मुंबई। नवरात्र उत्सवानिमित्त राज्यभर आज मंदिर खुली करण्यात आली आहे. तर आजपासून घटस्थापना होत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. उद्यापासून ‘घट’ बसतील पण गेलं दीड वर्ष घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?, असा सवाल शालिनी ठाकरे यांनी केला आहे.शालिनी ठाकरे यांनी ट्विट करून हा खोचक सवाल केला आहे. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री आणि वर्षा या निवासस्थानातूनच कामे केली होती. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीची पाहणीही केली होती. तोच धागा पकडून शालिनी ठाकरे यांनी ही टीका केली आहे.
महाराष्ट्र सरकारला सद्भबुद्धी लाभो अशी प्रार्थना करण्यात येणार आहे
आजपासून नवरात्र उत्सवाला संपूर्ण देशात सुरुवात होत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील जागृत देवींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिवसाला एक असे गाऱ्हाणे घालून महाराष्ट्र सरकारला सद्भबुद्धी लाभो अशी प्रार्थना करण्यात येणार आहे. आज महाराष्ट्रात महिलांवरील वाढत चालले अत्याचार, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना शासकीय मदत, खड्डेमय रस्ते, हिंदू सणांवर कोरोनाच्या निमित्ताने आणलेले निर्बंध, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया स्थगित आणि असे अनेक विषय प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र जनतेची फसवणूक करत आहे. जनतेचा आवाज या बहिऱ्या सरकारपर्यंत आईच्या माध्यमातून पोहचावा अशी आशा आहे, असंही शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उद्यापासून 'घट' बसतील पण गेलं दीड वर्ष घरातच 'घट्ट' बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?#महिलाअत्याचार #ओलादुष्काळ #खड्डेमयरस्ते #
— Shalini Thackeray (@ThakareShalini) October 6, 2021
राज्यातील सर्व मंदिरं खुले करण्याचा निर्णय घेतला होता
तब्बल दीड वर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील जनतेला मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेता येणार आहे. राज्य सरकारने कोरोनाचे सर्व नियम पाळून आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरं खुले करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज पहाटेच राज्यातील सर्व प्रसिद्ध मंदिरांची दारं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीचे साई बाबा मंदिर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, शेगावचे गजानन महाराज मंदिर, पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, तुजळापुरातील भवानी मातेचं मंदिर आजपासून सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.