HW News Marathi
महाराष्ट्र

साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे दूरगामी धोरण आखावे – मुख्यमंत्री

पुणे | केंद्रीय पातळीवर साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट येथे आयोजित साखर परिषद-२०२२ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “साखर उद्योग क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान स्वीकारून भविष्याचा वेध घेतला तर चांगली प्रगती साधता येईल. ब्राझीलने साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी केलेले उपायांचा अभ्यास करून आपणही अनुकूल बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. आपला शेतकरी कष्टासाठी मागे पडत नाही. आपला कृषिप्रधान देश आहे. साखर, इथेनॉलच्या मागणीबाबत बाजाराचा अभ्यास करून कोणते उत्पादन करून बाजारपेठ काबीज करावी याचे मार्गदर्शन करावे लागेल. त्याच्या कष्टाला योग्य किंमत मिळावी यासाठी योग्य दिशा द्यावी लागेल. राज्य शासन साखर उद्योगाच्या उत्कर्षासोबत या क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.”

साखर उद्योगातील योग्य नियोजन गरजेचे

साखर उद्योग हा महाराष्ट्राचा मुख्य उद्योग आहे. या उद्योगातील क्षमता लक्षात घेऊन पुढील नियोजन करणे गरजेचे आहे. इथेनॉलचे महत्व लक्षात घेता त्याच्या निर्मितीवरही विशेष लक्ष द्यावे लागेल. ऊसतोड कामगार, शेतकरी, साखर कारखानदार हे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देत असतील तर त्यांना सहकार्य करणे शासनाचे कर्तव्य आहे. साखर कारखाने तोट्यात चालत असताना उद्योगाच्या नियोजनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. साखर परिषदेमध्ये या उद्योगातील समस्यांवर विचार व्हावा. शेतकऱ्यांनी उसाच्या पिकासाठी सूक्ष्म सिंचनाचा उपयोग करावा, असेही त्यांनी सांगितले.

शासनाने ऊस वाहतुकीचा प्रश्न, गाळपाचा प्रश्न, थकहमी याबाबत शासन सहकार्य करीत आहे. यापुढे देखील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन मदत करेल. पण बदलत्या काळाप्रमाणे विकसित तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याप्रमाणे बदल घडवून आणावा लागेल. इथेनॉल निर्मितीचे महत्त्व लक्षात घ्यावे लागेल. ऊसतोड कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन केले आहे. त्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडविता येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. साखर परिषदेमध्ये अनेक अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्ती सहभागी झाल्याने ही परिषद या क्षेत्रातील व्यक्तींना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबाद पदवीधर निवडणूकीत राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांचा दणदणीत विजय!

News Desk

‘भारतीय संविधानाच्या उद्देशिके’चा विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करावा ! अजित पवार

News Desk

‘रात्रीस खेळ चाले’मध्ये पांडू “इसरतो” तसे आमचे कोकणचे उच्च शिक्षण मंत्री निर्णयाची “योग्य वेळ” इसरले की काय?

News Desk