मुंबई | बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. बेळगावात भाजपचा विजय झाला आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
मराठी माणूस हरल्याबद्दल?
संजय राऊत यांनी या मुद्यावरून संताप व्यक्त केला आहे. “बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसं मेली. महाराष्ट्रातील 69 लोकं मेली. बाळासाहेब तुरुंगात गेले. अन् तुम्ही पेढे वाटता मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत नाही तुम्हाला. राजकारण बाजूला ठेवा. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे”, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला आहे.
यामागे किती मोठं कारस्थान झालं असेल
मराठी माणूस महापालिकेत सत्ता स्थापन करेल अशी खात्री होती. बेळगावमध्ये सातत्याने मराठी माणूसच निवडून आला आहे. एकीकरण समितीला केवळ तीनच जागा मिळाल्याची माहिती आहे. हे दुर्देव आहे. पण यामागे किती मोठं कारस्थान झालं असेल याची कल्पना करवत नाही. मी ईव्हीएमवर याचं खापर फोडणार नाही.कर्नाटकाच्या सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून बेळगावर मराठी माणसाचा हक्क राहू नये यासाठी काय गडबड केली त्याची माहिती बाहेर येईलच, असं राऊत म्हणाले आहेत.
जे पेढे वाटतात त्यांना मराठी माणसं माफ करणार नाही
बेळगावात मराठी माणसाचा पराभव झाल्याबद्दल आज महाराष्ट्रात काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. मराठी माणूस हरल्यानंतर पेढे वाटले जात आहेत. महाराष्ट्राचंया इतिहासात इतकी नादानी आणि नालायकपणा झाला नाही. मराठी माणसाच्या बाबतीत आतापर्यंत गद्दारी कोणी केली नव्हती. महाराष्ट्रात अनेकांना वेदना आहे. सातारा, सांगली कोल्हापुरातून फोन येत आहेत. मराठी माणूस हरल्याबद्दल त्यांच्यात अस्वस्थता आहे. तुम्ही पेढे वाटता. ठिक आहे तुमचा पक्ष जिंकला असेल मराठी माणसाच्या एकजुटीचा पराभव झाला. जे पेढे वाटतात त्यांना मराठी माणसं माफ करणार नाही, असं ते म्हणाले आहेत.
तेव्हा तुमचं बोळकं का बसलं होतं?
संजय राऊत यांनी यावेळी भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे. “तुमचा भगवा झेंडा होता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा कर्नाटक सरकारने उतरवला तेव्हा तुमचं बोळकं का बसलं होतं? मराठी तरुणांवर गुन्हे दाखल केले जातात, त्यावेळी गप्प कसे बसता? असा सवाल करतानाच गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन एकीकरण समितीच्याच मागे होते. कारण ती मराठी माणसाची प्रातिनिधीक समिती आहे”, असं ते म्हणाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.