HW News Marathi
महाराष्ट्र

सरन्यायाधीश उदय लळीत न्याय क्षेत्रासाठी दीपस्तंभ ठरतील

मुंबई। महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत (Chief Justice Uday Lalit) यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. त्यांचा गाढा अनुभव, नैपुण्य, ज्ञान यामुळे ते न्याय क्षेत्रासाठी निश्चितच दीपस्तंभ ठरतील या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा काल सायंकाळी मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्याच्या अर्थसंकल्पात सध्या एक टक्केपेक्षा थोडी कमी तरतूद विधि व न्यायसाठी असून ती वाढवून एक टक्क्यांपर्यंत आणण्याचा देखील मानस मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी जास्तीची जागा देण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे व लवकरच त्याबाबतीत निर्णय घेतला जाईल हे सांगितले.

हॉटेल ताज पॅलेसच्या क्रिस्टल हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय विधि व न्यायमंत्री किरेन रिजिजू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, अमिता उदय लळीत, झुमा दत्ता,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांची उपस्थिती होती. मुंबई उच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती उपस्थित होते.

यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते सरन्यायाधीश उदय लळीत यांचा हृद्य सत्कार करण्यात आला तसेच संस्कृतमधील गौरव पत्र देण्यात आले. तर झुमा दत्ता यांच्या हस्ते अमिता उदय लळीत यांना मानचिन्ह देण्यात आले.

सतत स्वतःला विकसित करा – सरन्यायाधीश उदय लळीत

आपल्या सत्काराला उत्तर देताना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी त्यांच्या कारकिर्दीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुंबईपासून करिअरची सुरुवात करून आज सरन्यायाधीश म्हणून मुंबईत आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत सत्कार स्वीकारताना मला कृतज्ञ वाटते आहे असे सांगून उदय लळीत म्हणाले की, वकील व्यवसायात सतत स्वतःला विकसित करणे व सुधारणा करीत राहणे हीच या व्यवसायाची खासियत आहे. सर्वोच्च न्यायालय ही माझी मातृसंस्था आणि कर्मभूमी आहे. माझ्या क्षमतेनुसार मी सर्वोच्च न्यायालयात काम केले.

देशातील न्यायदान वेगानं होईल – मुख्यमंत्री

सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नियुक्तीने आपल्या मनात आनंद आणि अभिमानाची भावना आहे असे सांगून मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, कमीत कमी वेळात कामकाज अधिक वेगानं व्हावं आणि न्यायव्यवस्थेची चाके वेगाने फिरावीत यादृष्टीने सरन्यायाधीश उदय लळीत हे केवळ बोलून थांबले नाहीत तर त्यांनी ज्या पद्धतीनं कामाला सुरुवात केली आणि प्रकरणे निकाली काढली, ते पाहता निश्चितच देशातील न्यायदान वेगानं होईल यात काही शंकाच वाटत नाही. सरन्यायाधीश वेळोवेळी ज्या मार्गदर्शक सूचना करतील किंवा निर्णय देतील त्याची काटेकोर अंमलबजावणी राज्य सरकार करेल अशीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

कलह मिटविण्याची इच्छा असलेले लळीत

मी उदयजी लळीत यांना आज पहिल्यांदाच भेटलो आणि त्यांच्या शालीनता, नम्रता, सभ्यता यामुळे आपण प्रभावित झालो आहे. कोकणात लळीत हा कीर्तन परंपरेतील एक लोककला असून या प्रयोगाच्या शेवटी कीर्तनकार देवाला गाऱ्हाणे घालतात. त्यात ते म्हणतात की, “आपापसातले कलह मिटोत, मनात किल्मिष ना उरो, निकोप मनाने व्यवहार चालोत”. कलह मिटविण्याची इच्छा प्रकट करणाऱ्या लळीतांचे नाव धारण करणाऱ्या उदयजी लळीत आज न्यायदानाच्या सर्वोच्च पदावर पोहचले हा विलक्षण योगायोग असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

नवीन इमारतीसाठी जास्तीची जागा

राज्यातील न्यायपालिका अधिक मजबूत करण्यासाठी त्यांना सुविधा देण्याबरोबरच नवीन न्यायालयांच्या निर्मितीसाठी राज्य शासन सकारात्मकपणे कार्यवाही करीत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जास्तीची जागा देण्यासंदर्भातदेखील राज्य शासन लवकरच निर्णय घेईल.

यावेळी केंद्रीय विधि व न्यायमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, 2047 मध्ये जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील, तेव्हा आपला देश पूर्णपणे विकसित असावा अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इच्छा असून आपण सर्वांनी यादृष्टीने प्रयत्न करावेत.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक यांची देखील भाषणे झाली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी प्रारंभी स्वागतपर भाषण केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शांतता-सुव्यवस्थेला गालबोट लागेल असे वागू नका, मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

News Desk

बेटी बचाओ, बेटी पढाओ, या केंद्र सरकारच्या मोहिमेच्या उलट कारभार उत्तरप्रदेशात सुरु

News Desk

शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे!

News Desk