मुंबई | “शरद पवारांना पाठिंबा दिल्याबद्दल मी संजय राऊत यांचे आभार मानतो. पडत्या काळात पक्षभेद विसरून संजय राऊत हे नेहमीच पाठीशी उभे राहतात. संजय राऊत यांचा पाठिंबा म्हणजे शिवसेनेचा पाठिंबा असतो”, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. शरद पवार यांना या प्रकरणात शिवसेनेकडून खंभीर पाठिंबा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
प्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानांमधून या प्रकरणात शिवसेनेचा शरद पवारांना पाठिंबा असल्याचे दिसून आले. “आपले राजकीय मतभेद असतील पण सूडाने वागणारे आम्ही नाही. आम्ही कोणाहीसोबत सुडाने वागत नाही. मी आणि मुख्यमंत्री तुम्हाला शब्द देतो कि आम्ही तुमच्याशी सुडाने वागणार नाही”, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना दिला होता. तर संजय राऊत यांनी देखील शरद पवारांचे एक ट्विट रिट्विट केले होते. याच पाठिंब्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत यांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन आपण स्वतः २७ सप्टेंबरला ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली होती. मात्र, कायदा-व्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आपण आपला निर्णय तहकूब करत असल्याचे आज (२७ सप्टेंबर) शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.