बीड। माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या बहीण आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थातच नरेंद्र मोदींचा मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानंतर, बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी चांगलेच आक्रमक झालेत या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पदाधिकाऱ्यांच राजीनामा सत्र काही बंद व्हायचं नाव घेत नाहीये, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे आत्तापर्यंत ७७ राजीनामे कार्यकर्त्यांनी सुपूर्द केले आहेत. केज पंचायत समितीच्या सभापतीसह ३ सदस्यांनी जिल्हाध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे. पंकजा समर्थक आणि बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन थेट आता मुंबईला रवाना झाले आहेत. उद्या (१३ जुलै) ला मंगळवारी ते पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे उद्या (१३जुलै) पंकजा मुंडे यांनी समर्थकांच्या बोलावलेल्या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे, उद्याच्या बैठकीत काय निर्णय होतो, काय घडामोडी होतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानं बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरूच आहे. जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आता निर्माण झाली आहे, प्रचंड नाराजीचे सूर असून आणखीन राजीनामे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा आशयाचं पत्र भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिलं आहे. ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन जिल्हाध्यक्ष मस्के हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. उद्या (१३जुलै) भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार आहेत. या राजीनामा सत्रावर भाजप प्रदेश कार्यकारिणी काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पदांचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या जयश्री मस्के यांचाही समावेश आहे. त्यामुळे राजेंद्र मस्के यांच्याही निर्णयाकडे लक्ष वेधले आहे.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?
भाजपमध्ये फक्त प्रीतमताईंचंच नव्हे तर हीना गावितांचंही नाव चर्चेत होतं. पण पक्ष विचार करुनच निर्णय घेतो, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. प्रीतमताईंचं नाव चर्चेत होतं, त्यांचं नाव योग्य होतं. केवळ मुंडे साहेबांची कन्या म्हणून नव्हे तर त्यांचं काम चांगलं आहे. त्यांनी पक्षासाठी खूप काम केलं आहे. पण नवीन लोकांना संधी द्यायला हरकत नाही, असंही त्या म्हणाल्या होत्या. प्रीतम मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर राजकारणात आल्या. पहिली टर्म त्यांना साहेबांच्या कामांमुळे, भावनेमुळे लोकांनी निवडून दिलं. पण दुसरी टर्म त्या त्यांच्या स्वतःच्या विकास कामावर निवडून आल्या. माझ्या कुटुंबाने पक्षासाठी आयुष्य दिलंय. आम्ही कधी कोणत्या पदाची अपेक्षा केली नाही. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांनी कधीच मंत्रिपदाची मागणी केली नाही. आम्ही नाराज नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.