HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांनी कोल्हापूर दौऱ्यात पूरस्थितीबाबत केल्या महत्त्वाच्या घोषणा…!

कोल्हापूर। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने कहर केला, यामुळे अनेकांचे घर उध्वस्त झाली, तर काही ठिकाणी गावच्या गाव गाडली गेली. यात जीवित आणि वित्तहानी झाल्याची दुर्दैवी घटना गेल्या आठवड्यात घडल्या. यामध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या देखील घटना घडल्या. कोल्हापुरात देखील पावसानं थैमान घातल्यानंतर या भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. २०१९मध्ये देखील कोल्हापुरात अशाच प्रकारे पूरस्थिती निर्माण झाली होती.

या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली. यामध्ये पुलाच्या मोऱ्यांचा आकार, मोठ्या प्रमाणावर झालेलं अतिक्रमण आणि अलमट्टी धरण अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. अस यावेळी अजित पवार म्हणाले.

राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यामुळे तिथलं दूध राज्याच्या इतर

अनेक भागांमध्ये एकाच दिवशी झालेल्या प्रचंड पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचं अजित पवार यावेळी म्हणले. “या वेळी कोल्हापुरात खूप पाऊस पडला. काही ठिकाणी एकाच दिवसात ३२ इंच पाऊस पडला. काही भागांमध्ये दोन दिवसांत ४९ इंच पाऊस पडला. अलमट्टी धरणाचा मुद्दा बऱ्याचदा येतो. वारणा, पंचगंगेचं पाणी आल्यामुळे फुगवटा वाढतो. राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यामुळे तिथलं दूध राज्याच्या इतर भागात पाठवता आलं नाही. काल पाणी कमी झालं आणि आता वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली

सध्याच्या मोऱ्या ब्रिटिशकालीन आहेत

कोल्हापुरात अनेक ठिकाणी कमी आकाराच्या मोऱ्या असल्याचा मुद्दा यावेळी अजित पवारांनी उपस्थित केला. “सध्याच्या मोऱ्या ब्रिटिशकालीन आहेत. त्याचा आकार कमी आहे. आता कमी वेळात जास्त पाऊस पडतो. बऱ्याचदा गाळ, दगड किंवा झाडं वाहून आल्यामुळे या मोऱ्या बंद होतात. त्यामुळे आता पाईप मोऱ्यांऐवजी बॉक्स किंवा स्लॅबच्या मोऱ्या बांधल्या जातील. पावसाळा संपला की बॉक्स किंवा स्लॅब प्रकारचे पूल बांधले जातील”, असं ते म्हणाले.

बरेच जण म्हणतात ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे संकट आलं

कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी नदीपात्रात अतिक्रमण झालं असून त्यावर कारवाई करणार असल्याचं अजित पवारांनी यावेळी जाहीर केलं. “बरेच जण म्हणतात ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे संकट आलं आहे. काही भागात आजही पाऊस नाही, पण काही भागांत खूप पाऊस पडला. काही ठिकाणी ४ दिवसांत ४०० मीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. काहींच्या मते अतिक्रमित बांधकामांमुळे हे झालं. त्यामुळे अतिक्रमण देखील हटवण्याचं पाऊल उचललं जाणार आहे. यात चालढकल करणाऱ्या किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल”, असं त्यांनी सांगितलं.

अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ समितीने तसं होत नसल्याचा निर्वाळा

२०१९मध्ये कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरानंतर कर्नाटकातल्या अलमट्टी धरणातून होणाऱ्या विसर्गाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यंदाही कोल्हापूरच्या पुरानंतर अलमट्टी धरणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे हे होतंय का, याविषयी अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ समितीने तसं होत नसल्याचा निर्वाळा दिल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. “अलमट्टी धरणाविषयी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारशी चर्चा करत आहेत. दोन्ही राज्यांकडून समन्वयाने उपाय योजन्यासाठी पावलं उचलली जात आहेत. आम्ही समिती नेमली होती की खरंच अलमट्टीमुळेच या घटना घडतात का? याविषयी तज्ज्ञ समितीने अहवाल दिला होता. त्यात असं काही होत नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला होता”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

नुकसान भरपाईबाबत लवकरच निर्णय

अलमट्टीबाबत दोन्ही राज्यांनी समन्वय साधला. अलमट्टीमुळे महापूर येतो असं अभ्यास समितीने म्हटलेलं नाही. सगळ्या नागरिकांना मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. जसे जसे पाणी ओसरत आहे तसे पंचनामे होतील. पिकांच्या नुकसान भरपाईबाबत लवकरच निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले.

जो पर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तो पर्यंत पॅकेज घोषणा करता येणार नाही. आता तातडीची मदत सुरूच आहे. महाराष्ट्रातील जनतेनेही 9 जिल्ह्यांच्या मदतीसाठी पुढं आलं पाहिजे,दानशूरांना आमचं आवाहन आहे, असं अजित पवार म्हणाले.

राज्यपालांनी कोणाला सोबत घेऊन जावं हा त्यांचा प्रश्न आहे. मला यावर काही बोलायचं नाही. दौरे होतील प्रोटोकॉल प्रमाणे माहिती दिली जाईल, असं म्हणत अजित पवारांनी राज्यपालांच्या तळीये भेटीवर भाष्य केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमधील वडवणीत नगरपंचायतच्या मतदान केंद्राबाहेर भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

Aprna

मुख्यमंत्र्यानी सांगितले तर राजीनामा देईन – अशोक चव्हाण

News Desk

जिल्ह्यातील विकासकामांचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी नियोजन प्रकल्पांचे बळकटीकरण! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna