HW News Marathi
महाराष्ट्र

पेगॅसस प्रकरणात केंद्राची लपवाछपवी, मायबाप सरकार खरं बोला, पेगॅसस वापरले की नाही?

मुंबई। “मोदी सरकार म्हणते, पेगॅसस विषयावर प्रतिज्ञापत्र दिलेच तर अतिरेकी संघटनांचा फायदा होईल. प्रश्न इतकाच आहे की, पेगॅसस वापरले की नाही?, असा थेट सवाल करत पत्रकार, राजकीय पुढारी हे अतिरेकी आहेत काय? यांसारख्या प्रश्नांना केंद्र सरकारने वळण दिले आहे”, अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.“सत्य बोलण्याची जबाबदारी फक्त सामान्य लोकांवर आहे. मायबाप सरकारवर नाही. खरे बोला, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगताच, खरे बोललात तर देश धोक्यात येईल असे सांगितले गेले. मग देश असा-तसाही धोक्यातच आहे. ‘पेगॅसस’मुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले इतकंच”, असंही अग्रलेखात शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

पेगॅससच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात आली

“पेगॅसस हेरगिरी प्रकरणात केंद्र सरकार लपवाछपवी करीत आहे हे आता नक्की झाले आहे. पेगॅसस या इस्रायली स्पायवेअरद्वारा आपल्याच देशातील नागरिकांवर पाळत ठेवल्याचे प्रकरण समोर आले तेव्हा देशात एकच गोंधळ उडाला. केंद्रातले दोन मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार, पत्रकार अशा शे-पाचशे लोकांवर पेगॅससच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात आली. यावर संसदेत चर्चा व्हावी व गृहमंत्र्यांनी त्यावर उत्तर द्यावे ही एवढीच विरोधकांची मागणी होती. सरकारने ती फेटाळली. त्यामुळे संसदेचे अधिवेशन धडपणे पार पडू शकले नाही. संसदेतही विरोधकांचा तोच प्रश्न होता, पेगॅसस स्पायवेअरचा वापर झाला की नाही? तेथेही सरकारने चर्चेपासून पळ काढला व आता सर्वोच्च न्यायालयातही सरकार मूग गिळून बसले आहे.”

संसद आणि न्यायालयास किंमत द्यायची नाही हे केंद्र सरकारने ठरवून टाकले

राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली पेगॅससवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास नकार दिला. सरकारने पाळतीसाठी ‘स्पायवेअर’चा वापर केला असेल तर तो कायदेशीर होता की नाही? इतकेच सर्वोच्च न्यायालयास जाणून घ्यायचे होते. पण संसद आणि न्यायालयास किंमत द्यायची नाही हे केंद्र सरकारने ठरवून टाकले आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा नक्कीच महत्त्वाचा आहे. त्याविषयी कोणाला शंका असण्याचे कारण नाही. पण राष्ट्रीय सुरक्षेची काळजी फक्त मोदी सरकारला आहे व संसदेतील विरोधी पक्ष,आपल्या सर्वोच्च न्यायालयास नाही हा त्याचा अर्थ नाही.”

महाराष्ट्रातील सरकारला तर ‘तालिबानी’ वगैरे म्हणेपर्यंत मजल गेली

“जेथे भाजपची सरकारे नाहीत तेथील मुख्यमंत्र्यांना, सरकारांना यापेक्षा घाणेरडी विशेषणे लावून बदनाम केले जात आहे. महाराष्ट्रातील सरकारला तर ‘तालिबानी’ वगैरे म्हणेपर्यंत मजल गेली. हे सांगायचे ते यासाठीच की, केंद्र सरकारविरोधात जे आहेत ते सगळे राष्ट्रीय सुरक्षेचे, राष्ट्रहिताचे मारेकरी ठरवून त्यांच्यावर पाळत ठेवली जात असेल तर कसे व्हायचे? पेगॅसस स्पायवेअरचा सर्वसामान्य नागरिकांवर पाळत ठेवण्यासाठी बेकायदेशीर वापर केल्याने घटनेतील कलम 21 अंतर्गत गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन झालेच आहे. हे सर्व प्रकरण जे घडले त्यावर सरकार तोंड उघडायला तयार नाही.”“राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली नागरी स्वातंत्र्याचे उल्लंघन झालेच आहे. केंद्र म्हणते, पेगॅसस विषयावर प्रतिज्ञापत्र दिलेच तर अतिरेकी संघटनांचा फायदा होईल. प्रश्न इतकाच आहे की, पेगॅसस वापरले की नाही?”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपुरमध्ये रामदास आठवलेंच्या हस्ते शालेयवस्तूंचे वाटप

News Desk

आजोबांच्या काळजी पोटी नातवाची लोकांना कळकळीची विनंती !

News Desk

पाच महिन्यांत १९ हजार ५५३ तरूणी, महिला बेपत्ता

Sanjay Jog