HW News Marathi
महाराष्ट्र

“पुणे-नाशिक रेल्वे मार्गासह अन्य प्रकल्पांना गती द्या”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘महारेल’ला निर्देश

मुंबई  । पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गामुळे विकासाला गती मिळणार असून या प्रकल्पासह ‘महारेल’ च्या वतीने सुरु असलेल्या राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांनी काल (१३ सप्टेंबर) दिले. दरम्यान, पुणे- नाशिक अतिजलद रेल्वे मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) च्या पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गासह इतर प्रकल्पांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज सादरीकरण करण्यात आले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, श्रीरंग बारणे, ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल, मुख्य सल्लागार सत्यप्रकाश, मुख्यमंत्री सचिवालयाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्ग या २३५ कि.मी. प्रकल्पाचा लाभ पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याला होणार असून देशातील सर्वात किफायतशीर अतिजलद मार्ग म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. १६ हजार ३९ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून यात महाराष्ट्र शासनाचा ३ हजार २७३ कोटी रुपयांचा हिस्सा आहे. या खर्चाला राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली असून सर्व आवश्यक त्या परवानग्या या प्रकल्पाला मिळाल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने काम सुरु करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केल्या.

पुणे-नाशिक रेल्वे प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा

मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक सुरु असतानाच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि ‘महारेल’च्या प्रकल्पांची माहिती दिली. पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या  विनंतीवर कार्यवाही करण्यात येईल, असे  रेल्वेमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

इगतपुरी-मनमाड प्रस्तावित रेल्वे मार्ग कसाऱ्यापर्यंत वाढवा

इगतपुरी-मनमाड तिसरा, चौथा रेल्वे मार्ग कसाऱ्यापर्यंत वाढविण्याच्या दृष्टीने अभ्यास करुन तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी ‘महारेल’ ला दिल्या. तसेच इगतपुरी- मनमाड तिसरा व चौथा मार्ग (१२४ कि.मी.), सल्वा-बुटीबोरी कॉर्ड लाईन (५१ कि.मी.), औरंगाबाद-चाळीसगाव रेल्वे मार्ग (८८ कि.मी.), रोटेगाव-कोपरगाव रेल्वे मार्ग (३२ कि.मी.), गडचांदूर- मुकुटबन-आदिलाबाद रेल्वे मार्ग (७० कि.मी.) या प्रकल्पांचे प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य शासनाकडे प्राप्त झाले आहेत, लवकरच बैठक घेऊन प्राधान्याने हे प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुंबईत नवीन केबल स्टेड उड्डाणपुलांची उभारणी सुरु

मुंबई महानगरात रेल्वे मार्गांवर असलेल्या जुन्या उड्डाणपूलांच्या जागी नवीन केबल स्टेड उड्डाणपूल ‘महारेल’ कडून उभारण्यात येत आहे. या उड्डाणपुलांचे काम अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच ते अधिक आकर्षक करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर दादर टिळक उड्डाणपूल, बेलासिस उड्डाणपूल, मध्य रेल्वे मार्गावर रे रोड, घाटकोपर, ऑलिव्हंट, गार्डन, भायखळा, ऑर्थर रोड, करी रोड, माटुंगा लेबर कॅम्पजवळ (भुयारी मार्ग) येथे तर पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर लोअर परळ येथे हे नवीन केबल स्टेड उड्डाणपूल उभारले जात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये जलयुक्त शिवार योजना घोटाळ्यात मोठी कारवाई, तीन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक

Aprna

गृह, नगरविकास, गृहनिर्माण आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे ८१ हजार २४७ कोटी रूपये अर्थसंकल्पीय अनुदान मंजूर

Aprna

चौथीपर्यंतच्या शाळांना जोडणार पाचवीचा वर्ग!

News Desk