मुंबई | भाजप नेते गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असून महापालिकेत भाजपच्या सत्तेला सुरूंग लावण्यात शिवसेनेला यश मिळालं आहे. २७ नगरसेवक फुटल्याने मोठा धक्का बसलेल्या भाजपने जळगाव महापालिकेमधील सत्ता गमावली आहे. ‘एमआयएम’च्या ३ नगरसेवकांनीही शिवसेनेलाच मतदान केलं असल्याने जळगाव पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
महापौर-उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा पराभव करत महापौरपद पटकावलं आहे. जयश्री महाजन यांनी प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव करत महापौरपदी आपलं नाव निश्चित केलं आहे. तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या विजयानंतर भाजपकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेला या यशावरुन टोला लगावत हे यश कमी वेळाचं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, निवडणुक होण्याआधीच गिरिश महाजन यांना कोरोनाचीही लागण झाली आहे.
“गिरीश महाजनांना कोंडीत पकडण्याच्या दृष्टीने एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर सर्व पक्ष एकत्र आले आणि त्यानंतर सर्व पक्षीयांचा मिळून झालेला हो महापौर आहे. आणि शिवसेनेचा झालेला हा विजय तात्कालिक आहे. या विजयाचे दीर्घकालीन काही फायदे होतील असं वाटतं नाही. २ दिवसांसाठी गिरीश महाजनांना धक्का दिला त्यामुळे अशा बातम्यांपलिकडे त्या त्या पक्षांना काही फायदा होईल असं मला वाटतं नाही. कारण जे नगरसेवक निवडणुन आले आहेत ते भाजपच्या विचारधारेवर आले आहेत. त्यामुळेच जेव्हा त्यांना लोकांपुढे जावं लागेल तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार होईल. त्यामुळे हे यश तात्कालिक आहे दीर्घकाळ काहीही याचा उपयोग होणार नाही”, असं स्पष्ट मत विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मांडले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.