HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहाेचल्या! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थीशी सहयाद्री अतिथीगृहातून संवाद साधतांना ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रत्येक लाभार्थीशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला तसेच त्यांच्या आणखी काही अपेक्षा आहेत का ते जाणून घेतले. ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुंबईमधील यासीन शब्बीर शेख, निशा शर्मा, कुंजू पवार या महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्रही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते देण्यात आले.

योजनांमध्ये राज्याचा मोठा सहभाग

केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचाही 40 टक्के वाटा आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेने अगदी तालुका आणि गाव पातळीवर काम करून या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहचविले आहेत आणि लाभार्थींच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले की हीच आपल्या आयुष्याची कमाई वाटते.

महाराष्ट्राच्या प्रभावी कामगिरीचे कौतुक

प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात ५,००,००० घरे ग्रामीण भागात बांधली असून यंदाही ५ लाख घरे बांधत आहोत. ३५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून दिला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की. २०२२-२३ मध्ये जल जीवन मिशनमध्ये १९ लाख कुटुंबास नळ जोडणी व पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठा देण्यासाठी १९०० कोटी इतका निधी उपलब्ध करू दिला आहे.

याशिवाय पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना स्वच्छ भारत योजना (ग्रामीण व शहरी) इतर केंद्र शासन पुरस्कृत योजना राबविण्यात राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरीय यंत्रणाच्या सक्रीय सहभाग व नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे योजनांचा लाभ पोहचविणे शक्य झाले असेही ते म्हणाले.

व्याज परतावा सुरू करा

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांना देखील केंद्राने बंद केलेला पीक कर्जावरील दोन टक्के व्याज परतावा परत सुरू करावा व लाखो शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी विनंती केली.

अंमलबजावणीचा दुष्काळ महाराष्ट्रात नाही

केवळ योजनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असे चित्र महाराष्ट्रात नसून शेवटच्या घटकांपर्यंत अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अगोदरच्या पिढ्यांनी लढा दिला आहे. आपल्या देशातल्या लोकांना समाधानाने जीवन जगावे लागता यावे म्हणून प्रयत्न करून या पिढ्यांचे योगदान सार्थ ठरवते अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी महाआवास त्रैमासिक, आझाद का अमृत महोत्सव प्रगती अहवाल, मिशन महाग्राम या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी साधलेल्या संवादात, नगर जिल्ह्यातील दरेवाडीचे मीरा कारंडे, लोणी बुद्रुकचे विनोद पारखे, चांदेगावचे सुखदेव उबाळे, कोल्हापूर जिल्ह्यातील हसुर दुमालाचे जिजाबाई पाटील, सांगरुळचे लक्ष्मी साठे, अर्जूनीचे नितीन आढाव, नाशिक जिल्ह्यातील कवनईचे आनंद पाटील, सटवाई वाडीचे नामदेव मेधाने, बागलाणचे मीरा पवार, नागपूर जिल्ह्यातील भंडारबोडीचे मीराबाई गणवीर, सुमन दोनारकर, खेर्डीचे संगीता निकम, औंरगाबाद जिल्ह्यातील रायपूर येथील बाळू राऊत, भराडीचे कृष्णा महाजन, फुलंब्रीचे सुवर्णा भुईगल या लाभार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वीजबिलाबाबत अजित पवारांचा खोटारडेपणा बाहेर पडला”, प्रकाश आंबेडकरांचा थेट निशाणा  

News Desk

नारायण राणेंच्या ‘त्या’ आरोपांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया..

News Desk

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी ‘४’ पक्षांची जोरदार मागणी

News Desk