HW News Marathi
महाराष्ट्र

“दैनिक सामनाचा राऊतांकडून स्वत:च्या फायद्यासाठी गैरवापर होतोय”, चित्र वाघांचं प्रत्युत्तर

मुंबई | महाविकासआघाडी आणि विरोधी पक्ष नेहमीच एकमेकांवर टीका करत असतात. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ यांच्या मध्ये मतभेद हे कायम होताच असतात. एल्गार परिषद प्रकरणातील संशयित आरोपी स्टॅन स्वामी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुस्कटदाबी करणाऱ्या जागतिक नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदी यांचे नाव प्रसिद्ध होत असताना मुंबईत फादर स्टॅन स्वामी यांचा तडफडून आणि गुदमरून मृत्यू झाला, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्याला भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पंतप्रधान मोदी हे स्टॅन स्वामी यांना घाबरायचे

संजय राऊत आपल्या विरोधी पक्षावर नेहमीच टीका करत असतात. यावेळीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भाजप च्या प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ यांनी त्यांच्या ट्विटद्वारे राऊतांना प्रत्युत्तर केलं आहे. ज्या प्रकारे इंदिरा गांधी जॉर्ज फर्नांडिस यांना घाबरत होत्या तसंच पंतप्रधान मोदी हे स्टॅन स्वामी यांना घाबरत होते, याचा जावाई शोध राऊत यांनी लावला, असं म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना चांगलंच फटकारलं आहे. वाघ यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

सामना स्वतःच्या फायद्यासाठी वापरला जातोय

संजय राऊतांनी पंतप्रधानांवर टीका केलं केलायवर भाजपच्या चित्र वाघनी सुद्धा राऊतांवर निशाणा साधला आहे. यावेळेस त्यांनी थेट सामानावर निशाणा साधला. दैनिक सामना हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आला. पण त्यांच्या विचारांना बगल देत संजय राऊत स्वत:च्या फायद्यासाठी गैरवापर करत आहे. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील मुख्य आरोपींना राऊत आपल्या लेखणीतून बळ देत असल्याचा आरोपही चित्रा वाघ यांनी केला आहे.

काय होता सामना अग्रलेख?

‘मुस्कटदाबी’ करणाऱया जागतिक नेत्यांच्या यादीत आपले पंतप्रधान मोदी यांचे नाव चमकले आहे. जगातील काही देशांत हुकूमशाहीसदृश परिस्थिती आहे. त्या देशांत प्रसारमाध्यमांचा गळा आवळला जातो. अशा ‘मुस्कटदाबी’ करणाऱया देशांच्या यादीत हिंदुस्थानच्या पंतप्रधानांचे नाव यावे हे आश्चर्यच आहे. हिंदुस्थानात स्वातंत्र्याच्या बाबतीत परिस्थिती तितकीशी हाताबाहेर गेलेली नाही. सरकारविरुद्ध बोलणाऱयांना देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकले जाते. त्यात काही पत्रकारांचाही समावेश आहे हे खरेच आहे. तरीही हिंदुस्थानी पत्रकार आपला आवाज व गळा दाबणाऱयांशी दोन हात करताना दिसतात. मुस्कटदाबी करणाऱया जागतिक नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदी यांचे नाव प्रसिद्ध होत असताना मुंबईत फादर स्टॅन स्वामी यांचा तडफडून आणि गुदमरून मृत्यू झाला. स्वामी हे राष्ट्रीय तपास एजन्सीच्या ‘कस्टडी’त बऱयाच काळापासून होते. त्यांचे वय 84 वर्षे. त्यांना ऐकता, बोलता येत नव्हते. दिसतही नव्हते. त्यांच्या हालचाली व श्वास पूर्ण मंदावला असताना तुरुंगातच त्यांना कोरोनाने ग्रासले. जीवनाच्या अंतिम समयी त्यांना झारखंड येथे जाऊन मित्रांसमवेत वेळ घालवायचा होता. पण स्वामी यांच्यावर दहशतवाद, फुटीरतावाद, राज्य उलथवून लावण्याच्या कटात सहभागी होण्याचा आरोप होता. 84 वर्षांचा एक गलितगात्र राजशकट उलथवून टाकू शकतो इतका हा देश भुसभुशीत पायावर उभा आहे का?

आणीबाणीच्या कालखंडात जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर देश उलथविण्याचा कट रचल्याचा आरोप तेव्हाच्या सरकारने लावला. फर्नांडिस यांच्याकडे त्यासंदर्भातले फक्त छापील प्रचारसाहित्य वगैरे सापडले नाही, तर डायनामाईट बॉम्ब खटल्यात ते आरोपी होते. राज्यकर्त्यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी फर्नांडिस व त्यांच्या सहकाऱयांनी ‘डायनामाईट’ स्फोटकांचा वापर करून बॉम्ब फोडले. इंदिरा गांधींनी त्या काळात जॉर्ज फर्नांडिस यांची प्रचंड भीती घेतली होती. जॉर्ज तेव्हा तरुण नेते होते. फादर स्टॅन स्वामींप्रमाणे ते जर्जर, मूकबधिर, अंध झाले नव्हते. इंदिरा सरकार ‘अँग्री यंग मॅन’ जॉर्जला घाबरले. पण आजचे सरकार 84-85 वर्षांच्या फादर स्टॅन स्वामी, वरवरा राव यांना घाबरले आहे. स्टॅन स्वामींची तर तुरुंगात हत्याच झाली व नव्वदीतले वरवरा राव हे तुरुंगातच जीवनाशी झुंज देत आहेत. ‘‘फादर स्टॅन स्वामींचे निधन यातनादायी आहे. पोलीस यंत्रणा आणि न्यायालयाच्या कार्यपद्धतीने मी निराश झालो आहे.’’ असे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन लोकुर यांनी म्हटले आहे. जगभरातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी 84 वर्षांच्या स्टॅन स्वामींना जामीन द्यावा यासाठी विनंती केली. जर्मनीच्या मानवाधिकार आयुक्तांनी, संयुक्त राष्ट्रानेही विनवणी केली. पण पाण्याचा ग्लास उचलून तोंडासही लावू न शकणाऱया फादर स्वामींना शेवटी तुरुंगातच मारण्यात आले. एल्गार परिषद हे एक जहर पसरवणारे थोतांडच होते, तेथील जहरी आरोळय़ा व गर्जना ज्यांनी केल्या त्यांचे समर्थन कोणीच करू नये. पण त्यानिमित्ताने नंतर जे घडविण्यात आले ते ‘मुस्कटदाबी’चे षड्यंत्रच म्हणावे लागेल. सरकार उलथविण्याचा कट! राज्य उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र, देशद्रोह आणि देशविघातक कारवाया म्हणजे काय? जंगलातील आदिवासींना त्यांच्या हक्कांची, स्वातंत्र्याची जाणीव करून देणे हे देश उलथवून टाकणे झाले काय? विद्रोहाची ठिणगी टाकून मने पेटवणे हा देशद्रोह कसा होऊ शकतो? नामदेव ढसाळ, राजा ढाले यांच्या कवितांचा अनुवाद जगभरात गेला. त्यांच्या कवितेतला विद्रोह हा कुणाला देश उलथवण्याचा प्रकार वाटला नाही. गुलामांना गुलाम असल्याची जाणीव करून देण्यातच मानवता व स्वातंत्र्याचा लढा आहे, असे डॉ. आंबेडकरांनी सांगितले तो काय देश उलथवून टाकण्याचा प्रयोग होता? आग लावा त्या मंत्रालयाला असे सांगून तरुणांचे रक्त पेटविणारे बाळासाहेब ठाकरे हे काय देश उलथवून टाकण्याचे कारस्थान रचत होते? कम्युनिझमच्या विविध प्रवाहांशी आपले मतभेद आहेत. माओवाद, नक्षलवाद हे भयंकर प्रकार आहेत. पण माओवाद्यांचा राजकीय पक्ष, संघटना, सत्ता, व्यवस्था जगात अनेक ठिकाणी आहे. ते सर्व लोक कश्मीरातील अतिरेक्यांपेक्षा भयंकर आहेत हे मान्य केले तरी 84 वर्षांच्या विकलांग, हतबल फादर स्टॅन स्वामींच्या तुरुंगातील हत्येचे किंवा मृत्यूचे समर्थन होऊ शकत नाही!

‘‘फादर स्टॅन स्वामी यांना न्याय व मानवी हक्क मिळायला काहीच हरकत नव्हती,’’ असे अश्रू आज अनेकजण ढाळत आहेत, पण उपयोग काय? 1 जानेवारी 2018 रोजी पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन केले. त्या मंचावर अनेक बिनबुडाचे लोक येऊन चिथावणीखोर, देशविघातक वक्तव्ये करून गेले. त्यानंतर महाराष्ट्रात उसळलेल्या जातीय दंगलीत सरकारी मालमत्तेची राखरांगोळी झाली. भयानक जहरी वातावरण राज्यात निर्माण झाले. फुले-आंबेडकर-शाहूंचे सदैव नाव घेणारा महाराष्ट्र भीमा-कोरेगाव प्रकरणात हतबल व असहाय्य झालेला दिसला. सरकारने दंगलखोरांना रोखण्यासाठी साधी काठीही उगारली नाही. पोलिसांवर हल्ले झाले. या काळात महाराष्ट्रातील सरकार जणू भूमिगत झाले होते व प्रकाश आंबेडकर अप्रत्यक्षपणे दंगलीचे समर्थन करीत असताना दिसले. विद्वेष इतका टोकाचा होता की, टी-शर्टस्वर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेल्या तरुण पोरांवर जीवघेणे हल्ले झाले. या सगळय़ाला खरेच फादर स्टॅन स्वामी, कवी वरवरा राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलखाच जबाबदार होते की आणखी कोणी? कारण भीमा-कोरेगाव दंगलीचे सूत्रधार म्हणून या सगळय़ांना अटका झाल्या व त्यांच्यावर राज्य उलथवून टाकण्याचे आरोप लावले. आनंद तेलतुंबडे हे एक विचारवंतही याच प्रकरणी तुरुंगात आहेत. हे सर्व लोक एका विशिष्ट विचारसरणीचे आहेत व त्यांची भूमिका विद्रोह किंवा बंडखोरीची आहे. साहित्य, लिखाण, कविता यातून ते विद्रोह व्यक्त करतात. त्यातून राज्य उलथवले जाईल काय, हाच प्रश्न आहे. फादर स्टॅन स्वामी हे झारखंडच्या आदिवासी भागात सामाजिक कार्य करीत होते. आदिवासी मुलांची शैक्षणिक उन्नती व्हावी, त्यांनी जागरुक व्हावे, त्यांना मानवाधिकार मिळावेत यासाठी त्यांचा संघर्ष होता. त्यांचे सारे जीवन गरीब, वंचितांना समर्पित होते. ते माओवादी विचारांचे होते की नक्षलवादी हा तपासाचा भाग. पण महाराष्ट्रातील तुरुंगातही ते कैद्यांच्या मानवाधिकारविषयी लढत होते. फादर स्टॅन यांना अंतिम समयी जामिनावर सोडावे अशी विनवणी अनेकांनी केली, पण हा 84 वर्षांचा आंधळा, बहिरा, गलितगात्र म्हातारा बाहेर आला तर राज्य व्यवस्थेस सुरुंग लावील असे ‘एनआयए’ वारंवार कोर्टात सांगत राहिले व आपली न्याय व्यवस्था स्टॅन स्वामींपेक्षा जास्त गलितगात्र होऊन त्या म्हाताऱ्याच्या तिरडीची व्यवस्था करत बसली, हेच सत्य आहे. कश्मीरातील देशद्रोही, फुटीरतावादी गुपकार गँगशी पंधरा दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी चर्चा केली. या गँगला आजही कश्मीर स्वायत्त हवेच व 370 कलम तेथे पुन्हा लागू करा अशी मागणी कायम आहे. कश्मीरातील अतिरेकी दिल्लीत चर्चेला येतात व 84 वर्षांचे फादर स्टॅन स्वामी तुरुंगात तडफडून मरतात. देशाचे एकही न्यायालय स्टॅन स्वामी यांची साध्या जामिनावर सुटका करू शकले नाही. वृत्तपत्रांची मुस्कटदाबी होत आहे तशी न्याय व्यवस्थेचीही मुस्कटदाबी सुरू झाली आहे का?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेकडून राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटी रुपयांचे योगदान !

News Desk

कळव्यात घरांवर दरड कोसळली, कोणतीही जीवित हानी नाही!

News Desk

नवीन स्टार्टअप्सनी पीक विमा क्षेत्रात आपले योगदान द्यावे! – देवेंद्र फडणवीस

Aprna