HW News Marathi
महाराष्ट्र

“अरे पोलिसांची कामं अशी करतोस”, अजित पवारांनी ठेकेदाराची काढली खरडपट्टी

पुणे | पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार वेळेच्या बाबतीत अचूक आहेत याची प्रचिती सगळ्यांना आली आहेच. अशाच एका कार्यक्रमासाठी आज (११ जून) अजित पवार सकाळीच पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झाले. पोलीस मुख्यालयातील ब्रिटिशकालीन वास्तूचं नुतनीकरण करण्यात आलं असून, या वास्तूमध्ये आता विविध विभागाची कार्यालये सुरू केली जाणार आहे. या इमारतीच्या नुतनीकरणाची पाहणी अजित पवारांनी केली आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली. यावेळी सदोष काम करण्यात आलं असल्याचं अजित पवारांच्या निदर्शनास आलं. त्यांनी लागलीच संबंधित ठेकेदाराला बोलवण्यास सांगितलं आणि केलेल्या कामावरून कानउघाडणी केली आहे.

अजित पवारांच्या काम करुन घेण्याच्या शैलीची, त्यांच्या बोलण्याची नेहमीच चर्चा होते. विशेषतः ते सकाळपासूनच बैठका व भेटी घेण्यास सुरुवात करत असतात. सुरू असलेल्या कामांना भेटी देऊन निदर्शनास आलेल्या चुका दाखवून देत संबंधितांचा चांगलाच समाचारही घेताना दिसतात. असाच प्रसंग आज पोलीस मुख्यालयातील कामाची पाहणी करताना आला. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह अधिकारीही उपस्थित होते. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील विविध कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. त्या कामांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सात वाजून तीस मिनिटांनी येणार असल्यानं अगोदर म्हणजे जवळपास ६ वाजल्यापासून सर्व अधिकाऱ्यांची तयारी सुरू होती.

अजित पवार हे ठरलेल्या वेळेनुसार कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. गाडीतून उतरताच, त्यांनी समोर असलेल्या कौलारू कक्षाकडे पाहतच ‘वरच्या बाजूला गोलाकार करण्याची गरज होती ती का केले नाही?’, असा सवाल पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलीस उपायुक्त सपना गोरे यांच्याकडे केला. त्यावर दोघेही अधिकारी म्हणाले, ‘आम्ही करून घेतो.’ त्यावर ‘या कामासाठी कोणता निधी वापरला,’ अशी चौकशी अजित पवार यांनी केली आहे. ‘आम्ही विनामास्क कारवाईमध्ये जमा झालेल्या दंडातून काम केले आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.

यानंतर अजित पवार पाहणी करत पुढे गेले. थोडे पुढे जाऊन, कार्यालयाच्या छताकडे पाहून त्यांनी नाराजीचा सूर लावला. ‘अरे किती अंतर ठेवलं आहे. या कामाचा ठेकेदार कोण आहे? बोलावा त्याला’, अशी विचारणा त्यांनी केली. त्यानंतर ठेकेदार समोर येताच अरे काय काम केलं आहे रे, अरे पोलिसांची काम अशी करतोस,’ असं म्हणत त्यांनी ठेकेदाराला सुनावलं आहे. ‘कसं होणार सौरभ’, असं म्हणत त्यांनी आयुक्तांकडे नाराजी व्यक्त केली. त्यातच एका भिंतीवर प्लास्टर आणि रंगकाम व्यवस्थितपणे केलं नसल्याचं त्यांच्या नजरेस पडलं. त्यावरून ते संतापले. ‘अरे काम काय केले आहे. अजिबात योग्य केलं नाही. आमच्या भाषेत सांगायचे झाल्यास छाचूगिरी काम केलं आहे,’ असं अजित पवारांनी म्हणताच पोलीस आयुक्तांसह उपस्थित अधिकाऱ्यांचे चेहरे पडले होते.

…तर मी लई बारीक बघतो

“गुप्ता मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लई बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर हे ‘छा-छू’ काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचच काम अस केलंय तर बाकीच्यांचे काय?” असा प्रश्न विचार अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनाही सुनावलं आहे.

या सगळ्या प्रकारानंतर अधिकाऱ्यांनी “दादा, आम्ही पुढील १५ दिवसात काम करून घेतो,’ असं सांगितलं असून अधिकारी बोलत असतानाच अजित पवारांनी ठेकेदाराला छतावरील पत्रांबद्दल चौकशी केली. ‘पत्रे कोणत्या कंपनीचे वापरले आहेत?,’ असं विचारताच ठेकेदार म्हणाला, ‘दादा, एका कंपनीचे वापरले आहे.’ त्यावर ‘टाटा सोडून कोणत्याही कंपनीचे पत्रे वापरायचे नाही,’ असा सक्त आदेश पवारांनी ठेकेदाराला यावेळी दिला. त्यानंतर अजित पवारांनी अधिकाऱ्यांच्या कामाचीही चांगलीच खरडपट्टी काढली असल्याचं समजत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडीवर नजर ठेवण्यासाठी राज ठाकरेंचे असे आहे ‘शॅडो कॅबिनेट’

swarit

समृध्दी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार ठरेल! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Manasi Devkar

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या जबादारीतून भाजपने अंग काढून घेऊ नये | ठाकरे

swarit