HW News Marathi
देश / विदेश

सरकारने शेतकऱ्यांविरोधात ‘सेलिब्रिटीज्’ना उतरवले, संजय राऊतांचा केंद्रावर हल्ला

मुंबई | दिल्लीच्या सीमेवरील गाझीपूरला शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले आहे. जगभरातून त्यांना पाठिंबा मिळतोय. हा आपल्या देशात हस्तक्षेप असल्याचा अपप्रचार सुरू झालाय. गाझीपूरचे आंदोलन हे बंडखोर किंवा देशद्रोह्यांचे नाही. ते आपल्या हाडामांसाचे शेतकरी आहेत. ते ‘जयहिंद’चा नारा देत लढत आहेत’ असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला टोला लगावला.

कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी गेल्या 3 महिन्यांपासून आंदोलन करत आहे. परदेशी सेलिब्रिटींनी आंदोलनाच्या बाजूने ट्वीट केल्यामुळे एकच गदारोळ उठला आहे. याच मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय लिहिले आहे सदरात?

दिल्लीच्या सीमेवरील गाझीपूरला शेतकऱयांचे आंदोलन पेटले आहे. जगभरातून त्यांना पाठिंबा मिळतोय. हा आपल्या देशात हस्तक्षेप असल्याचा अपप्रचार सुरू झालाय. गाझीपूरचे आंदोलन हे बंडखोर किंवा देशद्रोह्यांचे नाही. ते आपल्या हाडामांसाचे शेतकरी आहेत. ते ‘जयहिंद’चा नारा देत लढत आहेत.

गाझीपूर या सध्या गाजत असलेल्या देशाच्या युद्धभूमीवर मंगळवारी दुपारी पोहोचलो. देशाच्या सीमेपेक्षा गाझीपूरच्या सीमेवर काय हालचाली सुरू आहेत याकडे जगाचे लक्ष आहे. तीन कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी शेकडो शेतकरी गाझीपूरच्या सीमेवर तीन महिन्यांपासून ठाण मांडून बसले आहेत व सरकार त्यांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही. जगभरातून शेतकरी आंदोलनास पाठिंबा मिळत आहे. पॉपस्टार रिहाना हिने दिल्लीतील शेतकऱयांच्या आंदोलनास पाठिंबा देताच पंतप्रधान मोदी यांच्या भक्तांत एकच खळबळ उडाली. स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस या उघडपणे शेतकऱयांच्या समर्थनासाठी उतरताच अक्षय कुमार, कंगना राणावत, सचिन तेंडुलकरपासून ते लता मंगेशकरपर्यंत सर्व ‘सेलिब्रिटीं’नी अचानक आपली मते समाजमाध्यमांवर व्यक्त केली.

‘शेतकरी आंदोलन हा आमचा देशांतर्गत विषय आहे त्यात विदेशी हस्तक्षेप नको,’ असा साक्षात्कार या प्रमुख मंडळींना झाला. पण गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी एकाकी झुंज देतोय त्यावर साध्या संवेदनाही या प्रमुख मंडळींनी व्यक्त केल्या नाहीत. म्हणजेच आंतरराष्ट्रीय पाठिंबा शेतकऱयांना मिळू लागताच, सरकारने त्यांच्या विरोधात या ‘सेलिब्रिटीज्’ना उतरवले. शेतकऱयांचा लढा हा माणुसकी व न्याय्य हक्काचा लढा आहे. जगभरातून अशा प्रत्येक लढय़ास मानवतावादी पाठिंबा देतच असतात. शेतकरी देशात बंडाळी करू इच्छित नाहीत व ते देश तोडायला निघाले नाहीत.

अमेरिकेच्या संसदेवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला होता. तेव्हा पंतप्रधान मोदींपासून अनेक हिंदुस्थानी नेत्यांनी त्या हल्ल्याचा निषेध करून बायडन या उगवत्या सूर्यास नमस्कार केला होता. ट्रम्प यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी अमेरिकेत व अहमदाबादेत प्रचार सभा घेतल्या. तोसुद्धा त्यांच्या देशातला हस्तक्षेप होता. त्यामुळे रिहानाचा विषय हा स्वतंत्र आहे. गाझीपूरच्या सीमेवरील शेतकऱयांना जागतिक पाठिंबा मिळत असेल तर त्याचा विचार सरकारने करायला हवा.

दिल्ली-गाझीपूर हा एक तासाचा प्रवास. तेथे धड पोहोचता येऊ नये म्हणून सरकारने अनेक अडथळे उभे केले. पोलीस व सुरक्षा दलाचे जवान आहेतच. आता फक्त सैन्य आणि हवाई दल काय ते आणायचे बाकी राहिले आहे. हे सर्व कोणाच्या विरोधात? तर आपल्याच शेतकऱयांना मागे हटविण्यासाठी. शेतकऱयांना देशाचे दुश्मन मानून सरकार लढाईच्या मैदानात उतरले. चीन आणि पाकिस्तानशी चर्चा होते, पण शेतकऱयांना ती संधी नाही. गाझीपूरच्या युद्धभूमीचे सेनापती राकेश टिकैत स्वागतासाठी समोर आले. त्यांनी आलिंगन दिले.

D‘‘लढाई आता संपणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच राहील. सरकारची तीच इच्छा दिसते,’’ असे ते म्हणाले. पश्चिम-उत्तर प्रदेशातील मेरठचा हा जाट नेता. त्याने आता संपूर्ण देशाचे लक्ष स्वतःकडे वळवले आहे. भव्य देहयष्टी, मजबूत मनगट, रांगडे वागणे, अंगात खादीचा कुर्ता, धोतर व डोक्यावर किसान युनियनची हिरवी टोपी. पण मनात शेतकऱयांविषयी अपार माया, असे हे टिकैत. त्यांच्या प्रतिष्ठsसाठी लढा द्यायला शेकडो किसान गाझीपुरात उतरले. ‘‘ही लढाई किमान ऑक्टोबर महिन्यापर्यंत तरी चालेल, पुढेही चालवू,’’ हा त्यांचा आत्मविश्वास.

नक्की काय घडले?

26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी नक्की काय घडले? यावर गाझीपुरात चर्चा झाली. लाल किल्ल्यावर जे घडले तो शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचा डाव होता. शेतकरी एका उत्साहात चालत व ट्रक्टरवर स्वार होऊन दिल्लीच्या रस्त्यावर निघाले. लोकांनी त्यांचे स्वागत केले. चौकाचौकांत त्यांच्यावर फुले उधळली. जणू राष्ट्रभक्तांचा एक जथाच विजयी वीरांप्रमाणे पुढे निघाला आहे. त्यातले काही लोक लाल किल्ल्यावर गेले. त्यांचा शेतकरी आंदोलकांशी काय संबंध? हा टिकैत यांचा प्रश्न. जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक करा, ही त्यांची मागणी. पण गुन्हेगारांना राजकीय संरक्षण आहे. लाल किल्ल्यावरील घटनेनंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. गाझीपूर सीमेवरील 235 तरुण बेपत्ता आहेत. त्यातल्या 140 जणांचा शोध आता तिहार तुरुंगात लागला. उरलेले आजही बेपत्ता आहेत. पोलिसांनी त्यांचे नेमके काय केले?

अमानुष कृत्य

सरकारने गाझीपूर, टिकरी, सिंघू बॉर्डरवरील पाणी, विजेचे कनेक्शन कापले आहे. हा अमानुष प्रकार आहे. मोबाईल टॉयलेटची व्यवस्था मोडीत काढल्याने आता तेथे स्वच्छता नाही व घाणीचे साम्राज्य वाढू लागले. तरीही शेतकरी मागे जायला तयार नाहीत. टिकैत यांची प्रतिष्ठा राहावी हा त्यांचा आता मुख्य मुद्दा आहे. 26 तारखेच्या संध्याकाळी सरकारने बळाचा वापर करून आंदोलनाची बाजी पलटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भावनाविवश झालेले टिकैत यांना हुंदका फुटला. त्या हुंदक्याने शेतकरी मागे फिरले व ‘म्हारो टिकैत’चे फलक घेऊन गाझीपूरला आले. मेरठ, बागपत, मुझफ्फरपूर, जिंद यासारख्या भागात हजारो ‘जाट पंचायती’ झाल्या व टिकैत यांना पाठिंबा वाढू लागला. तेव्हा बळाचा वापर वाढविण्यासाठी सरकारने काय केले? पोलिसांनी लाकडाऐवजी स्टीलचे आणि लोखंडाचे दंडुके मोठय़ा प्रमाणावर तयार करून घेतले.

लाल किल्ल्यावरील शेतकऱयांच्या हाती तलवारी होत्या म्हणून पोलिसांच्या एका पथकाने हाती तलवारी घेतलेले फोटो प्रसिद्ध केले. नंतर पोलिसांनी घोडदळाच्या पलटणी आणल्या. तारांचे कुंपण घातलेच, पण दिल्लीकडे जाणाऱया रस्त्यांवर सिमेंट लावून त्यावर मोठय़ा खिळय़ांची बिछायत निर्माण केली. हे सर्व शेतकऱयांना रोखण्यासाठी केले असेल तर हे असले सरकार पाकिस्तान व चीनशी काय लढणार, हा प्रश्न आहेच. मी गाझीपुरातील एका तंबूत असताना, हरयाणातील एक महिला त्या तंबूत आपल्या पतीस भेटण्यासाठी पोहोचली होती. पती-पतीची भेट 56 दिवसांनी होत होती व 70 वर्षांच्या त्या महिलेच्या डोळ्यांतून पतीला पाहून फक्त अश्रुधारा वाहात होत्या. “आपण ठीक आहात ना? घरची चिंता करू नका.’’ इतकेच सांगून ती गृहिणी निघाली. असे अस्वस्थ करणारे प्रसंग प्रत्येक तंबूत घडत आहेत. पण लोक मागे हटायला तयार नाहीत. अशा पोलादी इराद्याच्या आंदोलकांशी सरकार कोणत्या हत्याराने लढणार?

बळाचा वापर पोलीस दलाचा आणि लष्कराचा उपयोग नागरी जीवनाच्या क्षेत्रात इतका होत नव्हता. गाझीपुरात तो यापुढे होईल असे दिसते. गाझीपुरात जे दिसले ते राज्यकर्त्यांच्या हृदयशून्यतेचे दर्शन आहे. सरकारने भ्रम निर्माण करून सिंघू बॉर्डरवरील पंजाबी नेत्यांना आंदोलनातून बाहेर काढले. सिंघू बॉर्डरवरील आंदोलनाचे नेतृत्व गुरुनामसिंह चढुनी हे किसान नेते करीत होते. हे महाशय सीमेवर होते तोपर्यंत आंदोलनास आर्थिक रसद मोठय़ा प्रमाणात मिळत होती. कारण पंजाबच्या शेतकऱयांनी ही सीमा ताब्यात घेतली होती. आता हा रस्ता मोकळा केला आहे. शीख विरुद्ध जाट अशी सरळ फूट सरकारने पाडली, पण गाझीपूरला राकेश टिकैत मांड ठोकून उभे आहेत. गाझीपूरच्या बॉर्डरवर खाण्याचे ‘लंगर’ सुरू आहेत व महिला मोठय़ा प्रमाणावर तेथे आहेत.

टिकैत यांना सोडून जाणार नाही असा त्यांचा पण आहे. त्यामुळे सरकारने रस्त्यावर खिळेच ठोकले. यावर टिकैत म्हणाले, ‘‘त्यांनी दिल्लीला जाणाऱया रस्त्यांवर खिळे ठोकले, पण आम्हाला दिल्लीला जायचे नाही. कृषी कायदे रद्द करा इतकीच आमची मागणी आहे.’’ पंतप्रधान म्हणतात, ‘‘आंदोलक व शेतकरी यांच्यात एका फोन कॉलचे अंतर आहे!’’ यावर मिस्कील जाट टिकैत म्हणाले, ‘‘मग वेळ कशाला? मला त्यांचा नंबर द्या. मीच फोन करतो!’’ गाझीपूर सीमेवरचा हा खेळ सुरूच आहे.

लोकशाहीच्या गप्पा

पॉपस्टार रिहाना हिने सातासमुद्रापलीकडून शेतकरी आंदोलनास पाठिंबा देताच येथे अनेकांना मिरच्या झोंबल्या. परदेशातील लोकांनी येथील कलाकारांचे कौतुक केलेले चालते. पण लढणाऱया शेतकऱयांचे कौतुक केले हा आपल्या देशातील हस्तक्षेप वाटतो. आता रिहानाच्या समर्थनासाठी जे उभे राहतील त्यांना ‘देशद्रोही’ ठरवले जाईल. देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात कमालीचा स्वस्त झाला आहे, पण गाझीपूरच्या सीमेवर प्रत्येक तंबूवर तिरंगा फडकतो आहे. देशभक्तीची गाणी लागली आहेत. सरकारच्या पगडीलाच शेतकऱयांनी हात घातला. म्हणजे त्यांनी देशद्रोहच केला! लोकशाही व नीतिमत्तेच्या गप्पा आता फक्त तोंडी लावायला. प्रत्यक्षात दिल्लीच्या दिव्याखाली अंधार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची देशातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा

News Desk

अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल

News Desk

निपाह व्हायरस म्हणजे काय?

News Desk