मुंबई | पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणी नंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या २५० पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय स्पर्धा परीक्षेतील १०३१ उमेदवारांची शारीरिक चाचणी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुणे केंद्रावर घेण्यात आली. प्रतिदिन सुमारे २५० उमेदवारांचा शारीरिक चाचणी कार्यक्रम पूर्ण करून आज (२ डिसेंबर) या परीक्षेची तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर त्वरीत प्रसिद्ध करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील २५० पदांवरील नियुक्तीसाठी १६ एप्रिल २०२२ रोजी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२१ ची घेण्यात आली होती. या पूर्व परीक्षेच्या ०९ जून २०२२ रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या निकालाच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२१ चे आयोजन ३० जुलै रोजी करण्यात आले व मुख्य परीक्षेचा निकाल २३ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेच्या निकालाआधारे एकूण १०३१ उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले होते.
परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक उद्या ( ३ डिसेंबर) दुपारी १२ वाजेपासून शनिवारी (१० डिसेंबर) रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहील. ऑनलाईन पद्धतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही निवेदने तद्नंतर विचारात घेतली जाणार नाहीत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.