HW News Marathi
संपादकीय

मी मराठी

पूनम कुलकर्णी | मराठी भाषेच्या भवितव्याची काळजी अलीकडच्या काळात अधिक वाढताना दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्रात देखील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे मराठीवर इंग्रजी आणि हिंदी या भाषांचे मोठ्या प्रमाणावर आक्रमण सुरु आहे. त्यामुळे येत्या काळात मराठी भाषा नष्ट होणार की काय ? अशी भीती भाषा अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. भारतामध्ये 1652 भाषा आहेत. भारताच्या राज्यघटनेमध्ये ज्या 22 भाषांना मान्यता देण्यात आली आहे त्या 22 भाषांमध्ये मराठी भाषेचा समावेश आहे. मराठी महाराष्ट्र गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागात भारतासह मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते.

त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषिकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथेही बोलली जाते.मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- दक्षिण गुजरात, सुरत, बडोदा व अहमदाबाद (गुजरात), बेळगांव, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, बिदर, कारवार (कर्नाटक), हैदराबाद (आंध्रप्रदेश), इंदूर, ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) व तंजावर (तामिळनाडू), असा आहे. देशातील 36 राज्ये आणि 72 देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. 11 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. मराठी मातृभाषा असणा-या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी बोलणा-यांची एकूण लोकसंख्या 9,00,00,000 इतकी आहे. मराठी भाषा 9 व्या शतकापासून प्रचलित असून मराठी भाषेची निर्मिती संस्कृतपासून झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झालेली आहे.

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी), महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे), उस्मानिया विद्यापीठ (तेलंगण), गुलबर्गा विद्यापीठ, देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर) व जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (नवी दिल्ली) येथेही मराठीच्या उच्च शिक्षणासाठीचे विभाग आहेत. महाराष्ट्राबाहेरच्या एकूण 15 विद्यापीठांमध्ये मराठी शिकविली जाते. मराठी भाषा ही समजण्यासाठी सोपी आणि साधी आहे. परंतु अलीकडच्या काळात शिक्षण व्यवस्थेत इंग्रजी भाषेचे अतिक्रमण वाढल्यामुळे पाल्ल्याला इंग्रजी शाळेत प्रवेश मिळाला की घरातही आई वडील मुलांशी इंग्रजी बोलू लागतात. जर हे इंग्रजीचे अतिक्रमण असेच सुरु राहीले तर येत्याकाळात 9 करोड इतक्या भव्य संख्येत असलेले मराठी भाषिक दुर्मिळ होतील यात तिळमात्र शंका नाही.

महाराष्ट्राच्या इतिहासात आपण डोकाहून पाहिले तर लक्षात येते मराठी लोकांनी अटकेपार झेंडे लावले. आपल्या महाराष्ट्राला संत परंपरा लाभली आहे . पेशवेकाळात मध्यप्रदेशमध्ये होळकरांचे इंदोर, पवारांचे धर, आणि शिंदेचे ग्वाल्हेर यांसह नागपूरच्या रघुजी भोसले यांनी पश्चिम बंगाल पर्यंत मजल मारली होती. छत्रपती शहाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या कालखंडात तमिळनाडूमधील तंजावर पर्यंत मराठ्यांनी आपल्या राज्याचा विस्तार केला होता. पेशव्यांच्या काळात सदाशिवराव भाऊ आणि विश्वासरावांनी महाराष्ट्राचे सनई चौघडे दिल्लीच्या तख्तापर्यंत नेले. महाराष्ट्रातल्या संत नामदेवांचे अभंग पंजाबच्या गुरु ग्रंथ साहेब मध्ये आढळून येतात. यांपैकी कुणालाही मराठी भाषेचा अडथळा झाला नव्हता. राजे रजवाडे देखील अभिमानाने मराठी बोलायचे परंतु सध्या काळाच्या ओघात संस्कृतीत बदल होताना दिसतात आणि आपली बोली भाषा आपल्या प्रगतीचा अडथळा तर ठरत नाही ना असा संभ्रम वाटून सध्या मराठी भाषिकांची एक पिढी तयार होताना पहायला मिळत आहे.

प्रत्येक मराठी भाषिकाने इंग्रजीचा स्वीकार हा ज्ञानाची खिडकी म्हणून मर्यादित प्रमाणात करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या खाजगी व वैचारिक जीवनात तसेच प्रसारमाध्यमांमधून मात्र मराठीचा झेंडा कायम फडकवत ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा मराठीकडे दुर्लक्ष झाल्यास भावी काळात मराठी अस्मितेसाठी संघर्ष उभा करण्याची वेळ येईल हे मात्र निश्चित.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आधार’ला न्यायालयाचा आधार

News Desk

ठाकरे बंधू एकत्र आले तर…

swarit

गळाभेटीची रणनीती

swarit