HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुखांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता!

मुंबई | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात काल (२४ एप्रिल) सीबीआयने गुन्हा दाखल केला आणि त्यांच्या मुंबई व नागपूरमधील निवासस्थाने आणि कार्यालयांसह १० ठिकाणी छापे टाकले. सीबीआयच्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली असून देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सीबीआयने दखलपात्र गुन्हा दाखल केल्याने देशमुख यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असून देशमुख आता अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतात की सीबीआयला सामोरे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ॲड जयश्री पाटील यांच्या याचिकेनुसार मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून अनिल देशमुख यांच्या विरोधात प्राथमिक चौकशी करण्यात आल्याचे सीबीआयने आधीच स्पष्ट केले आहे. आपल्या दिल्ली मुख्यालयाला उद्देशून लिहिलेल्या पत्रात सीबीआयने नमूद केले आहे की, प्राथमिक चौकशीनुसार तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि अन्य अज्ञात लोकांनी पदाचा आणि अधिकाराचा गैरफायदा उठवण्याचा प्रयत्न केल्याचा दखलपात्र गुन्हा केल्याचे स्पष्ट होते.

सध्या निलंबित असलेल्या वादग्रस्त सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा पोलिस दलात घेतले जात आहे. शिवाय त्याच्याकडे अत्यंत महत्त्वाची प्रकरणे तपासासाठी दिली जात आहेत याची पूर्ण कल्पना अनिल देशमुख यांना होती, असेही प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याचे सीबीआयने नमूद केले आहे.

सीबीआयने माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेचाही यात उल्लेख केला आहे. पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या आणि त्यांना दिल्या गेलेल्या पोस्टिंग यात अनिल देशमुख यांनी हस्तक्षेप केला आणि पोलिस अधिकार्‍यांच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप केला, असे परमबीर यांनी आधीच म्हटलेले आहे. त्याचीही चौकशी करणार असल्याचे सीबीआय म्हणते.

या सर्व पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा २०१८ सेक्शन ३ आणि भारतीय दंडविधान सेक्शन १२० बी नुसार सीबीआयने आरोप ठेवले आहेत. सीबीआयने प्राथमिक चौकशीचा अहवाल अद्याप उच्च न्यायालयात सादर केलेला नाही. मात्र, त्यापूर्वीच सीबीआयने दिल्लीमध्ये अनिल देशमुख आणि त्यांच्या अन्य अज्ञात सहकार्‍यांविरोधात एफआयआर नोंदवत गुन्हा दाखल केला.

पुराव्यानंतरच सीबीआयने गुन्हा दाखल केला

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केलेल्या १०० कोटींच्या कथित वसुलीच्या आरोपावरून सीबीआयने याचिकाकर्त्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्या जबाबाने तपासाला सुरुवात केली. सीबीआयने एनआयएच्या कोठडीत असलेल्या निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्यासह गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि बार मालक महेश शेट्टी यांच्यापाठोपाठ देशमुख यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे व संजीव पलांडे यांची सीबीआयने कसून चौकशी केली.

सर्वात शेवटी सीबीआयने सांताक्रूझ येथील डीआरडीओ गेस्ट हाऊसवर १४ एप्रिलला अनिल देशमुख यांचीही ११ तास चौकशी केली होती. सचिन वाझे आणि अन्य आरोपींच्या घर, कार्यालयातून एनआयएने जप्त केलेली डायरी आणि कागदोपत्री ऐवज सीबीआयने ताब्यात घेतले. नोंदविलेले जबाब आणि सापडलेले पुरावे या आधारे सीबीआयने अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल करण्याचे पाऊल उचलले. आरोपांमध्ये तथ्य असेल तर देशमुखांवर गुन्हा दाखल करण्याची मुभा न्यायालयाने सीबीआयला दिली होती. त्यानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे

काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी केल्याचे प्रकरण आणि ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुंबई पोलिस दलातील तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याला अटक झाल्यानंतर राज्य शासनाने मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर ठपका ठेवून त्यांची या पदावरून उचलबांगडी केली होती.

त्यानंतर परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुली आणि पदाचा गैरवापर केल्याचे आरोप केले होते. त्या संबंधीच्या चॅटचे पुरावेही सिंग यांनी दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा स्फोट झाला होता.

पुढे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले. देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची अ‍ॅड. जयश्री पाटील यांची मागणी न्यायालयाने मान्य करून 5 एप्रिलला हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते. 6 एप्रिलपासून सीबीआयने याचा तपास सुरू केला. प्राथमिक तपासानंतर आता सीबीआयने कारवाईचे पहिले पाऊल उचलले आणि देशमुखांवर गुन्हा दाखल केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबुल सुप्रियो यांचा राजकारणाला राम राम!

News Desk

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले खासदार संभाजीराजे यांचे आमरण उपोषण मागे

Aprna

शाळा सुरु करण्यापूर्वी नियमांची घ्यावी लागेल काळजी!

News Desk