HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस ३० जानेवारीला नागपूर पोलीस आयुक्तांना ‘जनरल डायर’  पुरस्कार देणार!

काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांकडून गोळीबाराची जाहीर धमकी देण्याचे प्रकरण

मुंबई – नथुराम गोडसेच्या नाटकासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना गोळीबाराची जाहीर धमकी देण्याच्या प्रकरणावरून नागपूरच्या पोलीस आयुक्तांना गांधीजींच्या पुण्यतिथी दिनी सोमवारी ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या कार्यालयात ‘जनरल डायर’ पुरस्कार प्रदान करणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या नाटकाचा २२ जानेवारी २०१७ रोजी नागपूर येथे प्रयोग असताना त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष व इतर संघटनांचे कार्यकर्ते शांततापूर्वक निदर्शने करीत असताना त्यांना पोलिसांच्या वतीने गोळीबाराची जाहीर धमकी देणारा फलक दाखविण्यात आला होता. या प्रकारामुळे नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांसह पोलीस मॅन्युअलचे देखील उल्लंघन झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने नागपूर पोलीस आयुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली होती. परंतु, सरकारने त्या मागणीला काहीही उत्तर दिलेले नसून, दुसरीकडे नागपूरचे पोलीस आयुक्त देखील दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागपूर शहरातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्तांना ‘जनरल डायर’ पुरस्कार देणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

संविधानाच्या अनुच्छेद १९ अन्वये देशातील नागरिकांना शांततामय मार्गाने एकत्रित होण्याचा अधिकार आहे. त्यांना शांततापूर्वक पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करण्याचाही अधिकार घटनेने दिला आहे. हे अधिकार वापरून नागपूरला सदरहू निदर्शने केली जात असताना “इथून निघून जा; अन्यथा गोळीबार केला जाईल”, अशी जाहीर धमकी देणारा हिंदी भाषेतील फलक लावणे संविधानाचे उल्लंघन आहे. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या साध्या निदर्शनाच्या वेळी गोळीबाराची जाहीर धमकी देणारा फलक घेऊन पोलीस उभे असल्याचे मी आजवर कधीही पाहिलेले नाही. नागपूर पोलिसांची ही कृती जुलमी ब्रिटीश राजवटीची आणि १९१९ च्या जालियानवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारी असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे. .

२२ जानेवारी २०१७ रोजी नथुराम गोडसेवर आधारीत नाटकाच्या विरोधात आयोजित निदर्शनाच्या वेळी तर पोलिसांनी गोळीबाराच्या धमकीचा जाहीर फलक दाखवून परिसीमा गाठली आहे. नागपूर पोलिसांची कार्यपद्धती जालियानवाला बाग हत्याकांडाच्या वेळी तेथील सैन्य तुकडीचा प्रमुख जनरल डायर याच्याशी साधर्म्य साधणारी आहे. त्यामुळेच नागपूर पोलीस आयुक्तांना ‘जनरल डायर’ पुरस्कार प्रदान करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.⁠⁠⁠⁠

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC मधील प्रभाग रचनेतील बदललेल्या नकाशाबाबत भाजप नेत्याचा आक्षेप

Aprna

“निष्ठावान कलातपस्वी हरपला”; विक्रम गोखलेंच्या निधनानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

Chetan Kirdat

जामीनासाठी नवाब मलिकांच्या मुलाकडे मागितली 3 कोटीची लाच

Aprna