मुंबई | पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेच्या मंत्र्याचं नाव समोर आल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यात याबाबत बोलताना शिवसेनेचे सर्वच नेते सावध पवित्रा घेताना दिसत आहेत. तर अनेक जण प्रतिक्रिया देणंही टाळत आहेत. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनाही पूजा चव्हाण प्रकरणाबाबत विचारण्यात आलं. त्यावर आदित्य ठाकरेंनीही सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेच्या मंत्र्याचं नाव पुढे येत आहे याबाबत आदित्य यांना विचारण्यात आलं असता त्यांनी “मला याबाबत अद्याप माहिती नाही. मी यावर माहिती घेऊन बोलेन”, अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे. ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर भाजपकडून शिवसेनेवर जोरदार आरोप केले जात आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही रितसर पत्र लिहून याबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनीही सावध पवित्रा घेत याबाबत मुख्यमंत्री बोलतील असं म्हटलं. आता आदित्य ठाकरेंनीही माहिती घेऊन सांगतो अशी प्रतिक्रिया देत अधिक भाष्य करणं टाळलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.