बीड । बीड जिल्ह्यातील परळी येथील युवती पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे गेले अनेक दिवस राज्यात खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणाशी जोडले जात असल्याने सुरुवातीपासूनच भाजप आक्रमक पवित्र्यात आहे. याच पार्श्वभूमीवर, आज (२२ फेब्रुवारी) भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेऊन थेट संशयित मुख्य आरोपी मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे आता हे प्रकरण पुन्हा गाजण्याची शक्यता आहे.
चित्रा वाघ आपल्या या निवेदनात म्हणतात की, “१२ ऑडियो क्लीप बाहेर आल्या ज्यात पूजाला आत्महत्येपासून परावृत्त करण्यापासून ते आत्महत्येनंतर दरवाजा तोड पण तीचा मोबाईल ताब्यात घे इथपर्यंतच संभाषण आहे. हा आवाज दुसरा तिसरा कोणाचाही नसून राज्याचा शिवसेनेचा वनमंत्री संजय राठोडचा आहे. काही फोटो ही आहेत ज्यात पूजा ही संजय राठोडच्या संपर्कात होती हे स्पष्टपणे दिसतंय. इतके ढळढळीत पुरावे असतानाही पुणे पोलीस मात्र संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई करताना दिसत नाही. विशेष म्हणजे मंत्री संजय राठोड अद्याप बेपत्ता आहे”, असे चित्रा वाघ यांनी दिलेल्या निवेदनात म्हणण्यात आले आहे.
चित्रा वाघ त्यापुढे आपल्या या निवेदनात असेही नमूद करतात की, “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा हा अहवाल पुणे पोलिसांनी २ दिवसांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगासह राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी संजय राठोड याच्या चौकशीशिवाय अहवाल पूर्ण कसा काय होऊ शकतो ? पूजाचा लॅपटॉप, तिचा मोबाईल, पोलिसांना मिळाला का ? त्यातून काही माहिती समोर आली का? त्या १२ ऑडिओ क्लीपची तपासणी केली का ? पूजा गॅलरीतून पडली म्हणताना तिच्यासोबत राहणाऱ्या २ प्रत्यक्षदर्शीना जुजबी चौकशी करून पोलिसांनी कसे काय सोडून दिले ? त्यांना त्यावेळीच ताब्यात का घेतले नाही ? त्यातल्या एकाला परवा पकडले, दुसरा अद्याप फरार आहे. मंत्री संजय राठोड बेपत्ता आहे. या प्रकरणात पोलिसांची भूमिका अतिशय संदिग्ध आहे. पूजाला न्याय मिळवून द्यावा”, अशीही मागणी पूजा चव्हाण यांनी केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.