HW News Marathi
महाराष्ट्र

“चव्हाण मुख्यमंत्री असतानाच जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला घरी बसवलं आणि फडणवीसांचं राज्य आलं”

मुंबई | ‘राज्याचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच करायचा आहे’, असा निर्धार माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याकडूनही सातत्याने स्वबळाचा नारा दिला जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसकडून स्वतंत्र निवडणुका लढवण्याचे संकेत दिले जात असून, शिवसेनेनं यावर भाष्य करत चांगलाच समाचार घेतला आहे. “एखाद्या पक्षाने स्वबळाची भाषा करणे हे काही चुकीचे नाही. फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे,” असा सल्लाही शिवसेनेनं आजच्या (२१ जून) सामना अग्रलेखातून काँग्रेसला दिला आहे.

…नाहीतर लोक जोड्याने हाणतील

काँग्रेसकडून स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा केली जात असून, शिवसेनेनं सामना अग्रलेखातून यावर भाष्य केलं आहे. “कोरोनाचे संकट पाहता बेभान गर्दी आवरा, असे आदेश केंद्र सरकारने दिले त्याच धर्तीवर या संकटकाळात सुरू असलेले बेभान राजकारणही आवरा, नाही तर लोक जोड्याने हाणतील, असा कडक सूर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लावला. शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनी पक्षप्रमुख काय बोलणार, काय सांगणार, काय गरजणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. पण शनिवारी संध्याकाळी गडगडाट होऊन विजा चमकाव्यात असे चमकदार भाषण करून उद्धव ठाकरे यांनी भविष्यातील मार्गाची दिशा दाखवली.

…आणि फडणवीसांचे राज्य आले

शनिवारी राहुल गांधी यांचाही वाढदिवस होता. यानिमित्ताने काही कार्यक्रम, पक्षप्रवेश असे काँग्रेसी सोहोळे पार पडले. त्यातील एका सोहोळ्यात प्रदेश काँग्रेसकडून पुन्हा स्वबळाची गर्जना केली गेली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण तर त्याही पुढे जाऊन म्हणाले, ‘राज्याचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच करायचा आहे.’ चव्हाण हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असतानाच राज्यातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सलग १५ वर्षे सत्तेत असणाऱ्या सरकारला घरी बसविले होते व फडणवीसांचे राज्य आले होते. त्यामुळे चव्हाण यांना काँग्रेस पक्षाची बांधणी नव्या जोमाने करावीच लागेल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वबळाची भाषा करीतच असतात. त्यांना पृथ्वीराज बाबांची साथ मिळाली. या भक्कम युतीमुळे महाराष्ट्रात काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष होणार असेल तर त्यांच्या आत्मविश्वासाला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

इतर सगळे स्वबळाचे शड्डू ठोकीत असताना शिवसेना गप्प बसणार का?

“मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याची भाषा जोरात केलीच आहे. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत आहे, तरीही स्वबळाची भाषा करतोय. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वबळापेक्षा आज करोनाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. इतर सगळे स्वबळाचे शड्डू ठोकीत असताना शिवसेना गप्प बसणार का? शिवसेनेकडे आत्मबळ आणि स्वबळ आहे. स्वबळ हा शिवसेनेचा हक्क आहे. निवडणुका आल्या की फक्त स्वबळाची भाषा करायची हे बरोबर नाही. मग प्रत्येक लढाई ही स्वबळावरच लढण्याची तयारी केली पाहिजे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युती होती तेव्हाही ‘शतप्रतिशत भाजपा’ हा कार्यक्रम राबवला गेलाच होता.

स्वबळाचे दांडपट्टे तेव्हाही फिरवले

स्वबळाचे दांडपट्टे तेव्हाही फिरवले गेले. त्यामुळे एखाद्या पक्षाने स्वबळाची भाषा करणे हे काही चुकीचे नाही. फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे. स्वबळाची भाषा करणाऱ्यांना लोक जोड्याने हाणतील, असे जे उद्धव ठाकरे म्हणतात ते यासाठीच. ठाकरे यांनी आपल्या भाषणात इतरही अनेक राजकीय मुद्द्यांना स्पर्श केला. प. बंगालात मोदी-शाहांसह बलवान भारतीय जनता पक्षाचा पालापाचोळा करणाऱ्या ममतांचे कौतुक ठाकरे यांनी केले. पश्चिम बंगालात प्रचंड सरकारी ताकद वापरूनही ममतांचा पराभव करता आला नाही. बंगालची जनता ठाम राहिली व त्यांनी प्रादेशिक अस्मिता म्हणजे काय असते ते दिल्लीश्वरांना दाखवून दिले. महाराष्ट्राने बंगालप्रमाणे वागावे, असाच संदेश उद्धव ठाकरे देत असावेत. स्वाभिमान व अस्मितेच्या मुद्द्यांवर ममतांप्रमाणे प्रसंगी केंद्राशी दोन हात करायला तयार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे देत असावेत काय?,” असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

हिंदुत्व ही कोणाची मक्तेदारी नाही

भाजपाला ते रुचले नाही व त्यांच्या पोटात दुखू लागले

“हिंदुत्व ही कोणाची मक्तेदारी नाही. शिवसेना कालच्याइतकीच आजही प्रखर हिंदुत्ववादी आहे, असे शिवसेना पक्षप्रमुखांनी जोरकसपणे सांगितले. राममंदिर जमीन घोटाळ्यासंदर्भात शिवसेनेकडून काही प्रामाणिक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावर शिवसेना हिंदुत्वाचा त्याग करून काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तेत जाऊन बसल्याची पोपटपंची भाजपाकडून सुरू झाली. राममंदिर ट्रस्टचा जमीन घोटाळा व हिंदुत्व यांचा परस्परही कसा काय संबंध असू शकतो? अयोध्येतील राममंदिर निर्माणासाठी जो तीर्थक्षेत्र न्यास निर्माण झाला त्यांना रामाच्या नावावर जमीन घोटाळा करण्याचा अधिकार कोणी दिला? असे प्रश्न विचारणारे हिंदुत्ववादी नाहीत, असे भाजपाने परस्पर ठरवून टाकले आहे.

भाजपाला ते रुचले नाही

आम्ही सांगू तीच हिंदुत्वाची किंवा राष्ट्रवादाची व्याख्या या एककल्ली भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी हल्ला केला. राममंदिर जमीन घोटाळ्यावर प्रश्न विचारले म्हणून भाजपाचे लोक शिवसेना भवनावर फुटकळ मोर्चा घेऊन आले. शिवसैनिकांच्या तावडीत ते सापडले व जे व्हायचे तेच घडले. या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर बोलवून सत्कार केला. भाजपाला ते रुचले नाही व त्यांच्या पोटात दुखू लागले. त्यांच्या पोटदुखीवरही औषध देऊ, असे उद्धव ठाकरे म्हणतात ते महत्त्वाचे आहे. ‘बाबरी आम्ही तोडली नाही’ असे काखा वर करून सांगणाऱ्यांची परंपरा शिवसेनेची नाही. त्यामुळे शिवसेना भवनाच्या रक्षणासाठी दोन हात करणाऱ्या शिवसैनिकांचा सत्कार मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. हे योग्यच झाले.

मनगटातील ताकद महत्त्वाची

शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. राज्याची धुरा सांभाळत असतानाही शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून त्यांनी केलेले भाषण दिशादर्शक आहे. संकटाला घाबरणार नाही. मनगटातील ताकद महत्त्वाची. उगाच कोणाच्या पालख्या वाहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. तेव्हा कोण, कोणाला, कोणासाठी म्हणाले हे ज्याचे त्याने तपासून घ्यायचे आहे,” असा सल्ला शिवसेनेनं इतर राजकीय पक्षांना दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मी सहभागी होईन, कॉंग्रेसचा इशारा

News Desk

कर्मचाऱ्यांना पीपीई किट व मास्क द्यावे – अस्लम शेख

News Desk

राहूल गांधीच्या आणीबाणीच्या वक्तव्यारुन राजकारण तापले, भाजपनेही कॉंग्रेसला सुनावले

swarit