HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याच्या विकासासाठी आता डबल इंजिन! – मुख्यमंत्री

मुंबई ।  देशात राज्याचा क्रमांक एक राखण्यात आणि राज्याच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे ( Maharashtra Industrial Development Corporation) मोठे योगदान असून यापुढे प्रगतीपथावर जाण्यासाठी दोन इंजिन आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हीरक महोत्सवानिमित्ताने बांद्रा येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महामंडळाचे कार्य उल्लेखनीय आहे. आता पर्यंतचे सर्वाधिक भूसंपादन महामंडळाने केले आहे. पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत. तरूणांसाठी रोजगार निर्मिती या महामंडळाच्या माध्यमातून होत आहे. कोविड काळात उद्योग बंद होऊ न देता काम सुरू राहिले, याचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला.

राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे होत आहेत. समृद्धी महामार्ग, ट्रान्सहार्बर लिंक या मुळे दळणवळण सोपे होणार आहे. पर्यायाने राज्यातील व्यवसायात वाढ होणार आहे. प्रधानमंत्री यांनी राज्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे. तेव्हा सगळ्यांच्या सहकार्याने औद्योगिक क्षेत्रात पुढे जाता येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

राज्याचा वैश्विक चेहरा औद्योगिक विकास महामंडळ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ही संस्था महाराष्ट्राचा वैश्विक चेहरा आहे. असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

फडणवीस म्हणाले, राज्याला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्यात महामंडळाचे मोठे योगदान आहे. राज्यात असलेली पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर आणि मोठ्या प्रमाणात येत असलेली गुंतवणूक  या माध्यमातून हे साध्य करता येणार आहे. कोणत्याही राज्याच्या दहा वर्ष पुढे जाण्याची क्षमता आपल्या राज्याची आहे. स्टार्टअप क्षेत्रात राज्यात सर्वाधिक उद्योग आहेत, युनिकॉर्न कंपन्या राज्यात आहेत. सेवा, उद्योग , यासह कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर यामुळे राज्य सर्व उद्योग क्षेत्रात आपला प्रथम क्रमांक राखणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केला. येणारा काळ हा स्पर्धेचा आहे, इतर राज्यांनी आपली क्षमता वाढविण्यास सुरुवात केली आहे, तेव्हा गाफील राहून चालणार नाही असा इशाराही श्री. फडणवीस यांनी दिला.

विभागाच्या पुढील वाटचालीबद्दल डॉ. हर्षदीप कांबळे यांनी माहिती दिली तर प्रस्ताविक डॉ. पी. अनबलगन यांनी केले. यावेळी बलदेव सिंग यांनी शुभेच्छा दिल्या.

उद्योग विभागाचे माजी अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, प्रधान सचिव तथा उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी अनबलगन , सहमुख्य कार्यकारी अधिकारी रंगानाईक,  पी. डी मलिकनेर, उपस्थित होते.

यावेळी  विकास दर्पण या माहिती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तर, चर्नी रोड येथे प्रस्तावित असलेले महामंडळाचे कार्यालय कसे असेल याबाबत ध्वनिचित्रफीतीच्या माध्यमातून सादरीकरण केरण्यात आले.

यावेळी एमआयडीसीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आर एम प्रेम कुमार, एस व्ही जोशी, बी एस धुमाळ, एम रामक्रिष्णन, जयंत कावळे, डॉ. छत्रपती शिवाजी, संजीव सेठी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Related posts

केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात आमचा बळी जातोय, ईडीच्या कारवाईवरून सरनाईकांचं वक्तव्य!

News Desk

मुख्यमंत्री आज रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधणार

News Desk

मंत्रालयातून इमारतींंचे भोगवटा प्रमाणपत्रे देण्याचे नवे उद्योग – आशिष शेलार

News Desk