HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत दादा गोड माणूस आहेत!,संजय राऊतांची वाढदिवसानिमित्त पाटलांना कॉंम्प्लिमेंट

नाशिक | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक वाद सुरुच आहेत. वाघाशी मैत्री करण्याच्या मुद्द्यावरुन या वादाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज (१० जून) चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना एक कॉंम्प्लिमेंट दिली आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे गोड माणूस आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनी कार्यकर्त्यांनी आणलेला केक कापावा, सगळ्यांना भरवावा स्वत:देखील खावा. चंद्रकांत पाटील हे निरागस आणि निष्कपट माणूस आहेत. लहान मुल कसं बडबडतं तसं आनंद घ्यायचा असतो, अशी मिश्किल टीका राऊतांनी केली आहे.

पुढे ते असंही म्हणाले की, शिवसेना काय आहे कोणता वाघ आहे हे देशानं पाहिलं आहे. आणि या वाघाची जातकुळी काय आहे हे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बघून तुम्हाला समजेलच. त्या वाघाने तुम्हाला खेळवलं सुद्धा आणि आणि लोळवलं सुद्धा आहे. तसेच, विरोधी पक्षात असले म्हणून मैत्री नसते का? आजच्या विरोधी पक्षाशी आमचे मित्रत्वाचेच संबंध आहेत. आणि आम्ही कधी नाती विसरत नाहीत. त्याचं नात्यानं उद्धव ठाकरे आणि मोदी भेटले. त्याचं नात्यानं आम्ही चंद्रकांत दादांना भेटू देवेंद्र फडणवीसांना भेटू. राज्याच्या राजकारणामध्ये नाती टिकतात. सत्ता येते आणि सत्ता जाते, असं स्पष्ट मत राऊत यांना मांडले आहे.

“वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती” – चंद्रकांत पाटील

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे. “आज माझा वाढदिवस आहे. त्यामुळे कटू बोलायला नको. संजय राऊतांनी मला मनाविरुद्ध का होईना गोड म्हटलंय आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मनामध्ये जर मी गोड असतो, तर साधारणपणे सामनाचा आठवड्याला एक अग्रलेख माझ्यावर लिहिला गेला नसता. मला काल एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने एक वाघ भेट म्हणून दिला. मी म्हटलं चांगलंय, आमची वाघांशी दोस्ती आहे. तर त्यावर पत्रकारांनी शिवसेनेचा मुद्दा काढला. मी म्हटलं आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झालाय”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

वाघ ठरवेल मैत्री कुणाशी करायची… – संजय राऊत

दरम्यान, संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना शुभेच्छा वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी, चंद्रकांत पाटलांच्या कालच्या वाघासंदर्भातल्या विधानावरून त्यांनी टोला देखील लगावला होता. “चंद्रकांत पाटील हे गोड आहेत. त्यांना अशाच प्रकारे कार्यकर्त्यांच्या भेटी घेत राहाव्यात. वाघ ठरवेल की मैत्री कुणाशी करायची”, असं संजय राऊत म्हणाले होते.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

वाघाशी दोस्ती करावी यासाठी मला वाघ भेट दिला, पण वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती. उद्धवजीं जुनी मैत्री मोदीजींशी आहे असं सांगितलं. त्यांचं म्हणणं फडणवीस-पाटलांशी जमत नाही. इकडे दोस्ती असती तर 18 महिन्यापूर्वीच सरकार आलं असतं. मोदींनी जर सांगितलं, त्यांची इच्छा असेल तर त्यांची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा. मोदींजींनी आदेश दिल्यावर काय वाटेल ते करु. जरी भाजप-शिवसेनेचं सरकार आलं, असं मी म्हणत नाही, पण तुम्ही ज्या चर्चा करताय, त्यानुसार जरी सरकार आलं तरी निवडणुका वेगळ्याच होणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील मराठा समाजाची दिशाभूल केली जातेय, पंतप्रधानाकडे यासंदर्भात काहीच नाही. मराठा समाज हा मागास आहे हे आधी ठरवावं लागेल. राज्य सरकारकडून धूळफेक सुरू आहे, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या सवलती मराठा समाजाला दिल्यात त्या तरी द्या, अशी मागणीही त्यांनी केली. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं ते फक्त महाराष्ट्रात गेलं त्याला मोदी काय करणार असाही सवाल त्यांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस ‘मी पुन्हा येईन’ म्हणाले आणि जनतेने त्यांना धडा शिकवला ,पवारांचा टोला !

News Desk

विधानसभेत अमोल कोल्हे राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांच्या बरोबरीने काम करणार ?

News Desk

ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारनेच जबाबदारी पार पाडणे आवश्यक – चंद्रकांत पाटील

News Desk