HW News Marathi
महाराष्ट्र

मापात पाप करणारे सात पंप जप्त

मुंबई – ग्राहकांची फसवणूक करणे तसेच पेट्रोलमध्ये भेसळ केल्याप्रकरणी मुंबई, पुण्यातील प्रत्येकी दोन पेट्रोलपंपांसह राज्यातील इतर भागांतील सात पेट्रोलपंप जप्त करुन सहा वितरकांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत.

राज्यातील सर्व पेट्रोलियम वितरकांची तपासणी करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली वैधमापन शास्त्र विभागाचे अपर पोलीस महासंचालक तथा नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.

राज्यातील १६३६ पेट्रोल आणि डिझेल वितरकांच्या तपासणीत ११,४१८ पंपाची तपासणी करण्यात आली. तसेच २५२ पंपांद्वारे कमी-जास्त प्रमाणात वितरण होत असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी वितरकांना नोटिसा बजावून पेट्रोल पंप बंद करण्यात आले. हे पंप पुन:पडताळणी व मुद्रांकन केल्यानंतर वापरास खुले करण्यात येणार असून या तपासणीत उल्लंघनाबाबत १७ खटले दाखल करण्यात आले आहेत. तपासणीत मुंबई महानगर विभागाच्या १४५ वितरकांची चौकशी करुन १७३४ पंप तपासण्यात आले. यामध्ये २ पंप वितरणातील घोळामुळे बंद करुन एका वितरकाविरुद्ध खटला दाखल केला आहे. पेट्रोलियम पदार्थांचे कमी वितरण करुन ग्राहकांची फसवणूक केलेल्यांमध्ये मे. चारकोप पेट्रोलियम, महावीर नगर, कांदिवली (पश्चिम) या वितरकाचा समावेश आहे. पंपातील त्रुटींमुळे त्यांना नोटीस बजावून ते बंद करण्यात आले आहे.

पुणे विभागात ३७७ वितरकांची चौकशी करुन २५११ पंप तपासण्यात आले. कमी वितरणामुळे दोन पंप बंद करुन दोघा वितरकांविरोधात खटला दाखल केला आहे. वितरणात दोष आढळून आल्यामुळे त्यांना नोटीस देऊन ते बंद करण्यात आले. तसेच मे. सिद्धीविनायक पेट्रोलियमवर (सांडगेवाडी, कराड तासगाव रोड, ता.पुळुस, जि.सांगली) कारवाई करण्यात आली.

नाशिक विभागामध्ये ३२२ वितरकांची चौकशी करुन २००० पंप तपासण्यात आले. यामध्ये दोन पंप दोषी आढळल्यामुळे बंद करण्यात आले. दोघा वितरकांविरोधात खटला दाखल केला आहे. औरंगाबाद विभागामध्ये २९० वितरकांची चौकशी करुन १६६१ पंप तपासण्यात आले. यामध्ये दोषी आढळल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अमरावती विभागात १८० वितरकांची चौकशी करण्यात आली असून, ११८१ पंप तपासण्यात आले. यामध्ये त्रुटी आढळल्याने नोटिसा पाठवल्या आहेत. नागपूर विभागामध्ये १६२ वितरकांची चौकशी केली. ११२९ पंप तपासण्यात आले. वितरणाबाबत शंका आल्यास पंपावर उपलब्ध असलेल्या ५ लीटर प्रमाणित मापाद्वारे तपासणी करावी. विधीग्राह्य त्रुटींपेक्षा म्हणजे २५ मिलीपेक्षा जास्त कमी वितरण होत असल्याचे निदर्शनास आल्यास याबाबत ग्राहकांनी क्षेत्रिय वैधमापन शास्त्र विभागाशी संपर्क साधावा किंवा यंत्रणेच्या नियंत्रण कक्षाच्या ०२२-२२८८६६६६ या दूरध्वनी क्रमांकावर, तसेच dclmms_complaints@yahoo.com या इ-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाभकास आघाडीच्या ३ चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली – चंद्रकांत पाटील

News Desk

फडणवीस साहेब जमल तर बघा ! नाही तर सोडून द्या 

News Desk

मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी अधिकारी फडणवीसांना भेटतात; नवाब मलिक यांचा आरोप!

News Desk