HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेलुच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई | परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष विनोदराव बोराडे व उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे यांच्यासह जिल्ह्यातील २४ विद्यमान नगरसेवकांनी, जिल्हा परिषद सदस्यांनी तसेच औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, एमआयएम व इतर पक्षातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आज (१३ फेब्रुवारी) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात परभणी जिल्ह्यातील सेलु नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद बोराडे व सर्व नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब राऊत, अविनाश काळे, भाजपाचे जिंतुर तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख तसेच जिंतुर नगरपालिकेच्या ४ विद्यमान नगरसेवकांनी व दोन जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेश काँग्रेसचे सचिव सुरेश नागरे यांच्या नेतृत्वाखाली या सर्व नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपडकर, आमदार अमर राजूरकर, माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश संघटन सरचिटणीस देवानंद पवार, विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मदन जाधव उपस्थित होते.

यासोबतच नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहूर तालुक्यातील भाजपचे नेते व सेवानिवृत्त डीएसपी यादवराव जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पाटील, भाजपच्या भटके विमुक्त मोर्चाचे तालुकाध्यक्ष भटके तालुकाध्यक्ष नवीन जाधव, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते फुलसिंग राठोड, विनोद चव्हाण, इंदल पवार, राजू शेडमाके, अविनाश चव्हाण, यांनीही आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आज काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षात स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यभरातील विविध पक्षांचे नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षातील अनेक नेते व पदाधिकारी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत परंतु आम्ही कोणालाही प्रलोभने दाखवून काँग्रेसमध्ये प्रवेश देत नाही. परभणी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने इतरपक्षातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश घेत असून परभणी जिल्हा आत काँग्रेसमय झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या पक्ष प्रवेशाने परभणी, नांदेड व औरंगाबादमध्ये काँग्रेस पक्षाचे संघटन आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. सरकार पाडण्याची स्वप्न दररोज पाहिली जात आहेत पण दोन वर्षे झाली सरकार काही पडत नाही या नैराश्येने भाजपाला ग्रासले आहे. त्यातून वारंवार सरकार पडण्याच्या तारखा सांगितल्या जात आहेत. महाविकास आघाडीचे सरकार भक्कम असून पाच वर्ष हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्यांच्या पक्षप्रवेशाने जिंतूर, सेलू व किनवट भागात काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होणार आहे. काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. परभणी शहराच्या विकासासाठी ८० कोटींचा निधी दिला तर सेलुसाठी ५० कोटींचा निधी दिला. विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन चव्हाण यांनी दिले.

उत्तर प्रदेश, पंजाबसह पाचही राज्यात काँग्रेस पक्ष चांगली कामगिरी करत असल्याचे चित्र दिसत असल्यानेच काँग्रेसवर टीका केली जात आहे. राज्यातही सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. काँग्रेस पक्षाचे संघटन वाढवा असे आवाहन चव्हाण यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दाभोळकर हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

News Desk

बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’; त्यावरच गोळा होतो ‘चंदा’! – शेलार

News Desk

Poladpur Bus Accident: आंबेनळी घाटात दरीत बस कोसळली

News Desk