HW News Marathi
देश / विदेश

योग ते सहयोगचा मंत्र माणुसकीला सशक्त करेल – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | योगाने लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी कोरोना संकटात योगाचं महत्व सांगितलं. योगामुळे निरोगी आयुष्य, सामर्थ्य आणि सुखी जीवन मिळतं असंही यावेळी त्यांनी सांगितलं. सुखी आयुष्यासाठी योगा महत्वाचा असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

“आज जेव्हा संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे तेव्हा योगा लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. भारतात कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नसला तरी योग दिनाचा उत्साह कमी झालेला नाही. करोना असतानाही योग दिवसाची थीम ‘योगा फॉर वेलनेस’ने करोडो लोकांमध्ये योगाप्रती उत्साह वाढवला आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

योग दिनाच्या निमित्ताने प्रत्येक देश, समाज निरोगी राहावा असं सांगत मोदींनी एकमेकांची ताकद बनूयात असं आवाहन केलं. योगाने संयमाची शिकवण दिली असल्याचंही यावेळी ते म्हणाले. “करोनाच्या गेल्या दीड वर्षात अनेक देशांनी संकटाचा सामना केला आहे. लोक योगाला विसरु शकत होते पण त्याउलट लोकांमध्ये योगाचा उत्साह, प्रेम अजून वाढलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अनेकांनी योगाला सुरुवात केली आहे,” असं मोदी म्हणाले.

“कोरोनाच्या अदृश्य व्हायरसने जगात धडक दिली तेव्हा कोणताही देश संसाधनं तसंच मानसिकदृष्ट्या यासाठी तयार नव्हता. अशा कठीण काळात आत्मशक्ती महत्वाचा मार्ग ठरला. मी आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोलतो तेव्हा योगालाही सुरक्षा कवच केल्याचं ते सांगतात. डॉक्टरांनी स्वत: आणि रुग्णांसाठी योगाचा वापर केला. आजारातून बाहेर पडल्यानंरही योगा महत्वाचा आहे,” असं मोदींनी यावेळी सांगितलं.

“योगामुळे फक्त शारिरीकच नाही तर मानसिक आरोग्य सदृढ होण्यासही मदत मिळते. योग आपल्याला तणावातून सामर्थ्याकडे नेत आहे. योग आपल्याला नकारात्मकतेतून क्रिएटिव्हीटीकडे नेत आहे. बाहेर कितीही संकट असलं तरी आपल्याकडे तोडगा असल्याचं योगा सांगत आहे,” असं मोदी म्हणाले.

“जेव्हा भारताने योग दिनाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा ते संपूर्ण जगासाठी उपलब्ध व्हावं अशी अपेक्षा होती. आज त्या दिशेने अजून एक पाऊल टाकत भारताने संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून ‘MYoga’ अॅप आणलं आहे. कॉमन योगा प्रोटोकॉलच्या अंतर्गत वेगवेगळ्या भाषेतील व्हिडीओ येथे उपलब्ध होतील. यामुळे जगभरात योगाचा विस्तार होण्यासाठी तसंच जगाला एकत्र आणण्यात महत्वाची भूमिका निभावली जाईल,” असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे..योग ते सहयोगचा मंत्र भविष्यातील मार्ग दाखवत माणुसकीला सशक्त करेल असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BREAKING | माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन

News Desk

सर्वोच्च न्यायालयानं खुल्या गुणवंतांना न्याय दिला – अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते

News Desk

Union Budget 2021 |  जुन्या वाहनांचा फिटनेस आता तपासला जाणार

News Desk