HW News Marathi
महाराष्ट्र

राहुल गांधींविरोधात दापोलीतून तालुक्यातून याचिका दाखल!

रत्नागिरी | दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी राहुल गांधी यांनी एक ट्विट केले होते, आणि या ट्विट वरून आता ते अडचणीत सापडले आहेत. पीडितेच्या आई – वडिलांचा फोटो ट्विट करून राहुल गांधींनी सहानुभूती दाखवली होती. त्यामुळे ट्विटरनं त्यांचं खातं तात्पुरतं बंद केल्याची कारवाईनंतर आता त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

दापोलीत याचिका दाखल

राहुल गांधींवर आता रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातून याचिका दाखल केली गेली आहे. भाजपचे दापोली तालुका अध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी अ‍ॅड. पंकज सिंग आणि अ‍ॅड. गौतम यांच्या मार्फत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यामध्ये पीडित मुली किंवा महिलेची ओळख गुप्त राखणं आवश्यक असतं. असं असतानाही राहुल गांधी यांनी दिल्लीतील पीडित मुलीच्या आई-वडिलांचे फोटो ट्विटरवर शेअर करून त्यांना अडचणीत आणलं आहे, असा आरोप म्हादलेकर यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात पॉक्सो आणि जुवेनाइल जस्टिस अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ट्विटरला नोटीस बजावली

पीडितेच्या पालकांचे फोटो ट्विट केल्यानंतर दलित पॉझिटिव्ह मूव्हमेंटचे रवी पी. यांनी ट्विटरला नोटीस बजावली होती. त्यानंतर ट्विटरने राहुल गांधी यांचं खातं तात्पुरतं बंद केलं होतं. काही वेळानंतर ते सुरू करण्यात आलं. आता मकरंद म्हादलेकर यांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळं राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणार आहेत.

राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं बंद

राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबियां सोबत फोटो ट्विट केला होता. या फोटो वरून सगळ्यांनी आक्षेप देखील घेलता होता. ट्विटरने राहुल गांधींचं अकाउंट बंद केल्या नंतर काँग्रेसने ती माहिती ट्विटर द्वारे दिली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस पाठत बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणारे ट्विट हटवण्याची मागणी केली होती. “राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं बंद करण्यात आलं असून ते पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे,” अशी माहिती काँग्रेसकडून ट्वीट करत देण्यात आली. तोपर्यंत राहुल गांधी इतर माध्यमातून तुमच्या संपर्कात राहतील आणि लोकांसाठी आपला आवाज उठवत राहतील असंही काँग्रेसने म्हटलं आहे.

भाजपने केली तक्रार

राहुल गांधी यांच्या ट्विटची तक्रार भाजपने केली असा आरोप काँग्रेस पक्षाने लावला आहे. “भाजपाने केलेल्या तक्रारीच्या आधारे राहुल गांधींचं ट्विटर खातं लॉक करण्यात आलं आहे. बलात्कार पीडित मुलीला न्याय देण्याऐवजी भाजपा आणि मोदी सरकार ट्विटरला भीती दाखवण्यात व्यस्त असून राहुल गांधींचाही बेकायदेशीरपणे पाठलाग करत आहे. त्यांनी याच वेळेचा वापर पीडितेला न्याय देण्यासाठी केला असता तर दिल्ली आज एक सुरक्षित ठिकाण असतं,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे संपर्क विभाग प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली आहे.

काय आहे ट्विट?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सकाळी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिल्ली छावणी परिसरातील पीडितेच्या घरी जाऊन राहुल गांधी यांनी आईवडिलांसह कुटुंबियांची भेट घेतली. पीडितेच्या कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर राहुल गांधींनी याबद्दल माहिती दिली. “मी पीडितेच्या कुटुंबियांशी बोललो, त्यांना न्याय हवाय. त्यांचं म्हणणं आहे की, त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. त्यांची मदत करायला हवी. आम्ही मदत करू. मी त्यांना आश्वस्त केलं आहे की, न्याय मिळेपर्यंत राहुल गांधी तुमच्यासोबत असेल”, असं राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरोपीला माफ केले जाणार नाही, संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्याची प्रतिक्रिया 

News Desk

बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही, मनसेचा सरकारला टोला

News Desk

आॅक्सिजन अभावी जवानाचा मृत्यू

News Desk