मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापे मारण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार टीका केली होती. देशमुखांवरील कारवाई ही सोची समझी चाल आहे असं म्हणत भाजपवर त्यांनी निशाणा साधला होता. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर शरसंधान साधले आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
“अनिल देशमुखांवरील कारवाई कायदेशीर आहे. नेहमीप्रमाणे हसन मुश्रीफ म्हणाले की ही भाजपची साजीश आहे. हे हास्यास्पदच आहे. परमबीर सिंग सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने सांगितले की हाय कोर्टात जा. हाय कोर्टाने सीबीआय चौकशी लावली. पण कोणत्याही प्रकरणात हसन मुश्रीफ यांना स्टेटमेंट देण्याची घाई लागली असते. काही जण सुपात आहेत तर काही जण जात्यात आहेत. काही काळजी करु नका परमेश्वर सगळ्यांचा हिसाब किताब एक करणार”.
“परमबीर सिंग १०० कोटींचा आरोप केल्यानंतर अनिल देशमुखांची सीबीआय लागते राजीनामा होतो, छापे पडतात एफआयआर दाखल होतो.तेवढ्याच पातळीचा नाही पण एका पोलिस अधिकाऱ्याने वाझेंवर ऑन पेपर आरोप करते की अनिल परब यांनी मला मुंबई महापालिकेच्या काही कॉन्ट्रॅक्टर कडून धमकवून पैसे घ्यायला बोलले होते. सचिन वाझे यांनी ऑन पेपर म्हटल्याप्रमाणे घोडावतांची चौकशी झाली पाहिजे. मी अजित पवारांचं थेट नाव घेत नाही आहे. मी असं म्हणत आहे की, अनिल परबांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, घोडावतांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे”.
“आज मला दोन ओळींची कविता वाचून दाखवतो. “इतनी उचाई ना देना प्रभू की धरती पराई लगने लगे, इतनी खुशिया भी न देना की दुख पर किसीके हसी आने लगे. नही चाहीये ऐसी शक्ती जिसका निर्बल पर प्रयोग करु नही चाहीये ऐसा भाव की किसीको देख कर जल जल मरु. ऐसी चतूराई भी न देना जो लोगोंको छलने लगे”. त्यामुळे आता अनिल परबांवरही सीबीईआय चौकशी झाली पाहिजे”.
काय म्हणाले होते हसन मुश्रीफ?
हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली. ही सोची समझी चाल आहे हे मी आधीच सांगितलं होतं. एका पत्रावरून इतकी मोठी कारवाई होऊ शकते का? असा सवाल करतानाच हे अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचं कारस्थान असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला.
माझ्यासह अन्य नेत्यांच्या मागे ईडीची चौकशी लावली होती. त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. केवळ मानसिक त्रास देऊन बदनाम करण्याचा हा प्रकार होता. तोच प्रकार देशमुखांच्या बाबतीत होत आहे. त्यामुळे लवकरच दूध का दूध, पानी का पानी होईल आणि देशमुख या प्रकरणातून निर्दोष बाहेर पडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची काही तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह १० ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.