HW News Marathi
महाराष्ट्र

“वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती” – चंद्रकांत पाटील

पुणे | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वाघाशी मैत्री कधीही करु असं म्हणाल्यानंतर हा विषय पेटला आहे. यावर संजय राऊतांनी वाघ मैत्री करत नाही असं म्हटलंय यावर आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी यावर पलटवार केला आहे. युती तुटल्यापासून तर या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप किंवा टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. करोना काळातही दोन्ही पक्षांमधला कलगीतुरा सुरूच आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आज वाढदिवशी शुभेच्छा देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोमणा मारला होता. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी देखील राऊतांना तितक्याच खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. “आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात आहे”, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी आज (१० जून) लगावला आहे.

…तर सामनात माझ्यावर आठवड्याला एक अग्रलेख नसता!

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे. “आज माझा वाढदिवस आहे. त्यामुळे कटू बोलायला नको. संजय राऊतांनी मला मनाविरुद्ध का होईना गोड म्हटलंय आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मनामध्ये जर मी गोड असतो, तर साधारणपणे सामनाचा आठवड्याला एक अग्रलेख माझ्यावर लिहिला गेला नसता. मला काल एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने एक वाघ भेट म्हणून दिला. मी म्हटलं चांगलंय, आमची वाघांशी दोस्ती आहे. तर त्यावर पत्रकारांनी शिवसेनेचा मुद्दा काढला. मी म्हटलं आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झालाय”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

वाघ ठरवेल मैत्री कुणाशी करायची… – संजय राऊत

दरम्यान, संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना शुभेच्छा वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी, चंद्रकांत पाटलांच्या कालच्या वाघासंदर्भातल्या विधानावरून त्यांनी टोला देखील लगावला होता. “चंद्रकांत पाटील हे गोड आहेत. त्यांना अशाच प्रकारे कार्यकर्त्यांच्या भेटी घेत राहाव्यात. वाघ ठरवेल की मैत्री कुणाशी करायची”, असं संजय राऊत म्हणाले होते.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

वाघाशी दोस्ती करावी यासाठी मला वाघ भेट दिला, पण वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती. उद्धवजीं जुनी मैत्री मोदीजींशी आहे असं सांगितलं. त्यांचं म्हणणं फडणवीस-पाटलांशी जमत नाही. इकडे दोस्ती असती तर 18 महिन्यापूर्वीच सरकार आलं असतं. मोदींनी जर सांगितलं, त्यांची इच्छा असेल तर त्यांची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा. मोदींजींनी आदेश दिल्यावर काय वाटेल ते करु. जरी भाजप-शिवसेनेचं सरकार आलं, असं मी म्हणत नाही, पण तुम्ही ज्या चर्चा करताय, त्यानुसार जरी सरकार आलं तरी निवडणुका वेगळ्याच होणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील मराठा समाजाची दिशाभूल केली जातेय, पंतप्रधानाकडे यासंदर्भात काहीच नाही. मराठा समाज हा मागास आहे हे आधी ठरवावं लागेल. राज्य सरकारकडून धूळफेक सुरू आहे, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या सवलती मराठा समाजाला दिल्यात त्या तरी द्या, अशी मागणीही त्यांनी केली. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं ते फक्त महाराष्ट्रात गेलं त्याला मोदी काय करणार असाही सवाल त्यांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पाच दिवसांच्या बाप्पांचं आज विसर्जन’! ठाणे प्रशासन सज्ज

News Desk

महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट व्हावं – शरद पवार

News Desk

तेजस ठाकरेंनी केलेले काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे, आशिष शेलारांनी थोपटली पाठ

News Desk