मुंबई | चीनमधील घातक पद्धतीचा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात झालेला नाही. राज्यात एकही संशयीत रुग्ण आढळलेला नसून नागरीकांनी भीती न बाळगता सतर्कता ठेवावी. सामान्यांनी मास्क लावून फिरण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करतानाच अधिक काळजी घेतानाच सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (५ मार्च) पत्रकार परिषदेत केले.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने केलेल्या सज्जतेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेस मुख्यमंत्री ,आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, जगात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात यंत्रणा सतर्क झाली आहे. जगात ज्या पद्धतीचा विषाणू धुमाकूळ घालतोय तसा विषाणू महाराष्ट्रात नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी मुंबई पाठोपाठ पुणे आणि नागपूर येथेही सोय करण्यात आली आहे. आता आंतरराष्ट्रीय विमानातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी आवश्यक तो वाढीव डॉक्टर्स आणि कर्मचारी देखील देण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय विमान आल्यानंतर त्याची साफसफाई करताना कर्मचाऱ्यांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
जनतेने घाबरून जाऊ नये. पुढील १० ते १५ दिवस अधिकची सतर्कता बाळगावी. सार्वजनिक ठिकाणई अनावश्यक गर्दी टाळावी. होळीच्या सणाचा आनंद घेताना त्याचे स्वरूप मर्यादीत ठेवा. नागरिकांनी मास्क लावून फिरण्याची गरज नसून हात रुमालाने प्रतिबंध करावा. शिंकताना, खोकताना रुमालाचा वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, हो हवेतून पसरणारा आजार नसून खोकल्यानंतर, शिंकल्यानंतर उडणाऱ्या थुंकीतून प्रसार होणारा आहे. महाराष्ट्रात एकही संशयीत रुग्ण नाही. प्रतिबंधात्मक उपायांतून त्याला रोखता येते. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही.
डॉ. व्यास म्हणाले, कोरोनाचा हा नविन प्रकारचा विषाणू आहे. गेल्या दोन महिन्यात त्याविषयी अभ्यास सुरू आहे. त्याची लागण झालेल्या तीन ते पाच टक्के लोकांना वैद्यकीय उपचाराची गरज भासते. २० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांमध्ये त्याची लागण होण्याची शक्यता एक टक्का असते. २० ते ३० वर्षांतील नागरीकांना एक ते दोन टक्के, ५० पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांमध्ये जास्त प्रमाण असते. ज्याची रोगप्रतिकारक क्षमता चांगली त्याला त्रास होत नाही. शक्यतो हस्तांदोलन टाळावे, हात स्वच्छ धुवावे.
परदेशी म्हणाले, आतापर्यंत ७० हजार प्रवाशी तपासले. विमानतळ, बंदरे प्राधिकरणाची बैठक घेतली. मुंबई विमानतळावर मुंबई महापालिकेते ५० डॉकटर्स तपासणीसाठी नियुक्त आहेत. बाधीत भागातून आलेल्या आणि लक्षणे आढळलेल्या नागरिकांची नोंद करण्यासाठी महापालिकेने कक्ष तयार केले आहे. त्यासाठी १९१६ क्रमांक दिला आहे. महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयाबरोबरच शहरातील सर्वच खासगी तसेच रेल्वे, बीपीटीच्या रुग्णालयांना आवश्यकता भासल्यास विलगीकरण कक्षाची सोय करण्यास सांगण्यात आले आहे. खासगी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना देखील दोन दिवसांनंतर प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरू होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.