HW News Marathi
महाराष्ट्र

‘हे तर दुतोंडी साप आहेत’!,नीलम गोऱ्हे यांचा नारायण राणेंवर वार

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे जनाशीर्वाद यात्रेवर आहेत. या यात्रेची सुरुवात त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहबे ठाकरे यांच्या स्मारकाला वंदन करून केली आहे. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाष्य देखील केलं. यावरून आता राजकारण चांगलंच पेटलं आहे. शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर हल्ला चढवला आहे. बाळासाहेबांबद्दल आदर आणि उद्धव ठाकरेंविषयी गरळ, हे तर दुतोंडी साप आहेत, अशा शब्दात त्यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला आहे.

दुतोंडी सापासारखे ह्यांचे वर्तन

नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या समाधीला वंदन करून नंतर उद्धव ठाकरेंच्या विरोधात भाष्य केले आहे. एका बाजूला बाळासाहेबांप्रति आदर व्यक्त करायचा आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी राज्याची सेवा करण्यासाठी आशीर्वाद दिले होते, त्या उद्धव ठाकरेंविषयी सातत्याने गरळ ओकायची म्हणजे दुतोंडी सापासारखे ह्यांचे वर्तन आहे, असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी राणेंवर टीका केली आहे.

राणेंना मीडिया प्रसिद्धी देत नाही म्हणून ते रोज बोलतात

देवेंद्र फडणवीस यांनी राणेंचे समर्थन केले ही त्यांची मजबुरी आहे. ते नारायण राणे यांच्यामागे फरफटत जात आहेत. ह्या फरफटत जाण्याचा अर्थ काही दिवसांत त्यांच्या लक्षात येईल. आमच्यावर बोलत राहिल्याशिवाय नारायण राणेंना मीडिया प्रसिद्धी देत नाही म्हणून ते रोज बोलतात, असा टोलाही त्यांनी राणेंना लगावला आहे.

‘उथळ पाण्याला खळखळाट फार’

नीलम गोऱ्हे यांनी राणेंवर टीकांचा बाण सोडला आहे. मुंबई महापालिकेच्या नाटकाचा प्रयोग चार वेळा झालाय. मुंबई आणि कोकणवासीयांचे शिवसेनेवर किती प्रेम आहे हे सर्वांनी पाहिले आहे. कोरोना काळात ज्या प्रकारची सेवा शिवसेनेने केले ते कधीच कुणी नाकारणार नाही. मंत्री पद मिळाले म्हणून सतत बोलत राहून लोकांची दिशाभूल करत राहणे एवढाच त्यांचा अजेंडा आहे. मराठीत म्हण आहे ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ तशा पद्धतीचं त्यांचं बोलणं आहे, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : केंद्राने राज्यातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांना तातडीने चाचणीची परवानगी द्यावी, आरोग्यमंत्री

swarit

आयुक्तावर शाईफेक प्रकरणी पोलिसांनी रवी राणांवर ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल

Aprna

जयंत पाटलांची ‘ती’ इच्छा पूर्ण होणं कठीण, शरद पवारांचं कुटुंब खूप मोठं !, मुनगंटीवारांचा टोला

News Desk