HW News Marathi
संपादकीय

महाराष्ट्राला एका खमक्या शेतकरी नेतृत्वाची गरज…

पूनम कुलकर्णी | राज्यातल्या शेतक-यांच्या प्रश्नांवर लढणारे झुंझार नेते शरद जोशी हे आजही सर्वसामान्यांपासून तमाम महाराष्ट्राच्या स्मरणात आहेत. १९७९ मध्ये शेतक-यांना न्याय मिळावा म्हणून शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली . या संघटनेच्या स्थापनेनंतर ‘शेतमालाला रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा,उस, तंबाखू, दूध, भात, कापूस, इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनाचे त्यांनी नेत्वृत्व केले.

१९८० साली नाशिकमध्ये कांदा आणि ऊस दरप्रश्नी शेतकरी संघटनेला घेऊन ते रस्त्यावर उतरले आणि शरद जोशी हे नाव त्यानंतर घराघरात पोहोचले. एव्हाना जोशींना राजकीय सत्तेचे महत्त्व समजले होते. शेतकर्‍यांच्या समस्या सोडवायच्या असतील, तर फक्त चळवळी करून भागणार नाही, तर सत्तेत सहभागी झाले पाहिजे, या निष्कर्षाप्रत आलेल्या जोशींनी मग राजकारणात उडी घेतली. त्यांनी १९९४ साली ’स्वतंत्र भारत पक्ष’ स्थापन केला, पण या पक्षाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. शेतकर्‍यांच्या कल्याणाबद्दलचे आपले विचार फक्त चळवळीच्या माध्यमातून मांडून चालणार नाही, तर त्यासाठी संसदेसारखे व्यासपीठ गरजेचे आहे, हे लक्षात आल्यावर जोशींनी मग भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली. या समझोत्यानुसार ते २००४ साली भाजपच्या मदतीने राज्यसभेचे खासदार झाले. शरद जोशी हे २००४ ते २०१० या काळात राज्यसभेचे सदस्य होते.

परंतु २००४ साली राजकारणातील जोशींच्या उड्यांमुळे रघुनाथदादा पाटील व राजू शेट्टी यांच्यासारख्या सहकार्‍यांनी शेतकरी संघटना सोडून २००४ साली ’स्वाभिमानी शेतकरी संघटना’ स्थापन केली. गतवर्षी त्याच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली.आजचे शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी असोत किंवा सदाभाऊ खोत असोत त्यांनी २००४ साली शरद जोशींसोबत असताना देखील एकमेकांवर संधीसाधूपणाचा आरोप केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा गतवर्षी या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे पहायला मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी २१ सप्टेंबर २०१७ रोजी कोल्हापुरात रयत क्रांती संघटना नावाने नवीन शेतकरी संघटना स्थापन केली. त्यावेळी बोलताना खोत म्हणाले होते. आता नांगरणी मीच करणार, पेरणी मीच करणार, खळ्याचे मालक मात्र रयतच राहिलं, अशी नवी घोषणाही सदाभाऊंनी त्यावेळी दिली होती.

सध्या मात्र महाराष्ट्रात शेतकरी संघटनांच्या नावावर केवळ राजकारण होताना पहायला मिळत आहे. ज्या सदाभाऊ खोत यांनी शेतक-यांच्या कळवळ्यांने नवीन संघटनेची स्थापना केली. रयतेला खळ्याचं मालक म्हणणा-या सदाभाऊ खोत यांनी भाजप सारख्या पक्षात राज्यमंत्री असताना महाराष्ट्रातल्या शेतकर-यांना किमान वेळेत पिक भरपाई आणि योग्य हमी भाव मिळवून देणे गरजेचे होते परंतु ते मात्र अद्याप महाराष्ट्रात पहायला मिळत नाहीये. रहाता राहिला प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तर या संघटनेचीही काही विषेश वेगळी अवस्था नाही. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी यांनी दूध अनुदानाचा मुद्दा उचलून राज्यातील शेतकरी तसेच नागरीकांना पुन्हा एकदा वेठीस धरले आहे. अनेक दिवसात शांत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अचानक दूध दरावरुन आंदोलनाला सुरुवात केली आहे. अधिवेशनाच्या काळात अचानक जागे झालेले शेट्टी मात्र सद्या चांगलेच टिकेचे धनी झालेत.

भाजप सरकारच्या काळात राज्यातला बळीराजा नेहमीच कुणाच्या ना कुणाच्या राजकारणाचा बळी ठरला, याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे नाशिक ते आझाद मैदान दरम्यान पायपीठ करत शेतकरी नेते अजित नवले यांच्या अध्यक्षतेखाली निघालेला आक्रोश मोर्चा. या आक्रोश मोर्चामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता. नाशिकवरुन पायपीठ करत आलेल्या या शेतक-यांच्या पायाला फोड येऊन रक्तबंबाळ झाले होते. माध्यमांनी देखील हा मोर्चा उचलून धरला प्रत्येक शेतक-याला त्यांच्या मागण्या विचारण्यात आल्या शेतकरी नेत्यांची मोठ मोठी भाषण झाली. नेते प्रसिद्ध झाले सरकारच्या बैठका झाल्या पण शेवटी शेतक-यांच्या हाती मात्र निराशा आली. भाजप सरकारच्या काळात अनेक विक्रमी मोर्चे निघाले. परंतु महाराष्ट्राला अभ्यासू शेतकरी नेता नसल्यामुळे कुठेतरी हा संघर्ष शून्य ठरला. राजकारणाच्या चौकटी बाहेर पडून शेतक-यांच्या व्यथा मांडण्यासाठी आगामी काळात महाराष्ट्राला एका खमक्या शेतकरी नेतृत्वाची गरज आहे यात तिळमात्र शंका नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत २६ जुलैची पुनारावृत्ती होऊ शकते ?

swarit

जिओ इन्स्टिट्यूटचा दर्जा एफटीआयआय (FTII) पेक्षा मोठा ?

swarit

मनमोहन सिंग जगातील सर्वात उच्चशिक्षित पंतप्रधान

News Desk