पुणे | पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील विविध भागात पायाभूत सुविधा निर्माण करुन नागरिकांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून पुण्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सर्वसामान्य नागरिक केंदबिंदू मानून अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कृषी, सार्वजनिक आरोग्य, मुनष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करुन मानवी जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अर्थसंकल्पात राज्यासह पुण्यासाठी निधीची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सामाजिक संस्थेच्या मदतीने रुग्णालयांची उभारणी करण्यात येत असून या रुग्णालयांच्या माध्यमातून शहरातील आरोग्य सुविधामध्ये गुणवत्तापूर्ण भर पडण्यास मदत होणार आहे. सर्वसामान्य नागरिेकांना परवडणाऱ्या दरात घरे, आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारण्यात येणार आहे. विकासकामे करताना ती उत्तम दर्जाची व्हावीत आणि त्यात पारदर्शकता असावी असा प्रयत्न आहे.
सुशिक्षित युवक-युवतींच्या कौशल्यात वाढ करुन रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रत्येक महसुली विभागात एक इनोव्हेशन हब स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या मार्गावर मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहे. पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी, खडकवासला ते स्वारगेट या जोड मार्गिकांचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे.
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे त्यांचं स्मारक वढु बुद्रुक व तुळापूर परिसरात उभारण्यासाठी २५० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रिंगरोड ,मेट्रो, रस्ते, हवाई वाहतुकीचे जाळे उभे करुन वाहतूक कोंडी कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे. इंधनाची बचत व्हावी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक बसेस खरेदी करण्यात येणार आहे. शहराच्या विकासासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, बाबूराव चांदेरे, हाजी अब्दुल गफूर पठाण, प्रकाश कदम, नगरसेविका परवीन शेख आदी उपस्थित होते.
विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सूस गाव येथील नाला व रस्ता रूंदीकरणाच्या कामाचे, वारजे माळवाडी येथील क्रीडा संकुल व क्लब हाऊसचे, शिवणे येथील शिवणे-नांदेड पूल, सुखसागर नगर येथील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम क्रीडा संकुल, पोलीस चौकी, राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय महिला बचत गट सभागृह, कै. किसनराव कदम उद्यान, महादेवनगर येथील ७० लक्ष लिटर पिण्याच्या पाण्याची टाकीचे, मिठानगर, कोंढवा खुर्द येथे माँ खदीजा (र.अ.) प्रसुतिगृह, हजरत अब्दुल रहेमान (रहे) ओटा मार्केटसह विविध विकास कामांचे लोकार्पण, उद्धाटन आणि भूमिपूजन करण्यात आले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.