थापना केली, पण भाजप इतरांनी घडवलेले व बनवलेले कार्यकर्ते उचलूनच स्वतःच्या इमारतीचे इमले रचत आहे. नगर जिल्हय़ात त्यांनी आधी विखे-पाटलांना ‘मेकअप’ करून भाजपमध्ये आणले व आता त्यांचा सत्यजीत तांबेंवर डोळा आहे. त्यात बाळासाहेब थोरातांसारख्या नेत्याने बंडाचे दंड थोपटल्याने भाजपच्या मनी उकळय़ाच फुटल्या असतील. म्हणून थोरातप्रकरणी काँग्रेसने सावध राहायला हवे. थोरांताच्या धमन्यांत काँग्रेस विचारांचेच रक्त आहे, पण आज ते संतापले आहेत. सत्यजीत तांबे हे पदवीधर मतदारसंघात निवडून आले व म्हणाले, मी कोणत्याच पक्षात जाणार नाही. काँग्रेसकडे शहाणपण असते तर विधान परिषद निवडणुकीतील सत्यजीत तांबे यांच्या विजयानंतर त्यांनी थोरातांशी चर्चा करून या प्रकरणावर सन्माननीय पडदा टाकला असता. पण वाडा पडला तरी अहंकाराचा झेंडा फडकत ठेवायचा हे धोरण दिसते. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या यशानंतर काँग्रेसला अनेक राज्यांत संजीवनी मिळताना दिसत आहे. पण महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आज जे घडतेय ते याच्या अगदी विपरीत आहे आणि त्यामुळे त्या पक्षाचेच नुकसान होऊ शकते. संसदेत राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावर जोरदार भाषण करून पंतप्रधान मोदींसमोर आव्हान उभे केले आहे. अशा वेळी त्यांच्या पक्षातील नेत्यांनी मतभेद गाडून एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. पटोले-थोरात वाद चिघळू नये. टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये ही अपेक्षा. पटोले व थोरात हे शहाणे नेते आहेत. फार काय बोलावे?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील २६ अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा केला ‘या’ योजनेत समावेश

News Desk

नांदेडात शेकडो क्विंटल बोगस बियाणे जप्त

Aprna

काँग्रेस सावरकरविरोधी नाही !

News Desk