मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिसवेंदिवस वाढत आहे. राज्यातील मुंबई, पुणे आणि आता नवी मुंबई या शहरात कोरोना रुग्ण वेगाने वाढत आहेत. नवी मुंबईत दररोज २०० पेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. शहरात २४ जून रोजी तब्बल ३२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
नवी मुंबईतील ४४ कंटेन्मेंट झोनमध्ये २९ जूनपासून लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. हा लॉकडाऊन ७ दिवसांसाठी असणार आहे. कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यासाठी शहरातील ४४ कंटेन्मेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. नवी मुंबईत आज (२६ जून) दिवसभरात तब्बल २२४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजार ८५३ वर पोहोचला आहे. शहरात दिवसभरात ५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर आतापर्यंत एकूण १९४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.