मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया घराजवळ जिलेटीन कांड्यासह स्कॉर्पिओ कार आढळली होती. त्यानंतर तपासादरम्यान स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा अचानक मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत ५ मार्चला मृतदेह आढळला होता. या मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा महाराष्ट्र एटीएस तपास करत आहे. या तपासात एटीएसला महत्वाची माहिती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यासाठी आज (२३ मार्च) पत्रकार परिषद आयोजित केली होती.
एटीएसचे प्रमुख जयजित सिंग यांनी आज पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. मनसुख हिरेन यांची हत्या नेमकी कशी झाली? याप्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा काय संबंध होता? त्यांनी हे कृत्य घडवून आणण्यासाठी कुणाकुणाला कामाला लावलं? याप्रकरणाचे धागेदोरे गुजरातपर्यंत कसे गेले? आदी सर्व माहिती जयजित सिंग यांनी दिली आहे. त्यामुळे हिरेन यांची हत्या हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचं स्पष्ट होत आहे.
एटीएसचे प्रमुख जयजित सिंग यांनी या पत्रकार परिषदेत सुरुवातीपासूनचा घटनाक्रम सांगितला. “६ मार्चला मुंब्रा पोलीस ठाण्याने मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग केला. ७ ? मार्चला रोजी याबाबतची कागदपत्रं आम्ही ताब्यात घेतली. त्यानंतर त्याच दिवशी आम्ही विमला हिरेन यांचा जबाब नोंदवला. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांनीच आपल्या पतीचा खून केला असावा असा संशय व्यक्त केला. त्यामुळे आम्ही त्याच दिवशी खून, पुरावे नष्ट करणे आणि कट रचण्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा आम्ही तपास सुरू केला. आम्ही घटनास्थळी म्हणजे मुंब्रा खाडी परिसरात गेलो. तिथे आम्हाला काहीच पुरावे आढळले नाही. मृतदेहाच्या अंगावरही पुरावे आढळले नाही”, असं सिंग म्हणाले.
वाझेंना ताब्यात घेणार
सचिन वाझे हा एनआयएच्या ताब्यात आहे. आम्हाला त्याची कसून चौकशी करायची आहे. आम्ही त्यासाठी ट्रान्स्फर वॉरंट मिळवलं आहे. २५ तारखेला एनआयए कोर्टात सुनावणी होणार असून त्यावेळी वाझेला आमच्या ताब्यात देण्याची विनंती याचिकेद्वारे करण्यात येणार आहे, असं सांगतानाच आम्ही हा कट उघडकीस आणणार असून गुन्ह्यातील मूळ सूत्रधारांना लवकरच अटक करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
८ मार्चला आम्ही सचिन वाझेंचा या प्रकरणी जबाब नोंदवला. यावेळी वाझेंनी सर्व आरोप फेटाळून लावले. स्कॉर्पिओ गाडी आपल्या ताब्यात नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच हिरेनशी कोणतीही ओळख नसल्याचंही स्पष्ट केलं. वाझेंनी या गुन्ह्यात आपला सहभाग नसल्याचंही स्पष्ट केलं. मात्र, आम्हाला काही पुरावे मिळाले असून तपास सुरू आहे. वाझे यांचा या गुन्ह्यात नेमका काय सहभाग आहे, याचा शोध आम्ही घेत आहोत, असं जयजित सिंग म्हणाले आहेत.
बुकीकडे सीमकार्ड सापडले अन्…
हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपसा करत असताना आम्हाला सीम कार्डचा शोध लागला. एका बुकीकडे आम्हाला हे सीमकार्ड सापडले. त्याने गुजरातच्या एका व्यक्तीकडून हे सीमकार्ड घेतले होते. हे सीम कार्ड गुजरातच्या एका कंपनीच्या नावावर आहेत. बुकी नरेश गौर याने वाझेच्या सांगण्यावरून हे सीमकार्ड निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदेंकडे दिले. त्यामुळे 21 मार्च रोजी गौर आणि शिंदेंना अटक करण्यात आली, असं सिंग म्हणाले.
पॅरोलवर सुटलेल्या शिंदेकडून गुन्हा कबूल
विनायक शिंदे हा लखनभय्या चकमकीतील आरोपी आहे. त्याला याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या कारणामुळे तो पॅरोलवर सुटलेला आहे. विनायकनेच हिरेन यांना त्या दिवशी बोलावून घेतलं होतं, अशी माहिती त्याने दिली. हा गुन्हा नेमका कसा करण्यात आला, याची माहिती विनायकने आम्हाला दिली आहे. त्याचं प्रात्यक्षिकही घटनास्थळी जाऊन करण्यात आलं आहे. आम्ही या प्रकरणात सर्व माहिती गोळा केली असून त्याचं विश्लेषण सुरू आहे. या प्रकरणात एकूण 14 सीमकार्डपैकी काही सीम कार्ड अॅक्टिव्ह करण्यात आले होते. तसेच काही सीमकार्ड आणि मोबाईलही नष्ट करण्यात करण्यात आले असून आरोपींनी काही सीसीटीव्ही फुटेजही नष्ट केले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
एटीएसच्या रडारवर आणखी बरेच जण
दमनमध्ये एक कार जप्त करण्यात आली आहे. ही कार गुन्ह्यात वापरली की नाही याबाबत प्रयोगशाळेत तपास सुरू आहे. या प्रकरणात सखोल चौकशी केल्यानंतर अनेकांना अटक करण्यात येणार आहे. आमच्याकडे अनेकांची नावे आहेत. त्यातील काही संशयित आहेत. पुरावे मिळताच या सर्वांना अटक केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच या प्रकरणात काही महत्त्वाचे साक्षीदार असून ते साक्ष देण्यास तयार असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.