HW News Marathi
महाराष्ट्र

परत जायचंच होतं तर आलात कशाला पुणेकरांनी बोलवालंही नव्हतं, पवारांचा पाटलांना सणसणीत टोला

मुंबई | परत कोल्हापूरला जायचंच होतं तर तुम्ही पुण्यात आलात कशाला असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल (२५ डिसेंबर) पुण्यामध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आपण कोल्हापूरला परत जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा अजित पवारांनी आज चांगला समाचार घेतला आहे. भाजपमधील एक नेता मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असे म्हणत असताना आता दुसरा नेता मी परत जाईन परत जाईन असे म्हणायला लागले आहेत, असे म्हणत पवारांनी फडणवीस आणि पाटील दोघांवरही निशाणा साधला आहे.

“सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवालंही नव्हतं. आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी, कार्यकर्ते उगाच नाराज झाले,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे.“निवडणुकीत कोणी कुठे उभे राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक वर्ष होण्याआधीच परत जाण्याची भाषा करु लागले. लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिलं आहे. कोथरुडची कामं व्हावीत अपेक्षा आहे. उद्या लोकं कामं घेऊन गेले तर मी परत जाणार आहे सांगतील. मग आले कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं,” असा टोला त्यांनी लगावला आहे.

“आम्ही अजिबात सतावत नाही. त्यांनी त्यांचं काम करावं आणि आमचं आम्ही करतो. जर यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतले आहेत तर तो रस्त्यावर का आला आहे. इतक्या थंडीत आंदोलन का सुरु आहे याचं आत्मपरीक्षण करावं. इथं बैलगाडीत बसून फोटो काढले. दिल्लीत महाराष्ट्रातूनही शेतकरी गेले आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने पुण्यात अटल संस्कृती गौरव पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.“पुण्यात अनेक नेते घडले आहेत. कुठेही काही घटना घडली की त्याचं नातं पुण्याशी जोडलं जातं. पुणे सगळ्या अर्थाने प्रगतीचं शहर आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की, पुण्यामध्ये सेटल झाले पाहिज. पण देवेंद्रजी मी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहे. हे माझ्या विरोधकांना सांगून टाकतो,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला होता.

“मी कोणतीही निवडणूक हरलेलो नाही. कोल्हापूरमधून कधीही लढण्यास तयार आहे. तिथून निवडून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात जाईन, असे आव्हान पाटील यांनी याआधी टीकाकारांना दिले होते. कोथरूडमधून उमेदवारी कशी मिळाली हे अनेकदा चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. मी कोल्हापुरातून निवडणूक लढविण्याची संधी मिळेल, या अपेक्षेत होतो. मात्र तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांनी मला पुण्यातून निवडणूक लढविण्यास सांगितले. त्यामुळे त्यांच्या आग्रहामुळे मी कोथरूडमधून निवडणूक लढविली”.

“आजही कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराने राजीनाम द्यावा, मी तेथून निवडणूक लढवेन. मला हरणे माहिती नाही, असा दावा त्यांनी केला होता. अनेकांनी मला पुण्यात पराभूत करण्याचा डाव आखला होता. रात्ररात्रभर बैठका चालू होत्या. मला पराभूत करण्याचा प्रयत्न केला गेला. एकास एक लढत देत मला मतदारसंघात ठेवण्यात ते यशस्वी झाले; मात्र मी निवडून आलो”, असे पाटील म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील मंदिरे खुली; सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी घेतले परळीत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

News Desk

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद

News Desk

कोरोनाकाळात महाराष्ट्रासोबत लसच नाही तर इतर वैद्यकीय उपकरण वाटपातही दुजाभाव – पृथ्वीराज चव्हाण

News Desk