HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांकडे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार द्यावा! – रामदास आठवले

मुंबई | सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे, मात्र पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित न राहिल्यामुळे विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला होता. त्याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते फारसे सक्रिय दिसत नाहीत. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थिती दर्शवली होती. या सर्व पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री पदावरून मोठं विधान केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते घरीच आराम करत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार देण्यात यावा, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे.

कोरोना आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव यंदाचे हिवाळी अधिवेशन देखील मुंबईतच घेण्यात येत आहे. मात्र तरी देखील मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे. मुख्यमंत्री ठाकरे आजारी असल्याने राज्यात अनागोंदी कारभार चालू आहे का? अशावेळी मुख्यमंत्री पद इतर कोणाकडे सोपवावं? या संदर्भाने प्रश्न विचारला असता रामदास आठवले म्हणाले की, मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे द्यावं, असं मला वाटतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत ही गोष्ट खरी आहे. त्यांना बरे होण्यासाठी अजून २- ३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्रिपदाचा कारभार सोपवावा, असं विधान आठवले यांनी केलं आहे.

दरम्यान याआधी रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, असे सांगत आघाडीतून शिवसेना पक्ष बाहेर पडेल आणि राज्यात लवकरच भाजप व सेना युतीचे सरकार येईल असे भाकीत आठवलेंनी केले होते. तर आता एकीकडे रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच अजित पवार यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी सुचवली जात असताना रामदास आठवलेंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा पर्याय सुचवला आहे.

Related posts

…मग ६० वर्षांवरील राजकारण्यांनीही राजीनामे द्यावेत, विक्रम गोखलेंची संतप्त प्रतिक्रिया

News Desk

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्यस्तरावरुन अधिकचा निधी उपलब्ध करुन घेण्यास पाठपुरावा करणार! – सतेज पाटील

Aprna

कंगना राणावत प्रकरणात राज्यापालांचा हस्तक्षेप, मुख्यमंत्र्यांबद्दल व्यक्त केली नाराजी

News Desk