HW News Marathi
महाराष्ट्र

परभणीत ८० हजार कोंबड्या मारणार, ६ जिल्ह्यात धोका – मंत्री सुनील केदार

नागपूर | महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. चिकन, अंडी खाणार असाल तर ७०-८०डिग्री सेल्सिअस तापमानावर अर्धा तास चिकन, अंडी शिजवा आणि मगच खा, असा सल्ला राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. तसेच बर्ड फ्ल्यू बाबत अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सुनील केदार यांनी पत्रकार परिषद घेऊन बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला दिला. राज्यात फक्त परभणीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचं आढळून आलं आहे. राज्यात इतरत्रं बर्ड फ्ल्यू झाल्याचं अद्याप निदान झालेलं नाही. त्यामुळे चिकन, अंडी खाऊ शकता. फक्त ७० ते ८० डिग्री तापमानावर अर्धा तास चिकन- अंडी शिजवा आणि त्यानंतर खा. अर्धा तास चिकन- अंडी शिजवल्यास त्यातील जीवाणू मरून जातात. हे मी सांगत नाही तर संशोधनातून तसं सिद्ध झालं आहे, असं केदार यांनी सांगितलं.

परभणीत बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्या मेल्याचं आढळून आल्याने परभणीतील ८० हजार कोंबड्या मारण्यात येणार आहे, असं राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितलं. तसेच राज्यातील ६ जिल्ह्यांना बर्ड फ्ल्यूचा धोका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. परभणीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच आम्ही कोंबड्यांचे सँपल भोपाळला पाठवले होते. त्याचा अहवाल आला असून त्यात कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत, असं केदार यांनी सांगितलं.

बर्ड फ्ल्यूबाबतच्या चुकीच्या अफवा पसरवून पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आणण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. कोरोना संकटाच्या काळात चिकनमधून कोरोना होत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी सरकारने गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली होती, असंही त्यांनी सांगितलं आहे.

परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्या दगावल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे त्या विभागातून कोंबड्या बाहेर जाणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या गावातील लोकांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी केल्यानंतरच त्यांना बाहेर जाता येईल. तसेच बाहेरच्या लोकांनाही या गावात येण्यास मनाई करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात फक्त परभणीत बर्ड फ्ल्यूचं निदान झालं आहे. ठाणे आणि दापोलीतील कोंबड्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचे रिपोर्ट यायचे आहेत. रिपोर्ट आल्यावर योग्य कारणांचं निदान होईल, असंही त्यांनी सांगितलं.

राज्याने २००६ मध्येही बर्ड फ्ल्यूचं संकट पाहिलं होतं. त्यावेळीही राज्य सरकारने पोल्ट्री व्यावसायिकांना मदत केली होती. पोल्ट्री व्यवसायावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ही अर्थ व्यवस्था डबघाईला जाऊ देणार नाही. पोल्ट्री व्यावसायिकांना वाऱ्यावर सोडणार नाही. केंद्राची वाट न पाहता पोल्ट्री उद्योगाला हात देण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आशिष देशमुख यांच्या हाती आता काँग्रसेचा झेंडा

swarit

भोंदूबाबाने 3 मुलींवर केला बलात्कार, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली: चित्रा वाघ यांची सरकारवर टीका

Aprna

अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करावेत! – मुख्यमंत्री

Aprna