पुणे | सारथी संस्थेच्या गैर कारभाराविरोधात खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे पुण्यात सारथी संस्थेच्या बाहेर लाक्षणिक उपोषण सुरु आहे. ‘सारथी बचाव’ अशी हाक देत मराठा समाजातील तरुणांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. महिनाभरात 22 पत्रके काढूनही मुख्य सचिव जे.पी. गुप्ता यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. उलट ‘सारथी’ला बदनाम करण्याचे काम केले, असा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे. “गेले अनेक दिवस मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे. विशेष म्हणजे या संस्थेचे उद्घाटन माझ्या अध्यक्षतेखालीच झाले होते. या संदर्भात काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तात्काळ मार्ग काढण्याचा शब्दही दिला होता”, असे संभाजी राजे यांनी सांगितले आहे.
सारथी संस्था बंद करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप करत संभाजीराजे छत्रपती लाक्षणिक उपोषण करत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला मराठा क्रांती मोर्चानेदेखील पाठिंबा दिला आहे. ‘सारथी’ची त्रयस्थ चौकशी करावी, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. शेकडो मराठा तरुण उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक राजेन्द्र कोंढरे यांनी दिली आहे.
संभाजी राजेंच्या उपोषणावर काय म्हणाले उपमुख्यमंत्री
या आंदोलनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, “सारथी संस्थेबाबत दोन बाजू समोर येत आहे. या संस्थेत भष्ट्राचार झाला असेल, तर कुणाचीही गय केली जाणार नाही. तसेच, संभाजी राजेंनी उपोषण करू नये”, असे आवाहन करत या प्रकरणी सचिवांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. या बैठकीसाठी छत्रपती संभाजी राजे यांनी देखील यावे, असंही ते म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.